-->
संपादकीय पान शनिवार दि. ०६ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
झपाट्याने विस्तारणारी ऑनलाईन बाजारपेठ
------------------------------------------------------
ऑनलाइन खरेदी-विक्री करणार्‍या कंपन्यांचे व्यवहार अलिकडेपर्यंत आपल्या गावीही नव्हते, मात्र इंटरनेटचा प्रसार मोबाइलच्या मार्गाने वेगाने होऊ लागला आणि फ्लिपकार्ट, अमेझॉन, स्नॅपडील आणि अलिबाबा ही नावे किमान शहरी तरुणांच्या तोंडी सतत ऐकू येऊ लागली. आता तर शहरांपाठोपाठ लहान व मध्यम आकारातील शहरातही ऑनलाईन खरेदी वाढू लागली आहे. जागतिकीकरणाचे स्वागत करावे की त्याला विरोध करावा, हे भारतीय समाजाला सुरुवातीस कळू शकले नाही, मात्र त्याचे आक्रमण किंवा अपरिहार्यता आज सर्वांनाच स्वीकारावी लागली. तसेच ऑनलाइन व्यवहारांचे होणार आहे, अशीच सर्व लक्षणे दिसू लागली आहेत. बंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या फ्लिपकार्ट कंपनीने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एक अब्ज डॉलर म्हणजे सहा हजार कोटी रुपयांचे भांडवल मिळवले आहे. आणि त्यानंतर २४ तासांच्या आत अमेझॉन या अमेरिकी कंपनीने भारतात विस्तारासाठी दोन अब्ज डॉलर म्हणजे १२ हजार कोटी रुपये भांडवल मिळवले. भारतीय क्रयशक्तीची किंमत जगात आज तिसर्‍या क्रमांकाची आहे आणि अशा महत्त्वाच्या बाजारावर जागतिक कंपन्यांचे बारीक लक्ष आहे. अनेकांची मुले इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी करायला लागली आहेत, त्यालाही आता दोन-तीन वर्षे उलटून गेली आहेत. एवढेच नव्हे, तर संगणकाच्या स्क्रीनवर वस्तूंची दिसणारी ती रेलचेल, वैविध्य आणि दरांत सूट पाहून सर्वांनाच ऑनलाइन खरेदी आकर्षून घेणार आहे. हे सर्वांनाच मान्य होईल, असे नाही; पण ऑनलाइन विक्री करणार्‍या कंपन्यांनी आपल्या सर्वांची नजीकच्या भविष्यातला ग्राहक म्हणून मोजणी करूनही टाकली आहे! भारतातील सध्याचे ऑनलाइन रिटेल मार्केट १२ हजार कोटी रुपयांचे आहे. मात्र, गेल्या १५ दिवसांत फ्लिपकार्ट आणि अमेझॉनने १८ हजार कोटी रुपयांचे भांडवल त्यासाठी सज्ज ठेवले आहे! आता त्यातून वस्तूंचे साठे करण्यास कोठारे बांधली जातील, आकर्षक जाहिराती केल्या जातील आणि तुम्ही ऑनलाइन जाताच तुमच्या आवडीच्या आणि गरजेच्या वस्तू तुम्हाला मोबाइल तसेच संगणकाच्या पडद्यावर खुणावू लागतील. अठरा हजार कोटी रुपये म्हणजे दिल्ली राज्याच्या सध्याच्या अर्थसंकल्पाच्या निम्मी रक्कम, तर भारतातील सर्वात श्रीमंत मानल्या गेलेल्या आणि दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबई महापालिकेच्या बजेटच्या फक्त १० हजार कोटी रु.नी कमी किंवा पुणे महापालिकेच्या बजेटच्या हा निधी तब्बल चौपट आहे! भारतातील ऑनलाइन व्यवहार कसा राक्षसी वेगाने  वाढतो आहे, यासंबंधीची जी आकडेवारी समोर येते आहे, ती पाहिल्यावर भारत आणि भारतीय नागरिक कसे बदलून चालले आहेत, याची चुणूक पाहायला मिळते. अलिकडेच एका चिनी मोबाईलचे बुकिंग अशाच प्रकारे ऑनलाईन विक्रीव्दारे मोठ्या प्रमाणात जाले. काही तासातच या मोबाईलचे लाखो सेट विकले गेले. त्यावरुन भारतात ऑनलाईनचा ग्राहक किती झपाट्याने वाढत चालला आहे हे दिसते.
भारताचे ऑनलाइन रिटेल मार्केट सध्या १२ हजार कोटी रु. असून ते २०२० मध्ये १९ हजार कोटी रु.वर जाणार, असा अंदाज आहे. स्मार्टफोन वापरणार्‍यांची संख्या सध्या साडेसहा कोटी असून २०२० अखेर ती चौपट म्हणजे २५ कोटींवर जाईल. या फोनमार्फत ऑनलाइन व्यवहार सहजपणे करता येतात. फ्लिपकार्टचा निम्मा व्यवसाय सध्या स्मार्टफोनद्वारे होतो आणि अमेझॉननेही त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ऑनलाइन विक्रीत होत असलेली ही वाढ लक्षात घेता रिलायन्स रिटेल, टाटा, आदित्य बिर्ला आणि फ्युचर ग्रुप हेही या स्पर्धेत उतरतील आणि ऑनलाइन विक्री करणार्‍या कंपन्यांशी करार करतील. क्रयशक्ती वाढत चाललेल्या भारतात ५०० अब्ज डॉलर किमतीच्या वस्तू विकल्या जाणार असून त्यात ऑनलाइन विक्रीचा वाटा वाढवण्याची मोठी संधी या क्षेत्रातील कंपन्या शोधत आहेत. एकूणच काय तर झपाट्याने बाजारपेठा बदलत आहेत व भविष्य सद्या ऑनलाईन बाजारपेठेचे आहे.
---------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel