-->
मांजरसेना!

मांजरसेना!

मंगळवार दि. 08 जानेवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मांजरसेना!
शिवसेनेच्या स्थापनेपासून ते बाळासाहेबांच्या काळापर्यंत शिवसेनेला आव्हान देणे ही बाब कठीण समजली जात होती. मात्र त्याकाळातही शिवसेनेत बंडखोरी झालीच. सुरवातीला शिवसेनेत बंडखोरी केलेल्यांना आपला जीव गमवावा लागला, नंतर मात्र शिवसेनेतही अन्य पक्षांप्रमाणे बंडखोरीचे वारे रुजू लागले. असे असले तरीही बाळासाहेबांचा करिश्मा व त्यांचा सहकारी पक्ष भाजपावरील शिवसेनेचा वरचश्मा कायमच होता. शिवसेनेचा वाघ योग्य वेळ आली की डरकाळ्या फोडीतच असे. त्याकाळी शिवसेना व भाजपा यांच्यात मतभेद झालेही परंतु त्यात त्यावेळी दोघांमध्ये सामोपचार, सामंजस्यपणा होता. त्यातूनच युती तब्बल पंचवीस वर्षे टिकली. या राजकीय संसाराची नोंद इतिहासात होईलही. आता मात्र बाळासाहेबांनंतरच्या पिढीत शिवसेनेच्या वाघाची पार मांजर झाली आहे. मांजराचा डोळा हा फक्त लोण्याच्या गोळ्यावर असतोे. मांजराला कुणीही झिडकारले तरी त्याला लोण्याचा गोळा खाण्यातच रस असतो. शिवसेनेचे सध्या तसेच झाले आहे. सध्या शिवसेनेचे लक्ष्य फक्त सत्तेचा लोण्याचा गोळा खाणे हेच आहे. मग कोणीही आपल्याला कितीही बोलो, कितीही झिडकारो पण लक्ष्य फक्त सत्तेचा गोळा खाणे हेच आहे. त्यामुळेच या शिवसेनेची आता मांजरसेना झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल लातूरातील पक्षाच्या मेळाव्यात स्वबळाचा नारा देत, युती नही हुई तो पटक देंगे अशी चिथावणीखोर भाषा केली आहे. असे जर विधान एखादा भाजपा अध्यक्ष बाळासाहेबांच्या काळात करु शकला असता का? परंतु आता भाजपाचा गुजराती अध्यक्ष महाराष्ट्रात येतो व शिवसेनेला आव्हान देऊन जातो ही लाजीरवाणी बाब आहे. खरे तर शिवसेनेने आता तरी सत्तेतून बाहेर पडून स्वबळावर लढण्याची घोषणेचा पुनरुच्चार केला पाहिजे होता. परंतु तसे काही शिवसेनेकडून झालेले नाही. भाजपा नेत्यांनी आता शिवसेनेला जोखले आहे. त्यांना याची पक्की कल्पना आहे की, शिवसेना सत्ता सोडणार नाही व आपल्यामागे फरफटत त्यांना यावे लागणार आहे. सध्या लोकांना दाखविण्यसाठी शिवसेना भाजपाच्या विरोधात बोलून जनमानसात आपली प्रतिमा उंचावण्याची केविलवाणी धडपड करीत आहे. भाजपाने गेल्या वेळची विधानसभा असो की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असो प्रत्येक वेळी एकटे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु शिवसेनेला नकारघंटा ही पहिल्यांदा भाजपाकडून आली. मग नाईलाज म्हणून शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढविल्या. आजवरचा हा इतिहास विसरला जाऊ शकत नाही. शिवसेनेला अमित शहा यांनी पूर्णपणे जोखले आहे, त्यामुळेच त्यांनी पटक देण्याची भाषा केली. शिवसेनेचे नेते मात्र याला उत्तर म्हणून गुळमुळीत भाषा वापरीत आहेत, हे मोठे दुर्दैव आहे. भाजपाने 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपली वेगळी चूल बांधली असली तरी नंतर सत्तेसाठी हे दोघे एकत्र आले. निवदान त्यावेळी शिवसेनेने सत्तेत शिरण्यासाठी त्यावेळी निदान बराच आटापिटा केला होता. त्यानंतर गेली पाच वर्षे उभयतांनी सत्तेतील मलिदा खात असताना एकमेकांना पाण्यातच पाहिले. शिवसेना व भाजपा यांंची युती जाली नाही तर त्याचा फटका या दोन्ही पक्षांना होणार आहे, हे नक्की आहे. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षात कितीही शिव्या दिल्या तरी भाजपा आपल्याकडे युती करायला येण्यारच हा शिवसेनेचा अंदाज होता. भाजपा नेत्यांच्या यातूनच मातोश्रीच्या वार्‍या वाढू लागल्या होत्या. यातून शिवसेनेला उगाचच गुदगुदल्या होत होत्या. परंतु गेल्या दोन वर्षात अनेक वेळा या दोन्ही पक्षांना एकमेकांचे पतंग कापण्याचे धंदे केले. खरे तर शिवसेनेने स्वबळाचा नारा देऊन आता तीन वर्षे लोटली आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे हे आपला शब्द फिरविणार नाहीत असे गृहीत धरले तर युती होऊ शकत नाही. परंतु सत्ता काबीज करावयाची असेल तर स्वबळावर जाऊन अवलक्षण करुन दाखविणे हे गणित नक्की आहे. त्यामुळे ठाकरे आपला शब्द फिरवून युतीचे घोडे अखेरच्या क्षणी दामटू शकतात, असे वाटत होते. परंतु आता अमित शहा यांच्या दम भरण्याच्या वक्तव्यामुळे युतीतील हवा निघून गेली आहे. शिवसेनेला काहीही करुन आपल्या कह्यात ठेवायचेच, असा चंग भाजपाने बांधला आहे. भर सभेत स्वबळाचा नारा आणि पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असे सांगणार्‍या उद्धव ठाकरेंना गृहीत धरुन भाजपा आपली गणिते आखत आहे. शिवसेना-भाजपाचे सध्या ताणले गेलेले संबंध हे दोघे ठरवून करीत आहेत, की शिवसेनेला खरोखरीच स्वबळावर निवडणूक लढवायची आहे, यासंबंधी आजवर सर्वच राजकीय विश्‍लेषकांचे निकाल खोटे ठरतील असा अंदाज आहे. शिवसेनेने स्वबळाची भूमिका जाहीर केल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी मातोश्री दरबारी जाऊन प्रयत्न केले. त्यावर शिवसेनेनेही आपल्या स्वबळाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. तरीही गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील एवढेच नाही तर दस्तुरखुद्द मुख्यमंत्रीही शिवसेनेला कधीकधी गोंजारताना पाहायला मिळाले. पाच राज्यातल्य निकालाचा फटका बसल्यावर भाजपाने बिहारमध्ये थोडे नमते घेतले व आपल्या सहकारी पक्षाला जास्त जागा दिल्या. इथेही तसेच होईल हा शिवसेनेचा अंदाज साफ फसला. एकीकडे शिवसेनेला आव्हान देताना भाजपाने नारायण राणेंना सांभाळण्यासाठी साखरपेरणी सुरु केली. एकूणच पाहता शिवसेनेवर कमळाबाईने जबरदस्त प्रहार करुन धन्युष्यबाण मोडण्यासाठी पावले उचलली आहेत. परंतु आता ही मांजरसेना अजूनही सत्तेच्या लोण्यावर लक्ष्य ठेऊन असल्याने कमळाबाईचा हल्ला परवतू शकत नाहीत.
--------------------------------------------------

0 Response to "मांजरसेना!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel