-->
अंगार निमला!

अंगार निमला!

बुधवार दि. 30 जानेवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अंगार निमला!
कामगार नेते, समाजवादी चळवळीतील एक आधारस्तंभ, माजी केंद्रीय मंत्री व लोकसभेत नऊ वेळा निवडून गेलेले जॉर्ज फर्नांडिस नावाचा अंगार आता निमला आहे. खरे तर जॉर्ज हे एक वादळ होते. त्यांनी आयुष्यात अनेक लढे दिले. अगदी मृत्यूशीही त्यांनी प्रदीर्घ काळ संघर्ष केला. त्यांचे आयुष्य म्हणजे संघर्षाचे प्रतिक होते असे म्हटल्यास वावगे ठरु नये. कॅथलिक चर्चचे धर्मगुरु, कामगार नेते, मुंबईच्या रस्त्यावर झोपून काढलेले सुरुवातीचे संघर्षमय आयुष्य, कामगार नेता म्हणून त्यांना मिळालेली बंद सम्राट ही ओळख, आणीबाणीतील त्यांचा संघर्ष, डायनामाईट प्रकरण, मंत्रीपदाची लाभलेली कारकिर्द, कोकण रेल्वेचे शिल्पकार, मंत्रीपदाच्या काळात त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, वादळी ठरलेले कौटुंबिक जीवन व शेवटी जीवनाच्या अखेरीस त्यांनी अल्झायमर आणि पार्किन्सन्स या दुर्धर रोगांविरोधात दिलेली अयशस्वी लढाई असे त्यांच्या 88 वर्षातील आयुष्यातील महत्वाचे टप्पे होते. त्यांची जवळपास नऊ दशकांची आयुष्याची वाटचाल ही एखाद्या चित्रपटातील डॅशिंग अभिनेत्याप्रमाणेच ठरावी अशी होती. समाजवादी विचारांनी ते भर तरुणपणात भारले गेले. पी. डिमेलो व राममनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी कामगारांना संघटीत करण्याचे काम सुरु केले. आपली समाजवादी विचारधार त्यांनी अखेरपर्यंत काही सोडली नाही. अगदी मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात असतानाही त्यांच्यातील समाजवादी विचार सोडला नाही व त्यांनी आपल्या धोरणांशी तडजोड न करता निर्णय घेतले. त्यांचा कॉँग्रेस विरोध अनेकदा टोकाचा असे. त्यातून त्यांनी कॉँग्रेस की भाजपा यातील पर्याय स्वीकारताना भाजपाची साथ दिली व कॉँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपाची साथ दिली. याच कॉँग्रेस विरोधापोटी ते वाजपेयींच्या सरकारमध्ये सामिल झाले होते. मुंबईचे अनभिषिक्त बंद सम्राट म्हणून एकेकाळी ओळखले गेलेले जॉर्ज हे शेवटच्या काळात मात्र सत्तेसाठीच आपले आयुष्य जगले. त्यांच्यावर झालेले मंत्रीपदातील भ्रष्टाचाराचे आरोप पाहता जॉर्ज फर्नांडिस शेवटच्या काळात बदलेले की काय अशी शंका यावी, अशी स्थिती होती. खरे तर जॉर्ज यांच्यातील अंगार ते संरक्षणमंत्री झाले तेव्हाच संपला होता असे म्हणावे लागेल. कारण कारगील युध्द झाले त्यावेळी ते संरक्षणमंत्री होते व त्यांच्यावर शवपेटीचा झालेला आरोप त्यांच्या आजवरच्या राजकीय करिअरला धक्का देणारेच होते. मात्र नंतर न्यायालयाने नंतर त्यांना निर्दोष ठरविले. त्याचबरोबर वाजपेयींच्या मंत्रिमंडळात राहून त्यांनी पोखरणच्या अणू चाचणीचाला विरोध केला नाही. त्यांच्यासारख्या समाजवादी नेत्याने त्यावेळी त्या चाचण्यांना विरोध करावयास पाहिजे होता. पण तो त्यांनी केला नाही. मात्र ज्यावेळी ते मोरारजी देसाईंच्या मंत्रीमंडळात उद्योगमंत्री होते त्यावेळी त्यांनी आय.बी.एम. व कोकाकोला या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांना देशातून हाकलून देण्याचा विडा उचलला होता. यात ते यशस्वी झाले नाहीत हा भाग वेगला परंतु त्यांनी मंत्री असताना या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मनात धडकी भरविली होती हे मात्र नक्की. मंगलोर येथील एका गरीब ख्रिश्‍चन कुटुंबात जन्मलेल्या जॉर्ज यांचे शालेय शिक्षण झाल्यावर त्यांची घरच्यांनी धर्मगुरु होण्यासाठी चर्चमध्ये रवानगी केली होती. मात्र फादर झाल्यावर त्यांचे त्यात काही मन रमेना व त्यांनी हे सोडून मंगलोरमधील असंघटीत क्षेत्रातल्या हॉटेल मजुरांना संघटीत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली. त्यावेळी मुंबईत चौपाटीच्या बाकड्यावर झोपून असंघटीत कामगारांना संघटीत करण्याचे काम त्यांनी केले. हॉटेल कामगार, बेस्ट कामगार, महापालिका कर्मचारी, रेल्वे कामगार यांना संघटीत करण्याचा विडा उचलला. त्याकाळात त्यांनी मुंबईतील एका इंग्रजी दैनिकात पत्रकारिताही केली होती. मुंबईच्या कामगार संघटनांमध्ये हळूहळू जॉर्ज फर्नांडिस हे नाव घुमू लागले. शिवसेनेचा उदय होण्याअगोदर गिरणी कामगारांत कॉ. डांगे व महापालिका, बेस्ट, रेल्वे कामगारांत जॉर्ज फर्नांडिस या नावाचा दबदबा होता. 1967 साली संयुक्त समाजवादी पक्षाच्या तिकिटावर प्रथमच जॉर्ज दक्षिण मुंबईतून कॉँग्रेसचे मातब्बर नेते स.का. पाटील यांच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांनी स.का. पाटलांचा पराभव केला. स.का. पाटलांच्या या पराभवानंतर जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईचे अनभिषिक्त बंद सम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले. जॉर्ज यांच्या एका हाकेवर मुंबई बंद करण्याची त्यांची ताकद होती. खासदार म्हणून ते निवडून गेल्यावर त्यांना देशाचे नेतृत्व करण्याची संधी चालून आली. 1973 साली ते समाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यावेळी देशात मोठ्या प्रमाणावर संप होत होते, देशाची आर्थिक स्थिती खिळखिळी होत होती. इंदिरा गांधींनी बांगला देशाच्या युद्दात मोठा विजय प्राप्त केल्याने त्यांची जगात मोठी प्रतिमा निर्माण झाली होती. त्यावेळी देशातील वाढलेले विविध उद्योगातील संप व आर्थिक अस्थिरता यामुळे देशात आणीबाणी इंदिरा गांधींनी लादली. वृत्तपत्रांवर निर्बंध लादण्यात आले. देशातील हजारो राजकीय नेत्यांना, कामगार पुढार्‍यांना अटक करुन जेलबंद करण्यात आलेे. इंदिरा गांधींच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी देशातील जनता रस्त्यावर आली होती. जॉर्ज फर्नांडिस मात्र पोलिसांना चकवा देत होते. आणीबाणीत ते शिखांच्या वेशात फिरत होते. फर्नांडिस यांनी भूमिगत राहून आणीबाणीच्या विरोधात मोठी संघटनात्मक कामे केली. सरकारविरोधात त्यांनी सशस्त्र उठाव करण्याचा प्रयत्न केला. बडोदा डायनामाईट केस म्हणून या प्रकरणाची नोंद झाली. शेवटी आणीबाणी उठविण्या अगोदर जॉर्ज यांना कोलकात्यात अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर त्यावेळी जगभारातील प्रमुख नेत्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांची मुक्तता करावी अशी मागणी केली होती. त्यावरुन जॉर्ज हे केवळ देशातीलच नव्हे तर जागतिक स्थरावरील कामगार नेते म्हणून जगाला परिचित असल्याचे दिसले. शेवटी या प्रकरणी त्यांच्यावर शेवटपर्यंत कधी आरोपपत्रच उभे राहिले नाही. आणीबाणीनंतर फर्नांडिस बिहारच्या मुजफ्फरपूरमधून खासदार बनले होते. मोरारजी देसाई सरकारमध्ये ते उद्योगमंत्री झाले. त्याशिवाय त्यांनी व्हीपी सिंह सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री पदावरही होते. या काळात त्यांनी कोकण रेल्वेच्या कामाला गती दिली. कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून जसे मधू दंडवते यांचा उल्लेख होतो तेवढाच या प्रकल्पात सिंहाचा वाटा जॉर्ज फर्नांडिस यांचा होता. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमध्ये फर्नांडीस संरक्षण मंत्री होते. 1967 पासून 2004 पर्यंत नऊ वेळा लोकसभा निवडणुका जिंकले. संरक्षणमंत्री म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा सियाचीनचा विक्रमी दौरा केला. त्यांची राहणी अतिशय साधी होती. पांढरा स्वच्छ झब्बा व लेंगा हा त्यांचा मंत्री असतानाही पोषख असायचा. दिल्लीतील 3, कृष्ण मेनन या त्यांच्या निवासस्थानी कोणतेही गेट नव्हते किंवा सुरक्षारक्षकही नसायचे. मंत्रीपदी असतानाही नेहमी त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा जथ्या असायचा. त्यांचे कौटुंबिक जीवनही मोठे वादळी ठरले. त्यांचा लैला कबिर यांच्यांशी सत्तारीच्या दशकात विवाह झाला. त्यांच्यापासून झालेला एक मुलगा आता न्यूयॉर्कस्थित बँकर आहे. मात्र कबिर कालांतरापासून जॉर्ज यांच्यापासून विभक्त झाल्या. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात जया जेटली आल्या. आठ वर्षापूर्वी आजारी पडल्यावर त्यांचा पत्नी व मुलाने त्यांचा ताबा घेतला. त्यासाठी त्यांना न्यायालयीन लढाईही करावी लागली. परंतु हे सर्व करीत असताना जॉर्ज यांना अल्झायमर आणि पार्किन्सन्स यांनी घेरले होते. त्यामुळे त्यांना काहीच कळत नव्हते. एकेकाळचा हा कामगारांचा अंगार, बंदसम्राट, घणाणाती वक्ता आता संपला आहे. जॉर्ज यांच्या निघून जाण्याने समाजवादी चळवळीची व कामगार चळवळीची कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे. या महान नेत्याला कृषीवलची अखेरची मानवंदना.
------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "अंगार निमला!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel