-->
तामीळनाडूत पुन्हा खांदेपालट

तामीळनाडूत पुन्हा खांदेपालट

संपादकीय पान शुक्रवार दि. 17 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
तामीळनाडूत पुन्हा खांदेपालट
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरल्यानंतर व्ही के शशिकला बुधवारी संध्याकाळी बंगळुरुतील तुरुंगात शरण आल्या. तुरुंगात जाण्यापूर्वी शशिकला यांनी जयललिता आणि एमजीआर यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेऊन आश्रु ढाळले. तुरुंगात जाताना मात्र त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांची हकालपट्टी करुन आपल्या विश्‍वासातील पलानीस्वामी यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करुन त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा केला होता. आता नवीन मुख्यमंत्र्यांना येत्या पंधरा दिवसात आपले बहुमत सिध्द करावे लागणार आहे. सध्या तामीळनाडूतील राजकारण वेगात आहे. जे. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदार म्हणून शशिकला यांनी सुत्रे हाती घेतल्यापासून राजकीय घडामोडींना जबरदस्त वेग आला आहे. शशिकला यांनी पक्षांवर आपली पकड घट्ट करण्यासाठी आपल्या विश्‍वासातल्या एक एक नेत्यांना सर्वोच्य पदे देण्यास सुरुवात केली होती. त्यांना स्वत: मुख्यमंत्री व्हायचे होते. परंतु त्यांचे हे स्वप्न सध्यातरी भंगले आहे. विद्यमान मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी कितीही आव आणला तरी त्यांच्या मागे फारसेे लोक नाहीत, हे आजच्या घटकेपर्यंत दिसत आहे. मात्र भाजपाने त्यांना छुपा पाठिंबा दिला आहे, हेच त्यांची मोठी जमेची बाजू ठरणार आहे. मात्र आता नव्याने सुत्रे हाती घेणार्‍या पलानीस्वामी यांच्या कसोटीचा काळ आहे. त्यांनी जर आपले बहुमत सिध्द केले तर शशिकला यांचे पक्षावर नियंत्रण येणार आहे. शशिकला यांचे पक्षावरील नियंत्रण कसे कमी होईल व अण्णाद्रमुकमध्ये कशी फूट पडेल हे यासाठी भाजपाने आपली ताकद पणाला लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बेहिशेबी संपत्ती प्रकरणात शशिकला यांना दोषी असल्याचा निकाल दिला. जयललिता यांच्या बेहिशेबी मालमत्तेचे हे प्रकरण 19 वर्षे जुने होते. सन 2014 मध्ये विशेष कोर्टाने या प्रकरणी जयललिता, शशिकला व इतर दोघांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता. पुढे, कर्नाटक उच्च न्यायालयाने 11 मे 2015 रोजी त्यांच्या सुटकेचा निवाडा देत जयललिता यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला होता. त्या निकालास आव्हान देणार्‍या याचिकांवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला. शशिकला यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येत असताना हा निकाल लागल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहेे. शशिकला यांनी तुरुंगवास टाळण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी मागितला होता. मात्र तुम्हाला तातडीने या शब्दाचा अर्थ कळत नाही का असा प्रश्‍न उपस्थित करत न्यायालयाने त्यांना शरण येण्यास आणखी कालावधी देण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने शशिकला यांचा गट हादरला खरा, मात्र लगगेच त्याने आपल्या राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केली. काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांच्यासह त्यांच्या 19 समर्थकांची शशिकला यांनी तातडीने पक्षातून हकालपट्टी केली, आणि त्याचवेळी, पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर पलानीस्वामी यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन सत्तेसाठी दावा सादर केला. आपल्या समर्थक आमदारांची यादीही त्यांनी राज्यपालांना सादर केली. पक्षाच्या आमदारांचे अपहरण करून त्यांना एका रिसॉर्टमध्ये बेकायदेशीररीत्या बंदिस्त करून ठेवल्याचा आरोप शशिकला यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मदुराई (दक्षिण) मतदारसंघाचे आमदार एस. एस. सरवनन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पन्नीरसेल्वम यांच्या गोटातील ओळखले जाणारे सरवनन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 8 फेब्रुवारीपासूनच सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये धमकावून डांबून ठेवले होते. कांचीपुरमचे पोलीस अधीक्षक जे. मथुरासी यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने बुधवारी सकाळी रिसॉर्टवर जाऊन आमदारांकडे चौकशी केली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सर्वजण मर्जीनेच रिसॉर्टमध्ये राहत असून, कुणीही कैद करून ठेवले नाही, असा दावा आमदारांनी केला आहे. त्याचवेळी शशिकला यांचे पुतणे टी.टी.व्ही. दिनकरन यांनीही रिसॉर्टमध्ये जाऊन सर्व आमदारांसोबत चर्चा केली. दिनकरन यांना शशिकला यांनीच पक्षात आणले असून, त्यांची पक्षाच्या उपसरचिटणीसपदी निवड केली होती. अशा प्रकारे तामीळनाडूचे राजकारण दररोज वेगवेगळे वळण घेत आहे.

0 Response to "तामीळनाडूत पुन्हा खांदेपालट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel