-->
पाणी फाउंडेशनच्या कार्याला सलाम!

पाणी फाउंडेशनच्या कार्याला सलाम!

मंगळवार दि. 22 मे 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पाणी फाउंडेशनच्या कार्याला सलाम!
सध्या महाराष्ट्राच्या काही भागात पाणी फाउंडेशनच्या वतीने जलसंधारणाची कामे जोरात सुरु आहेत. यासाठी गावेच्या गावे आपला वेळ श्रमदानासाठी देत आहेत. यातून राज्यात पाणी साठविण्याची एक मोठी चळवळ उभी राहीली आहे. अर्थात याचे सर्व श्रेय चित्रपट अभिनेता अमिर खान व त्याची पत्नी किरण राव यांना जाते.
सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता आमिर खान, त्याची पत्नी किरण राव यांनी श्रमदानातून जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याचे ठरवले. हे तर सरकारचे काम आहे, असे सांगून पाणी फाउंडेशनने हात झटकले नाहीत. उलट लोकांची पाण्याची समस्या सोडविता येऊ शकते त्याचा ध्यास घेऊन या कामास सुरुवात केली. खरे तर जेथे सरकार अपयशी ठरले आहे, ते काम लोक सहभागातून करणे अतिशय अवघड आहे. पण आमिर खान आणि त्याच्या सहकार्‍यांनी, आपण हे आव्हान पेलायचेच असे ठरविले. अमिर खानसारख्या अभिनेत्याला काही कमी नाही. तो राहात असलेल्या मुंबईत पाण्याची कधीच टंचाई जाणवत नाही. परंतु त्यांच्यातील एक सामाजिक भान असलेला अभिनेता नेहमीच जागृत असतो, असे सातत्याने आपल्याला दिसले आहे. सत्यमेव जयेत या त्याच्या कार्यक्रमाला अमाप लोकप्रियता लाभली. तशीच त्यांच्यावर काही बाबतीत टीकाही झाली. अमिर खान जग बदलालयला चाला आहे, अशी अनेकांची टीका होती. परंतु या जगातल्या पाण्यासारख्या एका महत्वाच्या प्रश्‍नावर त्याने काही मोजक्या गावात जरी काम केले तरी त्याचा आदर्श या समाजासापुढे उभा राहू शकतो. प्रत्येक गोष्ट ही सरकारनेच केली पाहिजे असे नाही. आपण समाज म्हणून त्यासाठी झटू शकतो व आपल्या प्रश्‍नांची सोडवणूक करु शकतो. त्यासाठी अमिरने पाणी फाउंडेशनची स्थापना केली, त्यात आपल्या कष्टाचेही पैसे घातले व जनतेने स्वखुशीने दिलेले पैसे स्वीकारले. सर्वात महत्वाचे म्हणजे अमिरसारखा एक आघाडीचा अभिनेता तळपत्या उन्हात हातात कुदळ-फावडे घेऊन राबतो हे पाहिल्यावर अनेक हात त्यांच्या मदतीला येतात, हे चित्र फार आल्हाददायक ठरते. यातून एक लोकचळवळ उभी राहते आहे. जे लोक उगाचच पारावर गप्पा टप्पा करीत असतात, अनेकदा बिनकामाची भांडणे उकरुन काढतात तेच लोक आता एकत्र येऊन आपल्या गावातील दुष्काळ संपण्यासाठी एकत्र येतात व त्यांच्यातील दुवा हा अमिर खान असतो. अमिर खानला जनतेच्या या प्रश्‍नांची दखल घेण्याची काही गरज नाही. त्याचे चित्रपट त्यामुळे काही आमखी हिट होणार नाहीत किंवा त्यातून काही फायदा नाही. परंतु जनतेच्या प्रश्‍नांवर जिकडे सरकार पोहोचत नाही तेथे आपण जाऊन काम करण्याची अमिरची कल्पना लक्षणीय आहे. तसा अमीर खान हा संवेदनाक्षम आहे. त्याच्या पत्नीने एकदा असहिष्णुतेच्या कारणावरून देश सोडून जावेसे वाटते, अशी भावना व्यक्त केली होती. त्यावर बरेच मोहोळ उठले होते. परंतु त्याकडे लक्ष देणे टाळून त्याने जनतेच्या हितासाठी गरज भासेल तसे काम करण्याची तयारी ठेवली आहे. त्याने 2016 मध्ये पाणी फाउंडेशनची स्थापना केली. हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धी या गावांमध्ये स्वत: आणि फाउंडेशनच्या सहकार्‍यांना पाठवून माहिती जाणून घेतली. जलसंधारणातून या गावांचा कायापालट होऊ शकतो तर अन्य गावांचा का नाही, याबाबत विचार केला. त्यानंतर आमिर खानच्या पाणी फाउंडेशनने दुष्काळी भागात फिरून पावसाचे प्रमाण, उपलब्ध जलसाठे, दुष्काळ हटवण्यासाठीचे झालेले काम, अशी सर्वच माहिती मागवली. त्यानंतर महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचे आव्हान स्वीकारत आराखडा तयार केला. आमिर खानने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेली जलसंधारणाची चळवळ आजही तेवढ्याच जोमाने सुरू आहे. किंबहुना अधिक गतिमान होऊन लोकही जोडले जात आहेत. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रानंतर आमिर खान गेल्या आठवड्यात रविवार, सोमवार असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात होता. कोणताही घाईगर्दीचा कार्यक्रम न आखता नियोजनपूर्वक त्याने नंदुरबार आणि धुळे येथे श्रमदान केले. लहान मुले आणि महिलांशी संवाद साधला. गावकर्‍यांना पाणी अडवा पाणी जिरवाचे महत्त्व पटवून दिले. पाणी फाउंडेशनने केलेल्या गेल्या वर्षाच्या कामातून 10 हजार कोटी लिटरपेक्षा अधिक पाण्याचे सिंचन झाल्याचे सांगितले जात आहे. स्पर्धेतून कोणतेही काम अधिक प्रभावी आणि परिणामकारक होते. त्यामुळे फाउंडेशनने वॉटर कप स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. बारामती येथे तर कॉटनकिंग या कंपनीच्या एक हजार कर्मचार्‍यांनी व मालकांसोबत श्रमदान केले. शेकडो गावांतील 60 टक्के जरी पाणीप्रश्‍न सुटला तरी आमिर खानची कामगिरी ही कायापालट करणारी असेल. आपल्याकडे राज्यात गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे मोट्या प्रमाणावर दुष्काळ नव्हता. यंदा देखील पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आपल्याकडे अनेक भागात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. या आत्महत्येमागे जी अनेक कारणे आहेत त्यातील दुष्काळ हे एक कारण ठरावे. पाऊस कमी होत असल्यामुळे शेतीचे उत्पन्न गेल्या काही वर्षांत कमालीचे घटले आहे. प्रत्येक शेतकर्‍याला शेतीच्या जोडीने काहीतरी जोडधंदा शेतीशी निगडीत करणे गरजेचे ठरत आहे. एकीकडे ही स्थीती असताना राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या गावांमधील शेतकरी मात्र सधन होतोय. आता अमिरच्या प्रयत्नांतून या दोन गावांमध्ये धुळे जिल्ह्यातील बारीपाडाही सहभागी झाला आहे. पाणी फाऊंडेशन व अमिरच्या या प्रयज्ञांना आमचा सलाम!
----------------------------------------------------------------

0 Response to "पाणी फाउंडेशनच्या कार्याला सलाम!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel