-->
अभिनंदन... अभिनंदन!

अभिनंदन... अभिनंदन!

शनिवार दि. 02 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अभिनंदन... अभिनंदन!
भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी सुटका पाकिस्तानने केल्याने आता सीमेवरील तणाव निवळण्यास मोठी मदत होणार आहे. पुलवामा बॉम्बस्फोटानंतर केवळ बारा दिवसातच भारताने प्रत्यूत्तर दिल्याने पाकिस्तानच्या छातीत धडकी भरली आहे. फुलवामा नंतर पाकिस्तानला धडा शिकविण्यासंबंधी आपल्याकडे जबरदस्त जनमताचा रेटा होता. त्यालाचअनुसरुन भारताने कारवाई केली. परंतु त्यानंतर पाकव्याप्त काश्मिरमध्ये आपला विंग कमांडर अभिनंदन वर्धमान विमान कोसळल्याने पाकच्या हाती लागला. खरे तर त्याला आन्तरराष्ट्रीय कायद्यानुसार पाकने तातडीने सोडावयास हवे. हा सामंजस्यपणा पाकने व पंतप्रधान इम्रान खान यांनी दाखविला. मात्र त्याचबरोबर चर्चेचे दरवाजेही खुले केले. सध्या पाकची अर्थव्यवस्था नाजूक आहे, तसेच सुमारे 60 देशांचा दबाव त्यंच्यावर आहे, त्यामुळे कोणतेही धाडसी पाऊल टाकणे पाकसाठी शहाणपणाचे ठरणारे नाही. ही वस्तुस्थिती इम्रान खान यांनी ओळखली व पांढरे निसाण दाखविले आहे. अभिनंदन यांना पाकिस्तानी लष्कराने पकडल्यानंतर दोन्ही देशांमधील वातावरण चिघळले होते. त्यात अभिनंदन यांच्या सुटकेस पाकिस्तानकडून विलंब झाला असता तर भारताने आणखी इंगा दाखविण्यास सुरुवात केली असती. भारताने अभिनंदन यांच्या सुटकेबाबत आपली भूमिका अधिक स्पष्ट असावी, ती आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नजरेस यावी या दृष्टीने जिनेव्हा कराराचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्याने पाकिस्तानची कोंडी होणे स्वाभाविकच होते. तीन वर्षापूर्वी कुलभूषण जाधव यांना पाकने पकडले व त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप लावला. त्याला पाकच्या जेलमध्ये ठेवून फाशीची शिक्षा देखील ठोठावली. मात्र त्याला भारताने आन्तरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले. सध्या हा खटला तेथे चालू आहे. मात्र कुलभूषण जाधव व अभिनंदन वर्धमान यांच्यात फरक आहे. गुप्तहेर पकडणे व जवानाला पकडणे यातील फरक पाकिस्तानने समजून घ्यावा अशी अपेक्षा होती. अशा प्रकारे चुकीने जर जवान गेल्यास त्याला सोडणे हा आन्तरराष्ट्रीय कराराचा भाग आहे. भारतीय लष्कराने अभिनंदन यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानशी कोणताही समझोता करणार नसल्याचीही ठाम भूमिका घेतली. कारण त्याच्या सुटकेसाठी भारताने कोणतीही चर्चा करण्याची आवश्यकताच नव्हती. पाकिस्तानपुढचे सर्व पर्याय संपुष्टात आले होते. या सर्व घडामोडीत भारताची आक्रमक रणनीती पाहून पाकिस्तानकडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी बोलणी व्हावीत असा एक डाव टाकण्यात आला. भारतीय परराष्ट्र खात्याने पुलवामा प्रकरणात जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा हात कसा आहे याचे पुरावे पाकिस्तानला सादर केले. याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही दबाव आणण्याचे प्रयत्न केले. एकंदरीत वाढत्या दबावामुळे अखेरीस अभिनंदन यांची सुटका करणे भाग पडले. सधय तरी उभयतातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत असली तरीही भविष्यात पाक अतिरेकी अड्यांवर कारवाई करतो का, तसेच अतिरेक्यांना अजूनही कितीपत संरक्षण देतो त्यावर हे संबंध अवलंबून आहेत. जैशच्या मुसक्या बांधण्यासाठी भारताला राजनयिक पातळीवर अधिक कसून प्रयत्न करावे लागणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशातील तणाव निवळतील असे सुचित केले आहे, त्यांचे हे विधान फार सुचक आहे. अमेरिकेकडूनही पाकवर अतिरेकी कारवायांना पायबंध घालण्यासाठी दबाव आहेच. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लादेनवर अमेरिकेने जशी कारवाई केली तशी आम्ही करू शकतो असे ठणकावले. त्यांचे हे विधान म्हणजे थोडा आगावूपणाच झाला. अशा विधानांमुळे शांतता प्रक्रियेत बाधा येते हे लक्षात घेतले पाहिजे. देशाचे सार्वभौमत्व व एकात्मतेच्या रक्षणासाठी योजण्यात येणार्‍या उपाययोजनात आम्हाला विश्‍वासात घेतले नाही ही विरोधकांची तक्रार योग्यच म्हणावी लागेल. पुलवामानंतर एवढ्या घडामोडी झाल्या, दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले; पण मोदींनी सर्वपक्षीयांची एकही बैठक घेतली नाही. उलट प्रचार दौर्‍यात व सरकारी कार्यक्रमांत ते उपस्थित राहिलेले दिसतात. त्यामुळे सध्या मोदींनी आपले प्राधान्यक्रम ठरविलेले दिसतात. नेहमीप्रमाणे त्यांनी यावेळी विरोधकांना जुमानलेले नाही. केवळ औपचारिकता म्हणून विरोधकांची बैठक घेतली गेली. खरे तर या बैठकीला पंतप्रधानांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर अन्य पक्षांशी चर्चा करण्यास वेळ नाही असे चित्र दिसणे पाकिस्तानला मदत करणारे ठरते. पुलवामा घटनेपासून गेले पंधरा दिवस सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी जो काही हैदोस घातला आहे तो अत्यंत चिंताजनक असा आहे. चॅनेल्सनी तर देशात युध्दाची ठिणगी पडलीच असे चित्र प्रत्येक तासाला उभे केले. यातून निश्‍चितच चुकीचा संदेश जात आहे. देशाभिमानाच्या नावाखाली लोकांना चेकाळविण्याचा धंदा सुरु झाला आहे. हे बेगडी देशप्रेम थांबविण्याची आता गरज निर्माण झाली आहे. आपल्याला पाकिस्तानला धडा शिकवायाचा आहे, त्यांनी जे दशहतवाद्यांना आश्रय् दिला आहे त्याबद्दल त्यांना जरुर अद्दल घडवायची आहे. असे असले तरी युध्दासारखे टोकाचे क्षण आपल्याला सध्या तरी नको आहेत. युद्ध होऊ नये ही अपेक्षा रास्तच नव्हे, तर अधिक शहाणपणाची आहे.
-------------------------------------------------------------

0 Response to "अभिनंदन... अभिनंदन!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel