-->
आर्चबिशपांचे कनफेशन!

आर्चबिशपांचे कनफेशन!

गुरुवार दि. 24 मे 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
आर्चबिशपांचे कनफेशन!
दिल्लीचे आर्चबिशप अनिल काउटो यांनी सर्व चर्चमधील पाद्रींना लिहिलेल्या पत्रावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. आगामी 2019च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी सरकार पुन्हा निवडून न येण्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आले आहे. अर्थात असे थेट या पत्रात म्हटले नसले तरीही या पत्राचा मतितार्थ तसाच आहे. त्यामुले भाजपा चवताळून उठणे आपण समजू शकतो. मात्र ज्यावेळी गोव्यात पर्रिकर मुख्यमंत्री असताना चर्चेने त्यांच्या विजयासाठी छुपे आवाहन केले होते ते भाजपाला चालते. म्हणजे भाजपाच्या बाजूने चर्च असेल त्यावेळी ते चांगले आणि त्यांना विरोध केला त्यावेळी चर्च राजकीय हस्तक्षेप करते असे म्हणावयास हे मोकळे. आता आर्चबिशप यांनी लिहिलेल्या पत्रावर भाजपने आक्षेप घेतला आहे. जाती आणि समाजाला भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे भाजपने म्हटले आहे. भारतीय राजकारणात अशांतता निर्माण झाली आहे. आगामी 2019च्या निवडणुका लक्षात घेता, प्रार्थना आणि उपवास करा, असे आवाहन आर्चबिशप काउटो यांनी सर्व चर्चच्या पाद्रींना पत्राद्वारे केले आहे. सध्याचे अशांत राजकीय वातावरण हे राज्यघटनेतील लोकशाही सिद्धांत आणि देशाच्या धर्मनिरपेक्षतेसाठी धोकादायक बनले आहे. 2019 मध्ये आपल्या देशात नवीन सरकार असेल. त्यामुळे आतापासूनच प्रार्थना करा, असेही पत्रात म्हटले आहे. आर्चबिशपांचे हे पत्र म्हणजे त्यांनी भारतीय समाजमनाच्या वतीने केलेले हे कनफेशनच आहे. चर्चेमध्ये जाऊन एखादा माणूस आपल्यातील अपराध, राग किंवा मनातील साचलेली घटना एका पडद्याअडून फादरना संगतो. त्याबाबत त्याला पश्‍चाताप झालेला असतो. त्यांच्यासमोर पडदा असल्यामुळे मोठ्या धैर्याने आपल्या मनातील व्यथा फादरना सांगतो. फादर त्यावर मोठ्या मनाने माफ करतात व त्याने पापक्षालन कसे करावे त्याचे उत्तर देतात. आर्चबिशपांचे हे पत्र देखील असेच आहे, असे आपल्याला म्हणावे लागेल. कारण गेल्या चार वर्षात भाजपाने विकासाच्या नावाखाली हिंदुत्वाचा जो उघड प्रचार व प्रसार सुरु केला आहे, त्यामुळे आपल्या देशातील अल्पसंख्यांक दुखावले आहेत. आजवर आपण आपल्या देशात सर्वधर्मसमभाव पाळला. कॉग्रेसने अल्पसंख्यांकाचे लांगूनचालन केले असे म्हणत भाजपाने या सर्वधर्मसमभावाची खिल्लीच उडविली. आपण सत्तेत आल्यावर मात्र हा देश हिंदुत्वाचा कसा होईल त्यादृष्टीने पावले टाकली. इतिहासाची मोडतोड करण्यास सुरुवात केली. पंडित नेहरुंपासून अनेक इतिहासातील टिपू सुलतानासारख्या सेक्युलर मुस्लिम राजांना धर्मांध ठरवून त्यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला. हिंदुंना प्रिय असणार्‍या गोमातेची हत्या करण्यावर बंदी घातली. बरे कुणी गोमास खाणे म्हणजे देखील गुन्हा केला. गोमासांच्या नावाखाली अल्पसंख्यांच्या हत्या होऊ लागल्या. म्हणजे कुणी काय खावे या वैयतिक खासगी बाबेवरही सरकारचे निर्बंध आले. त्यातून देशातील अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. कॉग्रसेच्या आजवरच्या राजवटीत अल्पसंख्यांकावर हल्ले झाले नाहीत का, असा सवाल भाजपातर्फे विचारला जातो. होय झाले, दंगलीही झाल्या, परंतु त्यांच्यामागे सरकार नव्हते. आता तर सरकारी पुरस्कृत हा कार्यक्रम झाला. देशातील जनताच नव्हे तर सर्वोच्च न्यायलयातील न्यायमूर्तींनाही बाहेर येऊन जनतेपुढे आपली गार्‍हाणी मांडावी लागली. त्यामुळे आपली न्यायव्यवस्था धोक्यात आली. कर्नाटकात त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यावर भाजपाला सोयीस्कर निर्णय राज्यपालांनी घेणे. मात्र तशीच स्थिती असणार्‍या गोवा, मिझोराम, नागालँड या राज्यात मात्र नेमका उलटा निर्णय घेणे हा सर्व प्रकार म्हणजे आपल्या देशातील घटना पक्षाच्या हितासाठी कशीही वाकविण्याचे प्रकार होता. हे सर्व पाहून आर्चबिशप अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. त्याला उत्तर देताना विदेशी निधीचा ओघ थांबल्यामुळे तसेच धर्मपरिवर्तन थांबल्यामुळे बिशप हे पत्र लिहित आहेत, असे भाजपाचे म्हणणे आहे. अर्थात यात काही तथ्य नाही. गेल्या दोनशे वर्षात मिशनर्‍यांनी आपल्याकडे विविध प्रकारच्या समाज उपयोगी कामे धर्मांच्या पलिकडे जाऊन केली आहेत. शिक्षण व मेडिकल या दोन क्षेत्रात तर मिशनर्‍यांनी जे काम केले आहे, त्याचा हात कुणी धरु शकत नाही. धर्मांतर ही बाब याच्याशी जोडण्यात अर्थ नाही. धर्मांतर करण्यामागे अनेक कारणे आहेत. त्याला हिंदुधर्मातील चार्तुवर्ण व्यवस्थेपासून गरीबी असे अनेक पदर आहेत. धर्मांतर हे केवळ मिशनरी करीत आहेत, असे नव्हे तर गेल्या काही वर्षात विश्‍व हिंदू परिषदेनेही यासंबंधी काय केले आहे, ते सर्वांना ज्ञात आहे. मिशनरीच अशा प्रकारे पत्र लिहून समाजात अशांतता फैलावत आहेत, असे नव्हे तर आपल्याकडे वेळोवेळी धर्म आणि राजकारणाची गल्लत करण्यात आली आहे. पंजाबमध्ये 80च्या दशकात अतिरेकी कारवाया या सुवर्णमंदीरातून होत होत्या. मात्र या सुवर्णमंदीरावर अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई केल्याने इंदिरा गांधींना आपले प्राण गमवावे लागले. हिंदु धर्माचे अनेक नेते कोणत्या पक्षाला मतदान करा, त्याचे भगवे फतवे काढत असतातच, ते कधी खुलेपणाने तर कधी छुप्या मार्गाने काढतात. भगवानगडावर जो समाज जमतो व त्याच्यामागे राजकारणी धावतात ते काय असते. धार्मिक लांगूनचालनच नव्हे का ते? मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश सरकारने हिंदु साधूंना तर चक्क मंत्र्यांचा दर्जा दिला आहे. हे हिंदुंचे धुव्रिकरण करुन मते जमविण्याचा प्रकार नाही का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. मुल्ला मैलविंचे तर फतवे आपल्याला नवीन नाहीत. अशा प्रकारची धर्म आणि राजकारणाची सरमिस़ळ आपल्यला काही नवीन नाही. त्यामुळे फादरांनी लिहिलेल्या पत्रामुळे गहजब निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही. जे आज समाजाच्या मनात खदखदते आहे, ते आर्चबिशपांनी मांडले एवढेच.
---------------------------------------------------- 

0 Response to "आर्चबिशपांचे कनफेशन!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel