-->
सुरक्षिततेचे धिंडवडे

सुरक्षिततेचे धिंडवडे

संपादकीय पान गुरुवार दि. ०२ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सुरक्षिततेचे धिंडवडे
देशातील सर्वात मोठ्या असलेल्या वर्धाजवळील पुलगाव येथे असलेल्या लष्करी स्फोटकांच्या साठ्याला आग लागली आणि आपल्या सुरक्षिततेचे धिंडवडे या निमित्ताने उघड पडले आहेत. भारतीय सेनादलांसाठी बॉम्ब, हातबॉम्ब, अग्निबाण, दारुगोळा, अद्यायावत शस्त्रास्त्रांचा साठा या ठिकाणी होता. या दारुगोळा भंडारास मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीस दोन अधिकार्‍यांसह एक जवान व १३ अग्नीशामक जवान मृत्यूमुखी पडले. सध्या आग आटोक्यात आली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या भागास भेट देऊन पाहणी केली तसेच मुख्यमंत्र्यांनी याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पुलगाव हे दारुगोळा केंद्र देशातील सर्वात मोठे व आशियातील दुसर्‍या क्रमांकाचे म्हणून ओळखले जाते. सुमारे सात हजार एकरावर पसरलेले हे केंद्र संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या ठिकाणावर आहे. पाकिस्तानातील कोणतेही मिसाईल या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाही. येथे लागलेल्या आगीचे नेमके कारण अजून समजले नसले तरीही भंडार परिसरातील कुंपणालगत असलेल्या गवतास आग लागल्याने ही आग पसरत गेली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. त्याचबरोबर काही निकामी बॉम्ब फुटल्याने व अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे आग लागली असे बोलले जात आहे. याबाबत घातपात असण्याची शक्यता प्रहिल्या टप्प्यात संरक्षणमंत्र्यांनी फेटाळली असली तरीही या दृष्टीनेही तपासाची सुत्रे पाहिली पाहिजेत. केवळ घातपात नसावा असे गृहीत धरुन चालणार नाही. या आगीचे स्वरुप इतके भयानक होते की, या परिसरातील सुमारे १७ गावांमध्ये याचा झळ पोहोचली आहे. या केंद्रास लागलेली ही तिसरी आग आहे. यापूर्वी १९८९ व १९९५ साली आग लागली होती. परंतु या मागच्या आगीतून सरकारने काही बोध घेतलेला नाही असेच दिसते. मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई दिली की आपली जबाबदारी मिटली असे म्हणणे चुकीचे आहे. अर्थात येथील युध्दसामग्री साठा करण्याचे देशातील हे सर्वात मोठे भांडार असल्यामुळे येथील अग्निशामक व सुरक्षा व्यवस्था काटेकोर असल्याचे सांगण्यात येते. येथील अग्निशमनाच्या बाबी स्वयंचलित आहेत. दारुगोळा जिकडे ठेवला जातो तेथे वीजयंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे येथे शॉक शर्किट होण्याचा धोका नाही. त्याचबरोबर जिकडे दारुगोळा ठेवला आहे त्या ठिकाणीची वातानुकुलीत यंत्रणा ५० अंश सेल्सियस असते. तसेच हा संपूर्ण विभाग नो फायर झोन म्हणून विकसीत करण्यात आलेला आहे. तर मग असे झालेच कसे? हा प्रश्‍न उद्दभवतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की, निष्काळजीपणातून ही घटना घडली असावी. कारण येथे जमिनीखाली ही स्फोटके ठेवली जातात व त्यावर गवत असते. सुरक्षिततेचा हा एक उपाय असतो. शत्रुपक्षाला येते गवतच दिसत असल्यामुळे हल्ला करताना दिशाभूल होते. मात्र हेच गवत आगीला कारणीभूत ठरले असण्याची शक्यता आहे. अर्थात या आगीच्या शक्याता आहेत. मात्र याचे नेमके कारण शोधण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण यातून भविष्यातील अशा प्रकारच्या आगी आपण टाळू शकतो. जर यात अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा असेल तर त्यांना कठोर शिक्षा करण्याची गरज आहे.

0 Response to "सुरक्षिततेचे धिंडवडे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel