-->
मुख सूत्रधार पकडा

मुख सूत्रधार पकडा

संपादकीय पान मंगळवार दि. १४ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मुख सूत्रधार पकडा
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर  यांच्या हत्येसंबंधी एक प्रमुख संशयीत सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे याला सी.बी.आय.ने अटक करुन पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर केले आहे. त्याला १६ जूनपर्यंत सी.बी.आय.च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतर तब्बल तीन वर्षानंतर संशयीत खुन्याला अटक करण्यात यश आले आहे. यासंबंधी दाभोलकर कुटुंबिय सर्व श्रेय न्यायालयाला देतात हे खरेच आहे. कारण न्यायालयाने संशयीत आरोपी अजून का पकडले जात नाहीत, गोलमाल तपास करु नकात, ठोस संशयीतांना पकडा व न्यायालयात उभे करा असा आदेश दिल्यावर वेगाने सुत्रे फिरु लागली होती. पहिल्यापासूनच संशयाची सुई ही सनातन संस्थेच्या दिशेने होती. डॉ. विरेंद्र तावडे, सारंग आकोलकर, रुद्र पाटील व पूर्वी अटक झालेला समीर गायकवाड हे सर्व जण संशयीत होते. केवळ डॉ. दाभोलकरच नव्हे तर कॉ. गोविंद पानसरे, कर्नाटकातील प्राध्यापक व विचारवंत कलबुर्गी यांच्या खुनाचा यांच्यावरच संशय आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या तिघांच्याही खूनाचे सुत्र एकच आहे. अर्थात त्यांचा विचार संपावा या हेतूने केलेले हे खून आहेत. हा खून राजकीय असल्याने पोलिसांचा तपास हा त्यादृष्टीने पाहिजे होता. परंतु पोलिस यात फारसे काही करु शकले नाहीत. सी.बी.आय.ची सुरुवातीला या तपासाची चौकशी तशी धीमेगतीनेच होती. मात्र न्यायालयाने खर्‍या अर्थाने याला गती दिली असे म्हणावे लागेल. सनातन संस्थेचे वकिल हे गेले काही महिने मात्र तावडे व अन्य संशयीत आमच्या संपर्कात आहेत असे मोठ्या फुशारकीने सांगत होते. आपल्या विचारांचे समर्थक सरकार सत्तेत आसल्यामुळे आपले कोण वाकडे करु शकत नाही असा ठाम विश्वास या सनातन संस्थेला वाटत होता. परंतु अखेर न्यायव्यवस्थेने आपले काम चोख केले व खुन्यांना न्यायदानासाठी आपल्या समोर उभे केलेच. अर्थात तावडेच्या अटकेमुळे सर्व काही जिंकले असे नव्हे. अजूनही जे संशयीत सनातनचे साधक फरारी आहेत त्यांना पकडणे ही मोठी जबाबदारी आहे. तसेच या खुन्याच्या सुत्रधाराला शोधावे लागणार आहे. हा सुत्रधार व्यक्ती आहे की संस्था याचाही शोध घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर या खुन्यांची दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्याशी काही लिंक आहे का ते तपासावे लागणार आहे. तसे सिध्द झाल्यास संपूर्ण सनातन संस्थेलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करावे लागेल. अर्थात फडणवीस यांचे सरकार हे करणार नाही. आता फडणवीस हे म्हणत आहेत की, खुन्यांना शोधून सरकारने आपली इच्छाशक्ती दाखविली आहे. खरे तर याचे श्रेय सरकारने घेऊ नये. खरे श्रेय हे आपल्या न्यायव्यवस्थेचे आहे. त्यांनी जर आदेश दिले नसते तर चौकशी करणार्‍या संस्थांनी फारशी मेहनत घेतली नसती. सध्या अटक झालेला तावडे हा कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉक्टर आहे. डॉक्टरांचा धर्म हा मानवाचा जीव वाचवायचा आहे. तर आपला धर्म बाजूला ठेवून या डॉक्टराने दाभोलकरांचा प्राण घेतला आहे. त्यामुळे त्याच्यावर हिंदुत्वाचे वैचारिक प्रहार झालेले आहेत हे दिसते. सध्या डॉ. तावडेच्या अटकेने दाभोलकर खून खटल्यातील चौकशीचा एक कप्पा निश्चितच उघडला गेला आहे. मात्र अजूनही मुख्य चौकशी शिल्लक आहे हे विसरता कामा नये.

0 Response to "मुख सूत्रधार पकडा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel