-->
इंटरनेटचे विस्तारलेले मायाजाल

इंटरनेटचे विस्तारलेले मायाजाल

सोमवार दि. 07 जानेवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
इंटरनेटचे विस्तारलेले मायाजाल
देशात आता इंटरनेटधारकांची संख्या 2018 च्या अखेरीस आता 50 कोटींवर पोहोचली आहे. 2016 पासून गेल्या दोन वर्षात इंटरनेटधारकांची संख्या 65 टक्क्यांनी वाढल्याने ही क्रांती आता एका नव्या टप्प्यावर आली आहे. आता देशात 56 कोटी इंटरनेधारक असून त्यातील 54 कोटी कनेक्शन्स मोबाईलव्दारे आहेत तर दोन कोटी ब्रॉडबँडव्दारे आहेत. इंटरनेट सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या राज्यात महाराष्ट्, आंध्रप्रदेश, तामीळनाडू, गुजरात, कर्नाटक यांचा समावेश होतो. या पाच राज्यांत एकूण कनेक्शन्सपैकी 36 टक्के आहेत. त्यामुळे या राज्यातील इंटरनेट वापर किती जास्त आहे त्याची कल्पना येते. दोन दशकापूर्वी आपल्याकडे मोबाईल आले आणि देशात दळणवळणाचे एक नवे युग सुरु झाले. त्यापूर्वी राजीव गांधी यांनी संगणक क्रांतीचा पाया घातला होता. तसेच टेलिफोन क्रांतीची पायाभरणी करुन गावोगावी टेलिफोन बुथ पोहोचविले होते. परंतु झपाट्याने हे तंञ़ज्ञान मागास झाले व त्याची जागा मोबाईलने घेतली. मोबाईलपूर्वी आलेल्या पेजरने आपले बस्तान बसविण्यापूर्वीच ते तंञज्ञान जुने झाले. तीन दशकांपूर्वी टेलिफोनवरुन संपर्क करणे ही एक मोठी बाब समजली जायची. स्वातंञ्यानंतर चार दशके लोटली तरी आपल्याला स्कूटरसाठी तीन-चार वर्षे प्रतिक्षा यादी असायची. दूधासाठी रेशनिंग होते. टेलिफोनची प्रतिक्षा यादी तर दहा-दहा वर्षे असायची. आता या सर्व गोष्टी आपल्याला सहजरित्या उपलब्ध होत असल्याने त्याचे महत्व वाटत नाही. गेल्या 70 वर्षात विकास झाला नाही अशी बोंब मारणार्‍यांना हा विकास नाही तर काय, असा सवाल कराववासा वाटतो. तीन दशकांपूर्वी  टेलिफोन, फ्रीज, टी.व्ही. घरात असणे ही एक प्रतिष्ठेची बाब मानली जायची. पु.ल.देशपांडेच्या बटाट्याच्या चाळीतील वर्णन केलेला मध्यमवर्गीय आताच्या समाजरचनेत तो गरीबीतच मोडला गेला असता, अशी परिस्थिती होती. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्टीयीकरण केले आणि सर्वसामान्यांना कर्जाचे दरवाजे खुले झाले. बँकेत मध्यमवर्गीयांना नोकर्‍या मिळाल्या आणि या वर्गामध्ये स्थैर्य आले. लोकांच्या हातात पैसा खुळखुळू लागला तो इथूनच. माञ 90 मध्ये उदारीकरणाचे युग सुरु झाले आणि देशाचे अर्थकारण पालटू लागले. राजीव गांधीनीं जी टेलिफोन क्रांती केली त्याचा पुढील अध्याय अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमधील दळणवळण मंञी प्रमोद महाजन यांनी सुरु केला. मोबाईलचे युग सुरु झाले आणि दळणवळण झपाट्याने बदलले. सुरुवातीला महाग असलेला मोबाईल प्रत्येकाच्या हातात आला. त्याकाळी धिरुभाई अंबानींनी या बदलत्या व झपाट्याने वाढणार्‍या उद्योगाला नेमके हेरले व करलो दुनिया मुठ्ठीमें अशी कॅचलाईन देत अतिशय माफक दरात मोबाईलचे कॉल दर दिले. त्यावेळी धीरुभाईंचे म्हणणेच होते की, पोस्ट कार्डाच्या दराएवढा मोबाईलचा कॉलिंग दर आम्ही देऊ. अर्थात हे त्यांनी खरे करुन दाखविले. त्यानंतर केवळ एका दशकाच्या आतच धीरुभाईंचे थोरले चिरंजीव मुकेश अंबानींनीं तर जवळजवळ एक वर्ष मोबाईल लोकांना फुकटच दिला. यातूनच खर्‍या अर्थाने मोबाईल घरोघरी अगदी गावोगावी पोहोचले. आता तर मोबाईल उद्योगाचे चिञ पूर्णपणे पालटले आहे. या उद्योगात मोठी चहलपहल गेल्या दोन दशकात झाली आहे. गंमतीचा भाग म्हणजे मोबाईल सुरु झाला त्यावेळी सुरु झालेल्या तीन कंपन्या आज अस्तित्वातच राहिलेल्या नाहीत. त्यातल्या त्यात एअरटेल ही सर्वात जुनी कंपनी ठरावी. अनेक उद्योगसमूहांनी यात उड्या टाकून नशिब आजमाविण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. टाटा उद्योगसमूहाचे याबाबत उदाहरण देता येईल. टाटांनी देखील या उद्योगात कंपनी स्थापन केली होती, पण त्यात त्यांना काही यश लाभले नाही. टाटा कशाला व्होडाफोनसारख्या या उद्योगातील बहुराष्टीय कंपनीला देखील भारतातून गाशा गुंडाळावा लागला. आता भविष्याचा विचार करता इंटरनेट हे माध्यम सर्वच बाबतीत महत्वाचे ठरणार आहे. सध्या यावर आधारित अनेक उद्योग सुरु झाले आहेत व भविष्यात त्यांचे मोठे मायाजाल तयार होणार आहे. अनेक रोजगाराच्या संधी यातून उपलब्ध होणार आहेत. इंटरनेटव्दारे अनेक बाबी सोप्या झाल्या आहेत. घरबसल्या तुम्ही काही वस्तू खरेदी करु शकता. एवढेच कशाला संगणकाची एक कळ दाबल्यावर तुम्हाला पाहिजे त्या माहितीचा खजाना उपलब्ध होऊ शकतो. पूर्वी तीच माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला काही तास किंवा दिवसदिवस खर्ची घालावे लागत होते. सोशल मिडियासारखे एक प्रभावी माध्य इंटरनेटमुळेच जन्माला आले आहे. त्यामाध्यमाचा वापर चांगल्या व वाईट गोष्टींसाठीही करता येतो. निवडणूक प्रचार याव्दारे करुन निवडणूक जिंकता येते हे नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्म्प यांनी दाखवून दिले आहे. आज आपल्याकडे इंटरनेटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु आपल्याकडे जिकडे नेट आहे तिकडे वीज नाही व वीज आहे तिकडे इंटरनेट नाही अशी स्थिती आढळते. त्यामुळे ग्रामीण भागात अनेकदा गोंधळ उडतो. सरकारने कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन भरण्याचा फतवा काढला होता, परंतु अशिक्षीत शेतकरी, उद्दाम नोकरशाही, इंटरनेट व लाईटचा लपंडाव यामुळे शेतकर्‍यांचे हाल कसे झाले हे आपण पाहिले आहे. हे सर्व थाबवायचे असेल तर केवळ इंटरनेटचा प्रसार झाला म्हणून भूरळून जाण्यात अर्थ नाही. त्यासोबत त्याला पोषक असणार्‍या पायाभूत सुविधाही देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविणे आवश्यक आहे. तरच या इंटरनेटच्या क्रांतीचा फायदा सर्वांना होऊ शकतो. हे या सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे.
----------------------------------

0 Response to "इंटरनेटचे विस्तारलेले मायाजाल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel