-->
वरुणराजाची खूषखबर

वरुणराजाची खूषखबर

संपादकीय पान शुक्रवार दि. १५ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
वरुणराजाची खूषखबर
राज्यातील मराठवाडा व विदर्भात दुष्काळाने रौद्र रुप धारण केले असताना व ठिकठिकाणी उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना पावसाची यंदा खूषखबर आली आहे. गेलल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस समाधानकारक असेल असा पहिला अंदाज तरी हवामानखात्याने जाहीर केला आहे. त्यामुळे यंदा निसर्ग आपल्यावर खूष आहे असचे दिसते. गेले सलग तीन वर्षे पाऊस समाधानकारक नव्हता. त्यातच गेल्या दोन वर्षात पावसाची सरासरी कमीच होत होती. यंदा मात्र या परिस्थितीमध्ये सुधारणा होणार असे दिसते आहे. सध्याचा हवामानखात्याचा अंदाज एैकून निदान शेतकरीराजा सध्या तरी सुखावला आहे. गेल्यावर्षी सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने पावसाळ्यापूर्वी वर्तविला होता. पण, प्रत्यक्षात सरासरीच्या ८६ टक्केच पाऊस पडल्यामुळे देशातील दहापेक्षा अधिक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ अनेक नागरिकांवर ओढवली आहे. या स्थितीत यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वांसाठीच खुशखबर आहे. यंदाचा मान्सून १०४ ते ११० टक्क्यांच्या दरम्यान राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. कार्यात्मक पद्धतीने सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पाऊस सरासरीपेक्षा जास्त असल्याने महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. मराठवाड्यात सध्या तीव्र दुष्काळ आहे. गेल्यावर्षी देशात सरासरीच्या १४ टक्के कमी पाऊस झाला होता. यंदा तो सरासरीच्या सहा टक्के जास्त होण्याचा अंदाज आहे. नैऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीवर एल निनोचा प्रभाव पडतो. यंदा एल निनोचा प्रभाव कमी होत असून, त्याचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. देशात सर्वत्र चांगला पाऊस पडण्याची शक्यता असून, कोणत्या विभागात किती पाऊस पडू शकतो, याचा अंदाज पुढील महिन्यात वर्तविण्यात येईल. मान्सूनच्या वाटचालीवर प्रभाव टाकणार्‍या अनेक घटकांचा अभ्यास करून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रत्यक्ष मॉन्सून सुरु होण्याअगोदर हवामानखात्यातर्फे तीन अंदाज वर्तविले जातात. यातील पहिल्या अंदाजानुसार पावसाचा कल समजतो. अंतिम कल हा पावसाळ्याच्या तोंडावर जाहीर केला जातो. यंदा सरासरीपेक्षा पाच ते दहा टक्के जास्त पाऊस पडणार ही बाब समाधानकारक म्हटली पाहिजे. त्यामुळे पुढील वर्ष दुष्काळमुक्त नाही तरी निदान सध्या एवढा दुष्काळ नसेल असे म्हणता येईल.
-----------------------------------------------------------------------------


0 Response to "वरुणराजाची खूषखबर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel