-->
रायगडाचाही समावेश करा

रायगडाचाही समावेश करा

संपादकीय पान शुक्रवार दि. १५ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
रायगडाचाही समावेश करा
सरकारने कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्याच्या घोषणेचे स्वागत करीत असताना या महामंडळात केवळ सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोनच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. रायगड जिल्हा हा कोकणाचाच भाग असताना त्याला वगळण्याचे प्रयोजनच काय? नव्या प्रस्तावित पर्यटन महामंडळात रायगडाचा समावेश करुन या महामंडळाची व्याप्ती तीन जिल्ह्यासाठी ठेवावी. सध्या खरे तर रत्नागिरी व सिंधुदुर्गपेक्षा जास्त पर्यटक हे रायगड जिल्ह्यात येतात. रायगडातही पर्यटनाच्या दृष्टीने अनेक पायाभूत सुविधा होण्याची आवश्यकता आहे. रायगडाचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई, पुणे हे दोन्ही अंतर जवळपास सारखेच असल्यामुळे या दोन्ही शहरातील पर्यटकांचा ओढा इथे जास्त असतो. रायगड जिल्ह्याला जसा निसर्गसौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा लाभला आहे तसेच अनेक पर्यटन स्थळेही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळेच मांडव्यापासून ते किहीम, वरसोली, अलिबाग, नागाव ते मुरुड पर्यंतची ही किनारपट्टी प्रत्येक सुट्टीत गजबजलेली असते. त्याचबरोबर छत्रपतींच्या वास्तव्याने पानव झालेला रायगड किल्ला, डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी इतिहास घडविला ते महाडचे चवदार तळे, थंड हवेचे ठिकाण, माथेरान, कर्नाळा व फणसाड अभयारण्य, चौलची पुरातन देवळे, दक्षिण काशी म्हणून ओळखली गेलेले हरिहरेश्‍वर, अलिबाग व त्याच्या परिसरातील अष्टागरे, त्याचबरोबर जिल्ह्यात असलेले विविध लहान-मोठे ३५ किल्ले, जंजिराचा किल्ला, नुकतेच सुरु झालेले अलिबागमधील जैवविविधता उद्यान हे विविध वयोगटातील पर्यटकांना साद घातील असतात. सध्या सरकारने हाती घेतलेला मुंबई-गोवा चौपदरीकरणातील पहिल्या टप्पा रायगड जिल्ह्यातून पूर्ण होईल. तसेच अलिबाग-वडखळ हा रस्ता सुमारे ६०० कोटी रुपये खर्च करुन चौपदरी होणार आहे. सध्या मुंबई ते मांडवा ही बोटसेवा पावसाळ्यात चार महिने बंद ठेवावी लागते. मात्र आता १७० कोटी रुपये खर्च करुन ब्रेक वॉटर तंत्रज्ञान आणून ही बोट सेवा बारमाही होईल. या प्रकल्पासाठी जागतिक निविदा काढण्यात आल्या आहेत. असे झाल्यास रायगड जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढेल. सर्वात महत्वाचे म्हणजे, मुंबई-पुण्याकडील पर्यटकाला एक दिवसाचे पर्यटनाचे ठिकाण म्हणून अलिबाग किंवा त्याच्या भोवतालीचा परिसर हा उत्तम ठरतो. सिंधुदुर्ग जिल्हा हा गोव्याला लागून असल्याने तेथे चांगल्या पायाभूत सुविधा झाल्यास गोव्याचा पर्यटक तेथे येऊ शकेल. तसेच रायगड जिल्हा मुंबई-पुण्यापासून जल व रस्त्याच्या मार्गाने चांगल्यारितीने जोडल्यास येथील पर्यटकांची संख्या वाढू शकते. येथे सध्या हजारो हातांना पर्यटनाने रोजगार दिली आहे. जर चांगल्या पायाभूत सुविधा दिल्यास लाखो लोक पर्यटनावर जगू शकतील. आज जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून असते. आपल्यासारख्या किनारपट्टीच्या कोकणाच्या भागात तर ही संकल्पना चांगलीच प्रत्यक्षात उतरु शकते. त्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. खास कोकणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे उतलेले पाऊल हे स्वागतार्ह ठरावे. मात्र त्यात रायगड जिल्ह्याचा समावेश करावा.

0 Response to "रायगडाचाही समावेश करा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel