-->
भाजपाची सत्तेची मस्ती उतरवा

भाजपाची सत्तेची मस्ती उतरवा

संपादकीय पान बुधवार दि. 15 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
भाजपाची सत्तेची मस्ती उतरवा
भारतीय जनता पक्षाला सध्या अच्छे दिन आले आहेत. खरे तर त्यांनी जनतेला अच्छे दिन दाखविण्याची घोषणा केली होती. जनतेला काही अच्छे दिन दिसले नाहीत, मात्र भाजपाला मात्र जरुर चांगले दिवस दिसू लागले आहेत. नरेंद्र मोदींनी आधुनिक प्रचार तंत्राचा वापर करुन व जनतेला खोटी आश्‍वासने देऊन दिल्लीत सत्ता आल्यावर त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. आता त्यांना गल्लीबोळातही सत्ता स्थापन करण्याचे वेध लागले आहेत. राज्यात ज्या शिवसेनेच्या जोरावर त्यांनी आपले हातपाय पसरले त्यांना दूर लोटून त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांनी नगराध्यक्षांची थेट निवडणूक लढवून आपली सत्ता तेथे कशी येईल ते पाहिले. आता जिकडे सत्ता एका पक्षाची व नगरसेवक दुसर्‍याचा असी स्थीती जिकडे निर्माण झाली आहे तिकडे विकासाची अनेक कामे भविष्यात रखडणार आहेत. मात्र भाजपाला त्याचे काही देणे घेणे नाही. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यासाठी त्यांनी नगराध्यक्षाची थेट निवडणूक लढविण्याची युक्ती काढली. आता तर गुंडांना आपल्याकडे पक्षात घेऊन महानगरपालिका, जिल्हा पंचायत व पंचायत समित्या हातात घेण्याचा विडाच उचलला आहे. भाजपाची ही सत्तेची मस्ती उतरविण्याची आवश्यकता आहे. कारण आजवर कोणालाही सत्तेची हवा एवढी डोक्यात गेली नाही तेवढी भाजपावाले सत्तेचा माज करीत आहेत. त्यांना आता हिसका दाखविण्याचीच हीच योग्य वेळ आली आहे. तिकडे केंद्रात नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकहाती सत्ता राबविण्याच्या दृष्टीने आपली पावले टाकत आहेत. सध्या निवडणुकीचीही सर्व सुत्रे त्यांच्याकडे एकहाती आहेत. पक्षातील आपल्या विरोधकांना त्यांनी हळूहळू पूर्णपणे झोपवले आहे. भाजपा या निवडणुकीत प्रामुख्याने पारदर्शकतेच्या मुद्यावर भर दिला आहे. पारदर्शकता ही आता सर्वच गोष्टीत आणून फडणवीस या निवडणुकीतही आपले विजयी अभियान पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहेत. पारदर्शकतेचा कारभार हा सरकारने मंत्र्यांवर झालेल्या आरोपांवरून का करू नये, असे सर्वांना वाटत आहे. मग, त्यात विनोद तावडे यांच्या पदवीवर, पंकजा मुंडे यांच्यावरील चिक्की प्रकरणी की गिरीष बापट यांच्यावरील डाळ गैरव्यवहार प्रकरणी असो, येथूनच याला का सुरवात होऊ नये, असा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणातून सतत अनेक ठिकाणी आश्‍वासनांची खैरात केली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवेळी केलेली 6500 कोटी रुपयांची आणि 27 गावे समाविष्ट करण्याची घोषणा हवेतच विरली. केवळ घोषणा झाल्या आहेत. अजून कोणतेही निर्णय झाले नाहीत. केंद्रातले भाजपा सरकार तर, अच्छे दिन, खात्यावर 15 लाख, अयोध्येतील राम मंदिर, नोटाबंदीनंतर जमा झालेल्या काळ्या पैशाबाबत जनतेची दिशाभूलच करीत आहे. खोटे बोला पण दामटून बोला ही भाजपाची गोबेल्स निती सध्या सर्व पातळ्यांवर वापरली जात आहे. भाजपकडूनही गुडांना पावन करून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अगदी गल्लीतल्या गुंडापासून बरेचजण सत्तेत असलेल्या भाजपच्या कुंभमेळ्यात डुबकी मारून पवित्र होत आहेत. भाजपही या गुडांची पाठराखण करताना दिसत आहे. अगदी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही गुंडांनी भाजप प्रवेश केल्याचे पहायला मिळात आहे. भाजपाची ही सर्व कृत्ये पाहता लवकरच देशाला अच्छे दिन येणारच असे दिसते.

0 Response to "भाजपाची सत्तेची मस्ती उतरवा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel