-->
वाढती बेरोजगारी

वाढती बेरोजगारी

संपादकीय पान मंगळवार दि. २९ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
वाढती बेरोजगारी
नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. खरे तर मोदींच्या अच्छे दिनची आता थट्टामसकरी सुरु झाली आहे. कारण मोदी यांनी मते मिळविण्यासाठीच फक्त जनतेला मोठी मोठी आश्वासने दिली अशी ठाम समजूत आता जनतेची झाली आहे. कारण गेल्या दोन वर्षात मोदी सरकारने जनतेच्या कोणत्याच प्रश्नांची उकल केलेली नाही किंवा तसे करण्याच्या दृष्टीने पावलेही टाकलेली नाहीत. यातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे रोजगार निर्मितीचा. आपल्यासारख्या जगात तरुण असलेल्या देशात बेकारांना रोजगार दिला नाही तर त्यातून भविष्यात अनेक सामाजिक प्रश्न उदभवणार आहेत. शहरात आज खासगी क्षेत्रात काही रोजगाराच्या संधी असल्या तरीही जिकडे खरी गरज आहे त्या ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या बाबतीत बोंबच आहे. मनरेगा या योजनेअतर्ंगत ८.४ कोटी लोकांनी रोजगार देण्याची यंदा मागणी केली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही मागणी १५ टक्क्यांनी जास्त आहे. सरकारने जरी या योजनेअंतर्गत १०० दिवस काम देण्याची हमी दिलेली असली तरीही केवळ ४३ दिवसच काम उपलब्ध करुन दिले. तर मागणी केलेल्यांपैकी १९ टक्के लोकांना काम देण्यात आले नाही. अर्थात ही माहिती सरकारी कामगार विभागानेच दिली आहे. या अहवालानुसार सरकारने सत्तेत आल्यापासून तब्बल ४.३ लाख रोजगार निर्माण केले असा दावा करण्यात आला आहे. मात्र यातील बहुतांशी रोजगार हे आय.टी. उद्योगाशी निगडीत व बी.पी.ओ. क्षेत्रातील आहेत. अर्थातच हे रोजगार चांगले शिक्षण घेतलेल्यांसाठी निर्माण केले गेले. परंतु अशिक्षित तरुणांसाठी रोजगार कुठे आहे? आपल्याकडे आय.टी. क्षेत्र वाढत आहे यात मोदी सरकारने श्रेय घेण्याचे कारण नाही. कारण हे क्षेत्र गेले दोन दशके वाढत आहे. यातील रोजगाराच्या संधी या सातत्याने वाढतच गेल्या आहेत. सरकारला रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करायच्या असतील तर उत्पादन क्षेत्रातील कारखाने आले पाहिजेत. याव्दारे लाखो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देता येणार आहे. मोठ्या उद्योगांच्या जोडीला लघुउद्योग येतील व त्यातूनही रोजगार निर्मिती होऊ शकते. नवीन उद्योग कोणते आले आहेत, याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे. आजवर घोषणा भरपूर झाल्या. आता सरकारने रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचलून तरुणांच्या हाताला काम देण्याची गरज आहे. त्यातून अच्छे दिन येणार आहेत हे मोदी सरकार विसरते आहे.  
----------------------------------------------------------------

0 Response to "वाढती बेरोजगारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel