नवीन वर्षात काय दडलय?
दि. 01 जानेवारीच्या मोहोरसाठी चिंतन
नवीन वर्षात काय दडलय?
सरत्या २०२२ वर्षाला काल निरोप दिल्यावर आता २०२३ सालची पहाट झाली आहे. गेल्या वर्षी आपण कोरोनाला बायबाय करुन सर्व कामकाज नव्य़ाने सुरु केले होते. मात्र आता नवीन वर्ष सुरु झाले असताना दोन महत्वाची संकटे जगाच्या डोक्यावर आहेत. त्यातील पहिले संकट म्हणजे पुन्हा कोरोनाचे वाढत जाणारे रुग्ण व दुसरे म्हणजे जागतिक मंदीचे वाढत जाणारे स्वरुप. कोरोनाने आता चीनसह काही देशात डोके वर काढल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु चॅनेल्सवर त्याचा मोठा स्फोट झाल्याचे ज्या बातम्या रंगवून दाखविल्या जात आहे, तसे स्वरुप अजिबात नाही. तसेच महत्वाचे म्हणजे, चीनमध्ये कोरोना वाढला आहे मात्र मृत्यूदर वाढलेला नाही, ही समाधानाची बाब आहे. चीनने जे शून्य कोरोनाचे धोरण राबविले होते त्यातून तेथे समूह प्रतिकारशक्ती विकसीत झाली नाही, परिणामी आता तेथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर चीनने बनवलेली लस तेवढी प्रभावी नाही, असे यातून म्हणता येईल. कारण आपल्याकडे अजूनही तिसरा डोस फारच मर्यादीत जनतेने घेतलेला असला तरी कोरोना चीनसारखा नव्याने वाढलेला नाही. कारण आपल्याकडे देशातील जवळजवळ प्रत्येकाला कोरोना कमी-अधिक प्रमाणात होऊन गेला आहे. त्यामुळे सर्वांची प्रतिकारशक्ती वाढली आहे. त्यामुले चीनमध्ये रुग्ण वाढले म्हणून आपल्याला घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र खबरदारी घेणे गरजेची आहे. त्याचबरोबर तिसरा डोस ज्यांनी घेतलेला नाही त्यांनी तातडीने घेणे गरजेचे आहे. सध्या आपल्याकडे माध्यमपुरस्कृत जो कोरोनाचा फैलाव होत आहे त्याने अजिबात घाबरण्याचे कारण नाही. कदाचित सरकार राहूल गांधींची भारत जोडो यात्रा थांबविण्यासाठी माध्यमांचा असा वापर करीत असावे. कोरोनाची स्थिती आपल्याकडे पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेसारखी पुन्हा येणार नाही अशी आपण सध्या तरी आशा व्यक्त करु. कोरोनापेक्षाही आता दुसरे मोठे संकट आले आहे ते म्हणजे, जागतिक पातळीवरील मंदीचे. अमेरिका व ब्रिटनमध्ये यापूर्वीच मंदीचे वातावरण सुरु झाले आहे. त्याचा फटका आपल्याकडील या देशांशी संबंधीत ज्यांचे उद्योग- व्यापार चालतात त्यांना बसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या वर्षात मंदी वाढत जाणार यात काहीच शंका नाही. मात्र ही मंदी किती व्यापक होते त्यावर बरेचसे अवलंबून राहिल. आपल्याकडे मंदीचा परिणाम कितीही म्हटले तरीही भोगावा लागणार आहेच. कोरोना संपल्यावर आपल्याकडे मंदी येणार असे अनेकांचे भाष्य होते ते देखील खरे ठरेल. मंदीमुळे आय.टी. उद्योगाला व विकसीत देशांना निर्यात करणाऱ्या उद्योगाला याचा सर्वात जास्त फटका सहन करावा लागेल. आपल्याकडील आय.टी. उद्योग हा प्रामुख्याने अमेरिका व विकसीत देशातील कंपन्यांकडून येणाऱ्या कामांवर चालतो. त्या देशांनी आपल्या आय.टी. खर्चात कपात करण्यास सुरुवात केली आहे किंवा विकसीत देशातून जी कामे आऊटसोर्स होतात त्यात कपात होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे आय.टी. उद्योगापुढील समस्या वाढण्याची शक्यता आहे. आपल्याकडे आय.टी. उद्योगाचा सकल राष्ट्रीय उत्पन्नात आठ टक्क्यांचा वाटा आहे. तसेच मोठ्या प्रमाणात नव उच्च मध्यमवर्गीय या उद्योगावर अवलंबून आहे. आय.टी. उद्योगात नोकरकपात अगोदरच सुरु झाली आहे. नव्याने सुरु झालेल्या स्टार्टअपनी गेल्या वर्षी अनेकांना घरी बसविले आहे. त्यामुळे मंदी किती व्यापक होते त्यावर या उद्योगातील नोकऱ्या अवलंबून राहातील. आय.टी.बरोबरच अन्य उद्योगांनाही याचा कमी-जास्त फटका सहन करावा लागेल. त्यातच निर्यातप्रधान उद्योगांना मंदी प्रामुख्याने जाणवेल. सर्वात महत्वाचे म्हणजे विदेशी गुंतवणुकीचा ओघ मंदावण्याची शक्यता आहे तसे झाल्यास देशातील रोजगाराच्या संधी कमी निर्माण होणार आहेत. त्याचा एकूणच अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. कोरोनानंतर जागतिक उत्पादन केंद्र चीनपासून बदलून काही अंशी भारताकडे झुकेल असा अनेकांचा अंदाज होता. परंतु अजूनही त्याला काही आकार मिळत नाही. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उत्पादनासाठी नव्याने विदेशी गुंतवणुक होईल असे सध्या तरी चित्र नाही. सध्या असलेला देशातील सकल राष्ट्रीय उत्पादनातील सुमारे १६ टक्के वाटा २० टकक्यांवर पोहोचेल का असा सवाल आहे. त्याचे उत्तर चालू वर्षातच मिळेल. राजकीय पातळीवर विचार करता, मध्यवधी निवडणुकांसाठी आता जेमतेम दीड वर्षे राहिले आहे त्यामुळे यंदाचे वर्ष संपत आले असताना निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असेल. त्यातच यंदा नागालँड, त्रिपुरा, कर्नाटक, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, मिझोराम, राजस्थान, तेलंगणा या आठ राज्यातील निवडणुका येऊ घातल्या आहेत. यात सत्ताधाऱ्यांची कसोटी लागणारच आहे शिवाय विरोधकांचाही कस लागेल. त्यातील कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान व तेलंगणा या राज्यातील निकाल काय लागतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. कॉंग्रेसला राजस्थान टिकविता येणार का? तेलंगणात सत्ताधारी आपली सत्ता टिकविणार का? सर्वात महत्वाचे म्हणजे कर्नाटक, मध्यप्रदेशात सत्तेत कोण येणार या प्रश्नांची उत्तरे आपल्याला याच वर्षात मिळतील. या विधानसभा असोत किंवा पुढे होणारी लोकसभा असो या सर्वच निवडणुकीत विरोधक आपली एकी कशी दाखवितात त्यावर सत्तेची गणिते राहातील. कॉँग्रेस पक्ष म्हणून सध्याच्या घडीला दुबळा झाला असला तरी कॉँग्रेसला नगण्य समजता येणार नाही हे हिमाचलप्रदेशातील निकालाने दाखवून दिले आहे. त्याचबरोबर राहूल गांधींच्या यात्रेचा कॉँग्रेसला निवडणुकीत कितपत फायदा होईल हे देखील याच वर्षात समजेल. नव्याने वाढत असलेला आप हा पक्ष सत्ताधाऱ्यांना एक मजबूत पर्याय म्हणून पुढे येईल की भाजपाची बी टीम म्हणूनच ओळखली जाईल हे देखील या निवडणुकीतून स्पष्ट होईल.
सरत्या २०२२ सालाने अनेक महत्वाच्या घटना पाहिल्या. जगाची लोकसंख्या ८०० कोटींवर पोहोचली आहे. तंत्रज्ञानाने आपले जग झपाट्याने बदलते आहे. नवीन तरुण पिढीच्या आशा आकांक्षा वाढत आहेत, त्यात झपाट्याने बदलही होत आहे. दोन पिढ्यातील आचार-विचार झपाट्याने बदलत आहेत. एकेकाळी कामगार युनियनचा असलेला वरचश्मा आता संपुष्टात आलेला दिसतो आहे. ज्या कामगारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी म्हणजे कामाच्या वेळा, साप्ताहिक सुट्टी यासाठी रक्त सांडले ते हक्क देखील त्यांनी गमावले आहेत. कामगारांची नोकरीची सुरक्षीतता आता संपुष्टात आली आहे. निवृत्ती नंतरची आर्थिक सुरक्षीतता म्हणजे पेन्शनही संपल्यात जमा आहे. जागतिक पातळीवर आय.टी. कंपन्यांतील दीड लाख कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याता आले आहे. २००८ सालच्या मंदीतील आकडा आत्ताच पार झाला आहे. त्यामुळे भविष्यात कामगार कपात झाल्यास त्याचा नवा विक्रम होईल. डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८३ रुपयांचा निचांक पाहिला आहे. बहुतांशी शहरात पेट्रोलने किंमतीची शंभरी पार केली आहे मात्र त्याचा कुणी साधा निषेधही केलेला नाही. आपल्या शेजारच्या श्रीलंकेतील चलनवाढीचा वेग तब्बल ७४ टक्क होता. आपल्याकडेही चलनवाढीचे आकडे चढत असताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६३ हजारां पार गेला. सोशल मिडियाने आपले एक स्थान निर्माण केले आहे. तरुण याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत. अभिनेता रणबीर कपूरने आपला नग्न फोटो सोशल मिडियावर टाकला असता त्याला तब्बल २.६ कोटी लाईक्स मिळाले. यापूर्वी एक-दोन दशकांपूर्वी नग्न फोटो पाहाण्यासाठी एकच मासिक होते, आता हीच नग्नता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये म्हणजे हातात आली आहे. सरत्या वर्षात अदांनींनी अंबानींना मागे टाकले, सरत्या वर्षात तर अदानींची मालमत्ता दररोज अकराशे कोटी रुपयांनी वाढली. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपण वाटचाल करणार आहोत. गेल्या वर्षी पेक्षा चालू वर्षात विविध क्षेत्रातील बदल हे झपाट्याने होणार आहेत व त्याचा पाया हा तंत्रज्ञान असेल.
0 Response to "नवीन वर्षात काय दडलय?"
टिप्पणी पोस्ट करा