-->
नवी समीकरणे...

नवी समीकरणे...

बुधवार दि. 23 मे 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
नवी समीकरणे...
एच डी कुमारस्वामी यांच्या आज होणार्‍या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी सोनिया गांधी, राहूल गांधी यांच्या बरोबरीने शरद पवार, मायावती, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी, सिताराम येचुरी, चंद्राबाबू नायडू आदी बहुतांश सर्व भाजपेतर नेत्यांना आमंत्रणे गेली आहेत. यातील बहुतांशी नेते येतील असाअंदाज व्यक्त होत आहे. यातील ममता बॅनर्जी येण्याची शक्यता कमी आहे. कारण कॉग्रेस व भाजपा वगळता पक्षांची जूट व्हावी या मताच्या त्या आहेत. परंतु या शपथविधीला कोणते नेते येतात त्यावर कॉग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत भविष्यात कोणते नेते येणार त्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. अगदी पंधरा दिवसापूर्वी मोदी-शहा यांच्या जोडीला आवर घालणे सर्वच विरोधी पक्षांना कठीण वाटत होते. कर्नाटकचे निकाल लागल्यावरही राज्यपालांनी ज्या आक्रमकपणे भाजपाची तळी उचलून धरली ते पाहता येथेही मोदी-शहांची ही जोडी या राज्यातही दपटशहा करुन सत्तेत येणार असे वाटत होते. मात्र कॉग्रेसने धूर्तपणे जनता दल एस.ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि सर्व आमदार आपल्यासोबत राहातील याची हमी घेतली. कॉग्रेस व जेडीएसचे आमदार आमिशांना बळी पडले नाहीत परिणामी येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. यातून विरोधकांची एकजूट होण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल पडले. भाजपाला वाहिलेल्या प्रसार माध्यमांचे मात्र तोंड जाहीरपणे फुटले. शेवटी कर्नाटकमध्ये काँग्रेस-जदचे सरकार किती काळ चालेल? हे सरकार टिकेल का? अशा वायफळ चर्चांमध्ये प्रसार माध्यमे अडकली.  कर्नाटकचे अन्वयार्थ इतके त्रोटक नाहीत. कर्नाटकचा संदेश हा संपूर्ण भारतीय राजकीय पटलावर एक नवे समीकरण घडवू पाहात आहे, हे या निमित्ताने लक्षात घ्यायला हवे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून सामोरा आला असता, तर काँग्रेस पक्षाचे कर्नाटकातील स्थानिक नेतृत्व व दिल्लीतील हायकमांड यांनी देवेगौडा यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली नसती. अशा वेळी भाजपाने वेगाने हालचाली केल्या असत्या. कसेही करून सरकार बनवलेच असते. त्यामुळे दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून लोकांनी दिलेला कौल काँग्रेसला फायद्यातच पडला. त्याहून महत्वाचे म्हणजे, एका निवडणुकीने भाजपेतर सगळ्या पक्षांच्या आशा पल्लवीत झाल्या. गेल्या चार वर्षात विरोधक आपापल्या परीने भाजपाच्या विरोधात दंड थोपटीत होते. आपण सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र आले पाहिजे याची त्यांचा जामीव होती, परंतु त्याचा योग्य मुहूर्त सापडत नव्हता. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर झालेल्या नाट्यामुळे हा मुहूर्त सापडला. येडियुरप्पा यांच्या राजकीय कारकीर्दीची सांगता आता तरी झाली आहे. एक तर त्यांचे वय 75 आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला आताच्या घटनेमुळेचाप लागला आहे. संख्याबळ जमणे अशक्य आहे, हे माहित असताना केवळ केंद्रातील सत्ता व प्रचंड पैशाची ताकद या जीवावर वाट्टेल ते घडवून आणू शकतो, या मोदी-शहांच्या गुर्मीने येदुरप्पांचा घात केला. याचे देशातील राजकारमावर दूरगामी परिमा अपेक्षित आहेत. सध्याच्या स्थितीत भाजपाचे मित्र पक्ष त्यांची साथ सोडल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. बिहारमधील काही वर्तमानपत्रांत तर भाजपच्या या भूमिकेमुळे नितीश कुमार यांच्या गोटातही प्रचंड चिंतेचे वातावरण असून पुन्हा काही वेगळा विचार करता येईल का, याबाबत नितीश व त्याच्या काही खास पाठीराख्यांमध्ये चर्चा झाल्याचे या वृत्तांमध्ये म्हटले आहे. भाजपासोबत असलेले सध्याचे पक्ष आता एकतर त्यांची साथ सोडण्याचा विचार करतील किंवा सोबत राहिल्यास भाजपाला त्यांच्यासाठी बरेच काही सोडावे लागेल. मोदी यांचा करिश्मा व शहा यांचे निवडणूक व्यवस्थापन हे आजच्या घडीला सर्वोत्कृष्ट आहे, असे गृहित धरले तरी त्यांच्या अहंकारामुळे, त्यांच्या मग्रूरीमुळे, त्यांच्या वागणुकीतील उद्धटपणामुळे देशातील साठ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान असलेले सर्व पक्ष एकत्रित आले तर विरोधकांचे आव्हान पेलणे त्यांना कठीण जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. झाली तेवढी शोभा पुरे झाली, उरली सुरली झाकली मुठ सव्वालाखाची ठेवा, असा थेट सल्ला नागपूरहून आल्याचे भाजपच्याच गोटातील लोकांचे म्हणणे आहे. शहा व मोदी यांच्याकडे जणूकाही जादूची कांडी असून ते कुठल्याही विपरित परिस्थितीत निवडणुका एक हाती जिंकू शकतात, असा त्यांनी समज करून घेतला होता, भाजपमधीलही अनेकांचा तो झाला होता व मोदी भक्तांच्या उन्मादामुळे देशातीलही अनेकांचा तसा समज झालेला आहे. देशातील जनता एवढी मूर्ख नाही. कॉग्रेसची भ्रष्ट राजवट व सलग सत्ता हातात असल्यामुळे त्यांच्यात आलेली शिथीलता यामुळे कॉग्रेसच्या नकर्तेपणाचा फायदा घेत भाजपा सत्तेत आला. परंतु त्यांनी दिलेल्या आश्‍वासनापैकी एकाही आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही. असा स्थितीत भाजपाच्या कारभाराला जनता विटली आहे. त्यातच आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, प्रत्येक ठिकाणी दिसणारी नरेंद्र मोदींची छबी आता लोकांना खटकू लागली आहे. आपला देश हा लोकशाहीप्रधान आहे, आपल्याकडे लोकशाहीची पाळेमुळे रुजली आहेत. अशा वेळी मोदींची झुंडशाही जनतेला नकोशी झाली आहे. आपला देश इतका वैविध्यपूर्ण आहे. केवळ हिंदुत्वाची टिमकी इथे वाजवून आपले राजकीय स्वार्थ फार काळ साधता येणार नाहीत. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे व हेच आपले वैशिष्ट आहे. विविधतेतून एकता हा धागा आपल्याकडे उत्तमरित्या जुळला आहे. मात्र ही वीस उसविण्याचा प्रयत्न भाजपाने केला, यात त्यांना फारसे यश येणार नाही. आपल्या देशात सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारेच नेतृत्व टिकणार आहे.
------------------------------------------------

0 Response to "नवी समीकरणे..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel