-->
संपादकीय पान शुक्रवार दि. ०५ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
जपान पोखरुन उंदीर
-----------------------------------
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जपान दौर्‍यातून बरेच काही साध्य झाल्याचा गवगवा केला जात आहे. परंतु अनेकदा प्रसार माध्यमे पुरेसा अभ्यास न करता एकतर्फी विचार करुन आपले लिखाण करत असतात. पंतप्रदानांच्या जपान दौर्‍याचेही असेच झाले आहे. पंतप्रधानांच्या चार दिवसांच्या या दौर्‍यात नेमके हाती काय लागले याचा विचार केला पाहिजे. एक बुलेट टे्रनसाठी तंत्रज्ञान वगळता तसे काहीच हाती लागले नाही. म्हणून डोंगर पोखरुन उंदीर या म्हणीच्या धर्तीवर जपान पोखरुन मोदींनी उंदीर बाहेर काढला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एक महत्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की गेल्या पाच वर्षात जपानची आर्थिक ताकद क्षीण झालेली आहे. त्यांची अर्थव्यवस्था सुस्त झालेली आहे. असा वेळी त्यांना आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देईल असा एखादा सहकारी देश पाहिजेच होता. मोदींनी हा हात पुढे केल्याने जपानला एक चांगला साथीदार मिळाला. त्यामुळे जपानला आपली गरजच होती. अशा वेळी आपण जपानकडून बरेच काही काढू शकलो असतो, मात्र तसे झालेले नाही. जपानने आनंदाने बुलेट ट्रेनसाठी सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे. परंतु भारताने मुंबई-अहमदाबाद या मार्गासाठी बुलेट टे्रन सुरु करणे किती व्यवहार्य आहे ते पुन्हा एकदा तपासले पाहिजे. कारण त्यासाठी जो अवाढव्य खर्च येणार आहे त्यात रेल्वेचे अनेक खोळंबलेले प्रकल्प मार्गी लागू शकतात. केवळ भावनेच्या आहारी जाऊन बुलेट ट्रेनचा निर्णय घेणे चुकीचे ठरेल. असो. मोदींचे बुलेट ट्रेनचे स्वप्न आता जपान पूर्ण करणार आहे. मोदींना ज्या प्रकारे या देशातील जनतेने विकासाच्या प्रश्‍नावर बहुमताने सत्ता हाती दिली तसेच जपानमधील अस्थिरता संपविण्यासाठी तेथील जनतेने विद्यमान पंतप्रधान ओबे यांच्या हाती सत्ता दिली होती. मात्र ओबे यांना जपानच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात फारसे यश आलेले नाही. जपान हा एकाचवेळी कमालीचा परंपरानिष्ठ आणि टोकाचा आधुनिक असा देश आहे. मेड इन जपान ही अक्षरे जगाच्या पाठीवर अनेक दशके राज्य करीत होती. परंतु गेल्या दशकात जपानी कंपन्यांना पुन्हा एकदा अमेरिकन कंपन्यांनी मागे टाकले. जपानी कुटुंबांमधील पारंपरिक रिवाज आणि सांस्कृतिक परंपरा मात्र सतेज टिकून राहिल्या. आज जगातील अर्थकारणात जपानचे महत्त्व झपाट्याने ओसरते आहे. अनेक युगांचा वैरी चीन तर सोडाच पण भारत किंवा ब्राझ्लिसारखे देशही जपानच्या कितीतरी पुढे निघून गेले आहेत. दुसरीकडे, जपानी लोकसंख्येचे सरासरी वय झपाट्याने वाढते आहे. अशा जपानचे तांत्रिक ज्ञान, कार्यसंस्कृती आणि शिक्षणाचा दर्जा हे सारे मात्र जगाला तोंडात बोट घालायला लावेल, असे विलक्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे शाळा, कॉलेजांना भेटी दिल्या. भारतात जपानी भाषा शिकविणार्‍या शिक्षकांचा तुटवडा पडता कामा नये, असे सांगितले. जपानी भाषेच्या प्रशिक्षकांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले. या सार्‍यामागे ही संस्कृती आत्मसात करण्याची दृष्टी होती. जपान भारताला ३४ अब्ज डॉलर्सचे भक्कम अर्थसाह्य करून अनेक प्रकल्प उभारणार आहे. हे प्रकल्प उभे राहतील, तेव्हा भारत आणि जपान यांच्यातील आर्थिक संबंधांना नवी गती मिळेल. भारत हा आशियातील दुसर्‍या तर जपान हा तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. मात्र, आज भारताचा जपानशी असणारा वार्षिक व्यापार चीनशी असलेल्या व्यापाराच्या अवघा २५ टक्केही नाही. ही स्थिती केवळ अर्थकारणासाठी नव्हे तर जागतिक राजकारणाच्या दृष्टीनेही फारशी चांगली नव्हती. मोदी आणि अबे यांनी आपापल्या भाषणातही नवी सुरुवात आहे आणि आमची युती ही जगात शक्तिशाली ठरू शकते अशी भाषा केली. जागतिक अर्थकारणात आणि पर्यायाने राजकारणात चीनचा जो वरचष्मा बनतो आहे, त्याला थोपवायचे आणि परस्परांचे हित जपायचे, असा हा दूर पल्याचा विचार आहे. त्याला भारत आणि जपान या दोघांच्याही मैत्रीच्या इतिहासाचीही साथ आहे. परंतु नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात जे चिन विरोधी निसटते वक्तव्य केले त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. शूत्रूचा शत्रू आपला मित्र हे सूत्र जगतमान्य असले तरी जपानपेक्षा चीन आपल्याला भौगोलिकदृष्ट्या जास्त जवळचा आहे हे विसरता कामा नये. भारताने एकदा चीनसोबत युध्द केले असले तरीही उभय देशात मोठा व्यापार चालतो. सांस्कृतिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर चालते. भारताने जपानशी जवळीक साधल्याने चीन नाराज होणे आपण समजू शकतो. त्यामुळे आपण एकीकडे नवीन मित्र जोडीत असताना जुने संबंध बिघडणार नाहीत याची दखल घेतली गेली पाहिजे. जपान आणि चीन यांचे संबंध गेल्या काही दिवसांत बिघडत चालले आहेत. काही बेटांवरून चिघळलेला वाद आता आर्थिक संबंधांमध्येही घुसला आहे. पंतप्रधान मोदी यांनी तर टोकियोतील भाषणात विस्तारवादापेक्षा विकासवाद महत्त्वाचा असे सांगून सरळ सरळ चीनला टोला दिला. त्यावर चीनने सावध प्रतिक्रिया दिली असली तरी आपल्या चौखूर वारूला रोखण्यासाठी अमेरिका-भारत आणि जपान असा नवा त्रिकोण जगाच्या पटावर निर्माण होऊ शकतो, याची चीनला कल्पना आहे. नरेंद्र मोदी जपानमध्ये असतानाच अमेरिकी परराष्ट्र खात्यातील अधिकार्‍याने भारत अधिक शक्तिशाली होणे, हे जगाच्या हिताचे आहे, असे म्हटले आहे. त्यामुळेच मोदींनी जपानच्या दौर्‍यातून फारसे काही मिळविलेले नाही. एकीकडे मैत्री करीत असताना दुसरीकडे चीनसारख्या शेजार्‍याच्या नजरेतून आपण घसरले आहोत. त्यामुळेच मोदींनी फारसे काही कमावलेले नाही.
--------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel