-->
कन्हैयाचा घणाघात

कन्हैयाचा घणाघात

संपादकीय पान शनिवार दि. १६ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कन्हैयाचा घणाघात
जे.एन.यू.तील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याने आपल्या आपल्या नागपूरमधील दौर्‍यात भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर घणाघाती टिका एखाद्या ज्येष्ठ राजकीय नेत्याप्रमाणे केली आहे. जेलमध्ये जावून आल्यापासून कन्हैयाकुमार हा राजकीयदृष्टया आणखीनच परिपक्व झाला आहे असे दिसते. त्याने नागपूरात केलेले भाषण हे देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर हल्ला करणारे तर होतेच शिवाय सध्याच्या भाजपा सरकारचे खरे स्वरुप उघड करणारे होते. आपण ज्या विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधीत्व करतो तीची स्थापना १९३४ साली करण्यात आली आहे. या संघटनेने देशाच्या स्वातंत्र्य लढात महत्वाचे योगदान दिले आहे. अशा या संघटनेत काम करणार्‍या आम्हा कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा आरोप कसा करता हा कन्हैयाने केलेला सवाल देशाच्या गृहमंत्र्यांना चांगलाच झोंबणारा आहे. सभा सुरु होताच कन्हैयावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने चप्पल भिरकावली. परंतु त्यावेळी प्रसंगावधान ओळखून कन्हैयाने त्यांना चांगलेच उत्तर दिले. माझ्यावर एक चप्पल भिरकावू नकात चपलेचा जोड फेका मला वापरता येईल, हे त्याचे आव्हान विरोधकांचे राजकीय वस्त्रहरण करणारे होते. चप्पल फेकून तुम्ही कोणता विकास करणार आहात हा त्याने केलेला सवालही खराच आहे. नागपूरची ही भूमी गी संघाची नाही तर डॉ. बाबासाहेबांची आहे. तसेच गुजरात हा मोदींचा नाही तर गांधींजींचा आहे, हे त्याचे म्हणणेही त्याच्या राजकीय परिपक्वतेचे द्योतकच म्हटले पाहिजे. आमचा लढा सध्याच्या सरकार विरोधी नाही तर सध्याच्या समाजव्यवस्थेविरुध्द आहे, नरेंद्र मोदी सरकारने खोटी आश्‍वासने देऊन जनतेची जी दिशाभूल केली आहे त्याविरुध्द आमची लढाई आहे, ही त्याची हाक तरुणांना प्रेरित करणारी आहे. गेल्या वर्षात भाजपाने देशातील विविध विद्यापीठांमध्ये संघ परिवारातील विद्यार्थी संघटनांना त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले आहेत. जे.एन.यू.मध्ये झालेला संघर्ष हा त्याचाच एक भाग आहे. जे.एन.यू.मध्ये अ.भा.वि.प.ला अशात प्रकारे बळ देण्यासाठी गृहमंत्रालयाने पोलीसी बळ वापरुन डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांना चेपण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच कन्हैयाला देशद्रोही ठरविण्याचा घाट घातला गेला. गावात एखादा गुन्हा झाला तर तुम्ही गुन्हेगाराला अटक करणार की सरपंचाला असा कन्हैयाकुमारने सवाल करुन गृहमंत्रालयाला न्यायलयाच्या कटहर्‍यात उभे केले आहे. जे.एन.यू.मध्ये असेच नेमके झाले आहे. तेथे कन्हैयाकुमारची सभा सुरु असताना पाठीमागून देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या त्याबद्दल कन्हैयाला अटक करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. मात्र यासंबंधी न्यायालयानेच सरकारला झापले व विचारले की, देशद्रोहाचा अर्थ ठाऊक आहे का? शेवटी कन्हैयाला सहा महिन्याच अंतरिम जामिन देण्यात आला. जर कन्हैयाचा हा गुन्हा न्यायालयाला मान्य असता तर त्याला देशद्रोहासारख्या गंभीर आरोपात जामिन मिळाला नसता. आता कन्हैया तरुणांसाठी हिरो झाला आहे. हे हिरोपद त्याला सरकारनेच आपल्या अविचारातून बहाल केले आहे. आज कन्हैया तरुणांच्या मनातले बोलत देशभर फिरतो आहे. तरुणांना तो आपला आवाज वाटतो. कन्हैयाचा हा राजकीय घणाघात सरकारला महाग पडेल हे नक्की.

0 Response to "कन्हैयाचा घणाघात"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel