-->
युध्द नको...शांतता हवी!

युध्द नको...शांतता हवी!

रविवार दि. 03 मार्च 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
युध्द नको...शांतता हवी! 
------------------------------------
पाकपुरस्कृत दहशतवाद्यांंचा खातमा करण्यासाठी मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या हल्ल्यात सुमारे 300 दहशतवादी ठार झाले. पुलवामा बॉम्बस्फोटानंतर भारताने याचा निषेध करुन याला प्रत्यूत्तर दिले जाईल असा इशारा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंबंधींचे सर्व अधिकार लष्कराकडे सोपविले होते. अखेर हवाई दलाने मंगळवारी भल्या पहाटे पाकच्या हद्दीत घुसून सुमारे एक हजार किलो बॉम्ब टाकून अनेक अतिरेक्यांचे गड उद्वस्त केले. आपल्या हवाई दलाने पाकच्या हद्दीत घुसून केवळ 22 मिनिटात ही कारवाई फत्ते करुन आपली कोणतीही हानी न होता ते सफाईतरित्या परतले. त्यांच्या या कारवाईमुळे पाकिस्तानला धडकी भरणे स्वाभाविक आहेच. तसेच भारताने अशी झपाट्याने कारवाई करुन आपल्यात आसलेला सफाईतरित्या कारवाई करण्याची कला अवगत असल्याचे जगाला या निमित्ताने दाखवून दिले आहे. हवाई दलाचे हे कर्तृत्व महान आहे. या कारवाईमुळे आपल्या तिन्ही दलाचे मनोधैर्य उंचावण्यास मोठी मदत होईल. आपल्याकडे देशातील जनतेलाही मोठा उत्साह आला आहे. फेसबुक व सोशल मिडियावर तर देशभक्तीचा अशा वेळी नेहमीच पूर येतो. अर्थात ही स्वागतार्ह बाब असली तरी केवळ अशा प्रकारचा व्यर्थ स्वाभीमान काही कामाचा नाही. सीमेवर जो सैनिक लढतो तो खरा शूर आहे, फेसबुक किंवा सोशल मिडियाचे शूर जे चार भिंतीत बसून लढतात त्यांचे फारसे कौतुक करण्यात अर्थ नाही. असो. 1971 च्या भारत-पाक युद्धानंतर भारतीय हवाई दलाने पहिल्यांच सीमेपलिकडे जाऊन हवाई हल्ला केला आहे. त्यानंतर पाकने दोन दिवसांनी काही ठिकाणी हवाई हद्द ओलांडण्याचा प्रयत्न केला आहेत. परंतु त्यात काही अर्थ नाही. पाकला नेमके आपण कसे उत्तर द्यायचे ते सुचत नसावे. त्यानंतर त्यांच्या ताब्यात आपला एक हवाई दलाचा सैनिक ताब्यात आला आहे. खरे तर आन्तरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांनी त्याला आपल्याकडे परत देमे गरजेचे आहे. परंतु त्यासंबंधी चर्चा करण्याचे दरवाजे पाकने खुले कले आहेत ही स्वागतार्ह बाब आहे. फ्रान्सच्या दसाँ एव्हिएशन कंपनीने 1970च्या दशकात विकसित केलेले मिराज-2000 हे बहुउद्देशीय लढाऊ विमान जगातील अत्याधुनिक आणि आघाडीच्या लढाऊ विमानांमध्ये गणले जाते. याच मिराजने ही कामगिरी झपाट्याने यशस्वी केली आहे. अमेरिकेच्या एफ-15 आणि एफ-16 या विमानांच्या तोडीची मोजकीच विमाने जगात आहेत. त्यात फ्रान्सचे मिराज-2000 आणि राफेल, युरोपीय देशांनी एकत्रितपणे विकसित केलेली युरोफायटर टायफून आणि टॉरनॅडो, रशियन मिग-29 आणि सुखोई-27/30, स्वीडनचे ग्रिपेन या विमानांचा समावेश होतो. दसाँ कंपनीची मिराज-एफ1 आणि मिराज-3 ही विमाने 1960 आणि 1970च्या दशकांत जगभरात प्रसिद्ध होती. ही विमाने जुनी झाल्यानंतर त्यांची पुढची पिढी म्हणून फ्रान्सने मिराज-2000 विमानाची रचना केली. त्याच्या पहिल्या प्रारूपाचे उड्डाण 1978 मध्ये झाले आणि 1983 पासून मिराज-2000 फ्रेंच हवाई दलात सामील होण्यास प्रारंभ झाला. मिराज-2000 विमानांनी फ्रान्सला पुन्हा जागतिक विमान उद्योगात आघाडी मिळवून दिली. मिराज-2000 हे वजनाला हलके, आकाराने आटोपशीर, वेगवान, चपळ आणि संहारक लढाऊ विमान आहे. त्याला शेपटाकडील लहान पंख नाहीत. त्रिकोणी आकाराचे मुख्य पंख हे मिराज-2000चे वैशिष्टय. त्यामुळे त्याला वेगाने हवाई कसरती किंवा डावपेच करण्यास मदत मिळते. त्याची स्नेक्मा एम-53 पी-2 टबरेफॅन इंजिने ब्रिटिश आणि अमेरिकी जेट इंजिनांपेक्षा वजनाला हलकी, सुटसुटीत आणि प्रभावी आहेत. त्याने मिराज-2000 विमानांना ताशी कमाल 2338 किमी इतका वेग मिळतो. त्याचा पल्ला 1850 किमी आहे. ते एका मिनिटात 56,000 फूट उंची गाठते.मिराजवरील शक्तिशाली डॉप्लर रडार एका वेळी 24 लक्ष्यांचा माग काढू शकते. रडारची लुक डाऊन, शूट डाऊन क्षमता विमानाखालील हवेतील लक्ष्ये टिपण्यास मदत करते. मिराज-2000 वर दोन 30 मिमी व्यासाच्या कॅनन, 6300 किलो वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची सोय आहे. मिराजवरून अण्वस्त्रांसह, लेझर गायडेड बॉम्ब, स्मार्ट बॉम्ब, मात्रा मॅजिक आणि मायका ही हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि एक्झोसेट ही हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे डागता येतात. मिराज-2000 विमानांनी बोस्निया आणि कोसोवो संघर्षांत भाग घेतला होता. भारतीय हवाई दलातील मिराज-2000 विमाने कारगिल युद्धात वापरली गेली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. तसे होणे स्वाभाविकच आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान सतत भारतावर युद्धस्थिती निर्माण करण्याचा आरोप करत आहे. भारताने अशा प्रकारे प्रत्यूत्तेर दिले ही घटना स्वागतार्ह असली तरी याचे रुपांतर युध्दात होणार नाही याची दखल आपण घेण्याची गरज आहे. याचा अर्थ आपण पाकिस्तानला घाबरतो असा होत नाही. उलट आपण चोख उत्तर देऊ शकतो हे दाखवून दिले आहे. यातून आता पाकने धडा घेण्याची गरज आहे. पाकने आता अतिरेक्यांचे अड्डे नेस्तनाबूत करावेत तसेच अतिरेकी कारवाायंना स्थान देऊ नये. कारण अतिरेकी हे जरे भारतात हल्ले करतात तसे पाकमध्येही अतिरेकी कारवाया या तेथील सरकारला डोकेदुखी झाली आहे. भारताने केलेल्या या कारवाईबाबत देशातून जोरदार स्वागत झाले आहे. कदाचित या हल्ल्याचा आगामी निवडणुकीत राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्नही केला जाईल. तसे होता कामा नये. कारण ही लष्कराची कारवाई होती व त्याचे सर्व श्रेय त्यांनाच दिले पाहिजे. त्याचा राजकीय फायदा घेणे चुकीचे ठरेल. मोदी भक्त आता पाकशी युध्दच करा व तो देश संपवून टाका अशी भाषा करतीलही. परंतु आपल्याला असे करण्याची घाई नाही. युध्द करणे आपल्याला व पाक या दोघांनाही परवडणारे नाही. त्याचबरोबर एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, आपली लष्करी ताकद कितीही मोठी असली तरीही आपल्यालाही युध्द परवडणारे नाही. त्याचबरोबर आपण आपल्या सीमेवरील प्रत्येक देशांशी मतभेद निर्माण केल्याने सर्वच सीमांचे रक्षण करणे आपल्याला परवडणारे नाही. नेपाळ, भूतान व चीन या देशांशी आपले संबंध सध्या समाधानकारक नाहीत. जर पाकशी युद्द केलेच तर हे देश प्रामुख्याने चीन डोके वर काढेल व आपली तेथील सीमा असुरक्षीत राहिल. एकाच वेळी सर्वच शेजारच्या शत्रूंना आगांवर घेणे आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे पाकमधील अतिरेक्यांचे तळ उध्दवस्त करण्याचे धोरण स्वागतार्ह ठरावे. मात्र त्याचे युध्दात रुपांतर करणे चुकीचे ठरेल. कारण युध्द दोघांनाही परवडणारे नाही. पाकिस्तानला तर याची फार मोठी झळ पोहोचेल. गेल्या दशकात हिटलरच्या वेडामुळे युरोप अख्खा बेचिरख झाला होता. तेथील जनतेला युध्द किती महाग पडते याची कल्पना आहे. युध्दात जे सहभागी होतात, ज्या भूमीवर युध्द खेळले जाते त्यांना त्याची सर्वात जास्त झळ पोहोचते. ज्या घरातील कर्ता पुरुष युध्दात मृत्यूमुखी पडतो किंवा आपले अवयव गमावून बसतो त्याला युध्दाचे नुकसान समजते. त्यामुळे युध्द नको, अशीच भूमिका घेणे शहाणपणाचे ठरणार आहे.
-----------------------------------------------------------

0 Response to "युध्द नको...शांतता हवी! "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel