-->
संपादकीय पान शनिवार दि. ०६ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
दृष्टीहिन व्हिजन
------------------------------
सत्तेचे व मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागलेल्या शिवसेनेने आपले व्हिजन डॉक्युमेंट सादर केले. यावर एक नजर टाकल्यास एक बाब प्रकर्षाने जाणविते की, या व्हिजन डॉक्युमेंटवर कोण विश्‍वास ठेवणार? कारण प्रश्‍न असा आहे की, ज्या शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेत आहे तिथे त्यांनी गेल्या वीस वर्षात काय केले असा प्रश्‍न उपस्थित होतो. जर त्यांनी मुंबई एक उत्कृष्ट शहर म्हणून विकसीत करुन लोकांपुढे आदर्श मॉडेल म्हणून सादर केले असते तर लोकांनी शिवसेनेच्या व उध्दव ठाकरे यांच्या व्हिजनवर विश्‍वास ठेवला असता. परंतु एखाद्या शहराचा कसा बट्याबोळ करावा याचे उदाहरण दाखवायचे झाल्यास मुंबई महानगराचे देता येईल. शिवसेनेला मुंबईत करुन दाखविता आले नाही तर राज्यात सत्ता आल्यावर ते काय करणार असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळे सध्या तयार केलेले व्हिजन डॉक्युमेंट हे दृष्टीहिन ठरावे असेच आहे. केवळ निवडणुकीचा हा एक फार्स ठरावा. कारण गेल्या वीस वर्षात मुंबईचा पूर्णपणे सत्यानाश शिवसेनेने केला आहे. हा सत्यानाश नियोजनाच्या अभावामुळे व कोणतीही व्हिजन शिवसेनेच्या डोळ्यापुढे नसल्याने झाला आहे. मुंबईतील अनधिकृत इमारती, वाढत्या झोपडपट्या यावर कसलाही तोडगा काढण्यात आलेला नाही. मुंबईची हृदये म्हणून ओळखली गेलेली मैदाने राजकारण्यांनी गिळून त्याजागी गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या. मुंबई शहर केवळ वाढत गेले मात्र त्याच्या वाढीच्या प्रमाणात रस्ते वाढले पाहिजेत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे यासाठी कोणते व्हिजन वापरले गेले नाही. मुंबई हे एक व्यापाराचे मोठे केंद्र तसेच औद्योगिक कारखान्यांचे उगमस्थान होते. आता मात्र मुंबईच्या जागांच्या किंमती गगनाला भिडल्यावर कापड गिरण्यांपासून अनेक उत्पादन प्रकल्प मुंबईबाहेर नेण्यात आले. यातून फेकला गेला तो मराठी कामगार. मात्र हे सर्व शिवसेनेच्या डोळ्यादेखत घडले, खरे तर शिवसेनेच्या आशिर्वादाने झाले असे म्हणणे योग्य ठरेल. मुंबईत २००६ साली महापूरप आला. त्यानंतर खरे तर मुंबईच्या विकासाचे व्हिजन आखून मुंबईला नवा चेहरा देण्याची संधी होती. परंतु मुंबई महानगरपालिका त्यात संपूर्णपणे फेल ठरली. आता मुंबई पुन्हा एकदा धोक्याच्या एका नव्या वळणार येऊन ठेपलेली आहे. मुंबई शहर जर शिवसेने आपल्या ताब्यात असताना जर आन्तरराष्ट्रीय दर्ज्याचे केले असते तर लोकांनी त्यांच्या आताच्या राज्यातील व्हिजनवर विश्‍वास ठेवला असता. पण तसे झालेले नाही. याची आठवण लोकांना सध्याचे राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट पाहाताना होणे स्वाभाविक आहे. सध्या शिवसेनेला सत्तेचे डोहाळे लागले आहेत. मुख्यमंत्रीपदी बसण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. राजकारण्यांना अशी स्वप्ने पडण्यात काहीच चूक नाही. परंतु ती स्वप्ने खरी करण्यासाठी त्यांनी लोकांची दिशाभूल करु नये. सध्याची शिवसेनेची खासदारांची संख्या वाढून १८वर गेली यात शिवसेनेपेक्षा नरेंद्र मोदी यांच्या जाहीरातबाजीचा मोठा हात आहे. याची उद्धवसाहेबांना कल्पना आहे. मात्र त्यांना तसे दाखवायचे नाही. कारण तसे केल्यास भाजपा मोठा होईल. मात्र भाजपाने आपले राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई भेटीत शिवसेनेवर कुरघोडी केलीच. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर पायधूळ झाडावी याकरिता शिवसेनेकडून एक-दोन वेळा नव्हे, तर तीन वेळा फोन आल्यामुळे अखेर शहा यांनी वाकडी वाट करून जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेला अखेर अमितभाईंनी आपल्या दारी यावे यासाठी फिल्डिंग लावण्याची पाळी आली हेच मोठे दुदैव आहे. दुसरीकडे शहा यांच्या भेटीकरिता रंगशारदामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना येण्यास भाग पाडण्याची भाजपाच्या स्थानिक नेत्यांची खेळी यशस्वी झाली नाही याचे समाधान अखेर शिवसेनेला लाभले. मात्र सोशल मीडिया आणि पोस्टरबाजी यातून परस्परांना शहाणे होण्याचे धडे देताना झालेली धुळवड दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण करून गेली. शहा यांनी मातोश्रीवर जाऊ नये व लालकृष्ण अडवाणींच्या अपमानाचा वचपा काढावा हाच या खेळीमागील हेतू होता. बाळासाहेबांच्या काळात त्यांनी अडवाणींना देखील भेट न देण्याचे धारिष्ट्य दाखविले होते. त्याउलट आता शिवसेनेला भाजपाच्या नेत्यांने आपल्याकडे पायधुळ झाडावी यासाठी फोनाफोनी करावी लागते आहे.  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचे २३ खासदार निवडून आले. शिवसेनेला झुकवण्याची व जास्त जागा पदरात पाडून घेण्याची हीच वेळ असल्याचे भाजपाच्या नेत्यांचे मत आहे. मात्र या दबावाला आता बळी पडलो व जागा वाढवून दिल्या तर भविष्यात मुख्यमंत्रिपदापासून दूर जावे लागेल, अशी भीती शिवसेनेला वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे तेही भाजपाच्या दबावतंत्रला विरोध करीत आहेत. दुसरीकडे भाजपालाही आपला मुख्यमंत्री सत्तेत बसलेला पहायचा आहे. सध्या भाजपा व शिवसेनेत अन्य पक्षातून (अन्य पक्षात नको झालेल्या व भ्रष्ट नेत्यांचे) बर्‍याच लोकांचे इनकमिंग झाले आहे. या दोन्ही पक्षात एवढी गर्दी झाल्यावर सध्याचे अनेक नेते नाराज होणे हे ओघाने आलेच. यातून तिकिट वाटपानंतर बंडखोरी होणार आहेच. त्यामुळे या दोघांची स्वप्ने भंगतील अशीही चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर जे पक्षात येतात ते सत्तेच्या लोभाने येणारे असतात. त्यांना पक्षाच्या ध्येय धोरणाशी काहीच देणे घेणे नसते. त्यांना फक्त सत्तेशी आणि त्याभोवती असलेल्या गुळाची चव चाखायची असते. याची कल्पना शिवसेना व भाजपाच्या नेत्यांना नाही असेही म्हणता येणार नाही. भाजपा-शिवसेनेचे अशा प्रकारचे हे पक्षातही दृष्टीहीन व्हिजन आहे. लोकसभेत विजय मिळविला म्हणून विधानसभेत लोकांची दिशाभूल करुन सत्ता कमवू हे व्हिजन असेल तर फोल ठरेल.
-----------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel