-->
सिंहगर्जनेची शताब्दी

सिंहगर्जनेची शताब्दी

संपादकीय पान बुधवार दि. ०१ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सिंहगर्जनेची शताब्दी
आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील एक ओजस्वी पान म्हणता येईल, त्या लोकमान्य टिळक यांच्या सिंहगर्जनेला ३१ मे रोजी तब्बल शंभर वर्षे पूर्ण झाली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश राजवटीने पिचलेल्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फूलिंग चेतविले त्या घटनेची मंगळवारी शतकपूर्ती झाली आहे. ३१ मे १९१६ रोजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्यासाठी अहमदनगरमध्ये घेतलेल्या सभेत लोकमान्यांनी ही सिंहगर्जना केली होती. लोकमान्य टिळकांनी स्वराज्यऐवजी होमरूल (स्वशासन) हा शब्दप्रयोग करण्याचे ठरवले होते. या चळवळीचा प्रचार व जनजागृतीसाठी टिळकांनी याच दिवशी अहमदनगर येथील कापड बाजारातील इमारत कंपनीच्या वसाहतीच्या मैदानावर ऐतिहासिक सभा घेतली होती. याला त्यावेळी जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता. नगरमधील सभेचा उत्साह पाहून टिळकांनी भारावून जाऊन या सभेत स्वराज्याची हाक दिली होती. स्वातंत्र्यलढ्यात त्यावेळी टिळक हे अग्रभागी होते. त्यांचा जहालवाद अनेकांना या लढ्याकडे खेचून घेत असे. तेव्हा टिळक युग ऐन भरात असल्याने त्यांच्याविषयी नगरकरांना मोठे आकर्षण होते. या सभेला नगरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर हीच घोषणा टिळकांची सिंहगर्जना बनली. १०० वर्षांपूर्वी मैदानात झालेल्या या सभेच्या ठिकाणी नगरमध्ये आता मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. प्रशासनाने टिळकांच्या सभेची स्मृती जतन राहावी म्हणून येथील कापड दुकानाच्या मागील बाजूस लोकमान्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला आहे. त्यामुळे टिळकांच्या आठवणी आजही नगरकरांच्या मनात घर करून आहेत. मात्र टिळकांच्या ज्या सिंहगर्जनेमुळे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यास गती आली त्याला सध्याचे राजकारणी, प्रशासन विसरले आहे असेच दिसते. अन्यथा या सिंहगर्जनेची शताब्दी मोठ्या उत्साहात साजरी झाली असती. मात्र याचा सध्याचा केंद्र व राज्यातील सरकारला पूर्णपणे विसर पडलेला दिसतो, ही खेदाची बाब ठरावी.
----------------------------------------------------------

0 Response to "सिंहगर्जनेची शताब्दी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel