-->
सरकारला जाग येईल का?

सरकारला जाग येईल का?

संपादकीय पान मंगळवार दि. २९ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सरकारला जाग येईल का?
नांदेडमधील महादेव कदम या शेतकर्‍याने सरकारला जाग आणण्यासाठी मंत्रालयासमोरच आत्महत्या केली. महदेवला सरकारने जाहीर केलेल्या रकमेएवढी नुकसानभरपाई दिली नाही. त्यासंबंधी त्याने चौकशी करण्यासाठी ज्यावेळी सरकारी कार्यालयात फेर्‍या घालून चपला झिजवल्या. त्यावेळी त्याला योग्य उत्तरे देण्यात आले नाही. शेवटी नैराश्येपोटी त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. परंतु या सरकारला जाग यावी यासाठी थेट मंत्रालयाच्या समोरच जाऊन आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले. असे माधव कदम हजारो आहेत, की ज्यांना परिस्थितीमुळे नैराश्य आले आहे व सरकार आपल्यासाठी काही तरी करेल असे वाटते. परंतु या सरकारने त्यांना पूर्णपणे भ्र्रमनिरास केला आहे. या दुदैवी घटनेनंतर तरी सरकारला आता जाग येईल का, असा प्रश्न पडतो. महादेवला असलेली तीन वर्षाची मुलगी व एक वर्षाचा मुलगा आज रस्त्यावर आली आहेत. महादेवने मंत्रालयासमोर जाळून घेतले व तीन दिवसानंतर त्याचे मुंबईच्या जी.टी. रुग्णालयात निधन झाले. माधव हा सरकारी निष्क्रिय यंत्रणेचा बळी आहे. सातवा वेतन आयोगानुसार पगारवाढ घ्यायला हे कर्मचारी उत्सुक आहेत परंतु आपल्या दारी येणार्‍या शेतकर्‍याला मात्र त्यांच्या शंकांचे समाधानकारक उत्तर द्यायला वेळ नसतो. याच अकार्यक्षम नोकरशाहीवर सरकारची भीस्त आहे, हेच दुदैव म्हटले पाहिजे. उन्हाचा पारा जसजसा चढू लागला आहे तसा मराठवाड्यातील दुष्काळ अधिकच तीव्र होऊ लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुष्काळाची परिस्थिती भीषणच म्हणावी अशी आहे. मराठवाड्यातील सात धरणातील साठा शून्यावर आला आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा उपसा करण्याची क्षमताच संपली आहे. यात आशिया खंडातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीचाही समावेश आहे. गेल्या वर्षी केवळ एका धरणाची पाण्याची पातळी शून्यावर गेली होती. यंदा उन्हाळा संपायला अजूनही अडीज महिने शिल्लक असताना सात धरणांची पातळी शून्यावर आली असल्याचे दुष्काळाच्या तीव्रतेची कल्पना करता येते. मराठवाड्यातील एकूण ११ धरणांपैकी जायकवाडी हे सर्वात मोठे धरण असून त्याची पाणी साठविण्याची क्षमता २,१७१ दशलक्ष क्युबिक मिटर्स एवढी आहे. याव्दारे २.३७ लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. यंदा पाऊस जूनमध्ये पडणार असे गृहीत धरल्यास तोपर्यंत येथील जवळजवळ सर्वच धरणांची पातळी शून्यावर येण्याची भीती आहे. शेतकर्‍यांची मोठी हालाखीची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे सरकार दुष्काळाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहात नाही. केवळ घोषणाबाजीच चालू आहे व कोणत्याच योजनेचा पैसा हाती पोहोचत नाही, अशा स्थितीत शेतकर्‍यांपुढे आत्महत्या करण्याशिवाय काहीच मार्ग राहिलेला नाही. शेतकर्‍यांपुढील भविष्य पूर्णपणे अंधारात आहे. लातूरमधील एक लाख शेतकर्‍यांनी आजूबाजूच्या जिल्ह्यात स्थलांतर केले आहे. पुणे, पिंपरी-चिचंवड, मुंबई येथे शेतकर्‍यांचे जथ्थेच्या जथ्थे थडकले आहेत व रोजगाराच्या शोधत आहेत. मध्यंतरी नाशिक येथील अनाथालयात दोन वेळचे खाण्यासाठी शेतकरी आल्याचे विदारक वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यानंतर नुकतेच शेतकरी असलेल्या माधव कदमने केलेली आत्महत्या यातून सरकार बोध घेणार आहे किंवा नाही, हा प्रश्न आहे.

0 Response to "सरकारला जाग येईल का?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel