-->
गांधीवादी विचारवंत / क्रिकेटचे भीष्माचार्य

गांधीवादी विचारवंत / क्रिकेटचे भीष्माचार्य

शुक्रवार दि. 04 जानेवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
गांधीवादी विचारवंत 
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, व्यासंगी लेखक, प्रभावी वक्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे 91 वर्षी निधन झाल्याने देश एका महान गांधीवादी नेत्याला हरपला आहे. हृदयविकाराचा धक्का आल्यामुळे त्यांच्यावर एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु त्यातच त्यांची प्राणज्योत मालविली. न्यायदानाच्या क्षेत्रात असतानाही विधायक राजकारणाविषयी वाटणारी कळकळ, सुधारणावादी असूनही संस्कृती व मूल्ये यांच्याविषयीचा अभिमान, काळाबरोबर बदलण्याची क्षमता असूनही गांधी विचारांवर श्रद्धा, ज्ञानवंत असूनही सर्वज्ञतेच्या ऐटीपासून दुरावा, कायद्याच्या क्लिष्ट विषयात गढून गेले असतानाही सभा-संमेलने, व्याख्याने, परिचर्चा यासारख्या कार्यक्रमात सक्रिय भाग घेण्याची वृत्ती आणि कौटुंबिक जबाबदार्‍यांसोबत सामाजिक बांधिलकीचे भान यासारख्या विविध पैलूंनी न्या. धर्माधिकारी यांचे आयुष्य समृद्ध आणि संपन्न होते. धर्माधिकारी यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूर (सध्या छत्तीसगड) येथे नोव्हेंबर 1927 रोजी झाला होता. त्यांचे बालपण स्वातंत्र्यलढ्याने भारावलेल्या वातावरणात गेले. त्यांचे वडील आचार्य दादा धर्माधिकारी हे स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. आई दमयंती यांचादेखील गांधीवादावर विश्‍वास होता. त्यामुळे त्यांच्यावर लहाणपणीच गांधीवादी विचार व समाजसेवेचे संस्कार झाले होते. लहाणपणीच त्यांच्या मनावर गांधीवादी विचारांचे संस्कार झाले व त्यांनी अंतिम श्‍वासापर्यंत हे विचार जपले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक सेवेत वाहून घेतले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजनागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबी पदवी प्राप्त केली. ऑक्टोबर 1956 रोजी त्यांना सनद मिळाली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय केला. न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत तब्बल 17 वर्षे न्यायदानाचे कार्य केले. काही दिवस त्यांनी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून देखील काम केले होते. त्यांनी महिला, आदिवासी, लहान मुले, मनोरुग्ण, बंदिवान आदींच्या मूलभूत अधिकारांवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले. त्यांचे अनेक निकाल हे क्रांतिकारी होते. आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर दिलेला त्यांचा निर्णय फार गाजला. त्या निर्णयामुळे ठोस पुरावे नसलेल्या स्थानबद्ध आंदोलकांना सरकारला सोडावे लागले होते. 2014 मध्ये धर्माधिकारी यांच्या समितीने बारबालांवर पूर्णपणे बंदी आणण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. अशा प्रकारचे न्यायदानाचे तसेच समितीवर राहून अनेक समाजहिताचे निर्णय घेतले होते. त्यांनी गांधीवाद जसा अभ्यासला होता तसाच त्याचा प्रत्यक्षात उपयोगही समाजहितासाठी केला होता, हेच त्यांचे वैशिष्ठ होते. 
क्रिकेटचे भीष्माचार्य
क्रिकेटवीर सचिन तेंडूलकरपासून अनेक क्रिकेटपटू ज्यांनी घडविले त्या रमाकांत आचरेकर यांची प्राणज्योत मालवल्यामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरणे स्वाभाविकच आहे. सरकार त्यांच्या पार्थिवाला अत्यंस्कार शासकीय इतमामात देण्यास विसरल्याने त्यांच्या शिष्यांमध्ये नाराजी पसरणे स्वाभाविकच होते. क्रिकेटचे भीष्माचार्य असे ज्यांना संबोधिले जायचे त्या आचरेकर सरांच्या ठायीठायी क्रिकेट भिनलेले होते. आयुष्यभर त्यांनी अनेक नामवंत क्रिकेटपटू घडविले. रणजीपासून ते कसोटीपर्यंत अनेक मुले त्यांनी तयार केली. यातील त्याचा एक हिरा सचिन होता. आचरेकर सरांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, संजय बांगर, बलविंदर संधू, रमेश पोवार यासारखे अनेक खेळाडू घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरुन योगदान दिले. त्यांच्या या कामाचा सन्मान म्हणून सरकारने त्यांना द्रोणाचार्य, पद्मश्री यासारख्या पुरस्कारांनी केंद्र सरकारने सन्मानित केले होते. त्यांची जन्मभूमी मालवण असली तरीही शिवाजी पार्क ही त्यांची कर्मभूमी होती. वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे 1943 सालापासून त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, मात्र क्रिकेट प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द अधिक गाजली. 1945 मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबकडून क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. आचरेकर सर केवळ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. 1963-64 साली त्यांनी ऑल इंडिया स्टेट बँकेचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता. आचरेकर गुरुजींनी शिवाजी पार्कात कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली होती. सचिनने लहानपणी जेव्हा क्रिकेटमधील गती ओळखली, तेव्हा सचिनचा भाऊ अजित तेंडुलकरने त्याची गाठ आचरेकर गुरुजींशी घालून दिली. सचिनच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला आचरेकर सर त्याला प्रॅक्टिससाठी मुंबईतल्या वेगवेगळ्या मैदानांवर घेऊन जात असत. सचिनने चांगला परफॉर्मन्स दिला आणि गुरुजी प्रभावित झाले, तर त्याला बक्षीस म्हणून वडापाव द्यायचे, असे बोलले जाई. आचरेकरांच्या तालमीत घडलेल्या सचिनने विक्रमांचा डोंगर रचला. तेंडुलकर-आचरेकर ही गुरु-शिष्याची जोडगोळी जगभरात गाजली. जागतक किर्तीचा हा क्रिकेटपटू त्यांनी घडविल्यामुळे अनेकदा सचिनचे गुरु म्हणून ते अनेकांना ओळखीचे झाले होते. शिष्याच्या पराक्रमामुळे गुरुची ओळख होणे हा क्वचितच योगायोग ठरावा. क्रिकेट प्रशिक्षक म्हणून 1990 साली त्यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना 2003 मध्ये जाहीर झाला होता. 2010 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री प्रदान करुन गौरवण्यात आले होते. त्यांचा क्लब हा उत्कृष्ट क्रिकेटपटू घडविण्याचा कारखानाच होता. परंतु येथे ते विद्यार्थ्यांकडून कठोर प्ररिश्रम करुन घेत. त्यातून त्यांनी अनेक क्रिकेटपटू घडविले. म्हणूनच त्यांची ओळख क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणून क्रिकेटप्रेमींमध्ये होती.
------------------------------------------------------------------

0 Response to "गांधीवादी विचारवंत / क्रिकेटचे भीष्माचार्य"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel