-->
संगीताचा देव देवाघरी...

संगीताचा देव देवाघरी...

बुधवार दि. 31 ऑक्टोबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
संगीताचा देव देवाघरी...
मराठी संगीत विश्‍वावर आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास वयाच्या 91 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईत रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. यशवंत देव यांच्या अचानक जाण्याने संगीताची मैफिल आता सुनीसुनी झाली असली तरीही हा संगीताचा देव आपल्या देवाघरी गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांचे अवघे जीवन सूरमय करणारे आणि जीवनावर शतदा प्रेम करायला शिकवणारे होतेे. त्यांच्या आशीर्वचनाची आता देववाणी होणार नाही. मात्र त्यांची अवीट, अमर, देवगाणी आणि त्यांच्या आठवणी सतत सोबत करतील, याबाबत काहीच शंका नाही. हजारो अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. यशवंत देव यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1926 साली पेणमध्ये झाला. पेण त्यांनी शालेय जीवनानंतर सोडले तरी पेणची बांधिलकी कायमची जपली. पेणशी व तेथील लोकांशी नाळ त्यांनी कधी तोडली नाही. त्यांच्या पंचाहत्तरीनंतर झालेला पेणमधील भव्य सत्कार हे त्याचे द्योतक होते. वडिलांकडूनच त्यांना संगीताचे सुरुवातीचे धडे मिळाले. तेच त्यांचे पहिले गुरू होते. त्यांच्याकडून त्यांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले. भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, असेन मी नसेन मी, अखेरचे येतील माझ्या दिवस तुझे हे फुलायचे, स्वर आले दुरुनी, तिन्ही लोक आनंदाने, जीवनात ही घडी अशा शेकडो गीतांना संगीतसाज चढवून यशवंत देव यांनी भावसंगीताचे विश्‍व समृद्ध केले होते. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिले होते. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली होती. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला भावसरगम हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्याद्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. ग. दि. माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या कथा ही रामजानकीची या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते. घरातलं संगीतास अनुकूल वातावरण, दहाव्या-अकराव्या वर्षांपर्यंत नाटयसंगीत आणि शास्त्रीय संगीताचे झालेले संस्कार, गाण्याचे वडील त्र्यंबकराव यांनी दिलेले पाठ यातून यशवंद देव घडत गेले. यशवंत देवांना लाभलेले त्र्यंबकरावांसारखे वडील हे त्याच काळात काय, आजही दुर्मीळ म्हटले पाहिजेत. देवांनी सुरुवातीच्या काळात विवाहानंतर रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी केली. ती सांभाळून शहजादा चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. नंतर 1951 मध्ये ते सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले. लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम तसेच आशा भोसले यांची गाणी या काळात पुढे येत होती. हे सर्व देवांना जवळून बघायला मिळाले. एच. एम. व्ही.च्या नोकरीने देवांना अनुभवसमृद्ध केले. देवांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले त्यातली त्यांची कामगिरी चोख होती. असे असले तरी त्यंना फारसे चित्रपट काही मिळाले नाहीत. जीवनात ही घडी अशीच राहू दे हे लता मंगेशकरांच्या आवाजातले अजरामर गीत जन्माला आले. पुलंमुळे ते गीतकार झाले. झालं-गेलं विसरून जा या चित्रपटाची गाणी विलक्षण गाजली. एच. एम. व्ही.ने स्टाफ कमी केल्यामुळे देवांची नोकरी सुटली. त्यांनी गाण्याचा क्लास सुरू केला. ते स्वत: खर्‍या अर्थाने गायक नाहीत. तरुणपणात फुटलेला आवाज कधीच सांधता आला नाही, असं ते स्वत:च सांगायचे. त्यावर मात करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे प्रख्यात पार्श्‍वगायिका सुमन कल्याणपूर. विविध गाण्यांना चाली लावताना आपली मन:स्थिती कशी होती, हेही देव आपल्या आत्मचरित्रात विषद करताना म्हणतात, गीताला सूर आपल्या डोक्यात शोधण्यापेक्षा त्या गीताच्या शब्दांतच ते दडलेले असतात हे जाणवले. शब्दांतच सूर शोधायचे असतात हे सत्य विजेसारखे डोळ्यांसमोर आणि डोक्यात चमकले! त्यांच्या आत्मचरित्रात एक चांगला किस्सा आहे. एका समारंभात आशाबाईंच्या हस्ते देवांना एक पुरस्कार दिला गेला. देवांनी आपल्या भाषणात आशाबाईंच्या आवाजाची खूप तारीफ केली. हे सुरू असताना मधेच उठून आशाबाईंनी त्यांना प्रश्‍न विचारला होता की, मला एक सांगा, तुम्हाला माझा आवाज जास्त आवडतो की दीदींचा? देवांनी एका क्षणात उत्तर दिलं होते दीदींचा! देवांविषयीचा आदर आणि प्रेम त्याक्षणी द्विगुणित झालं,  असे आशाबाईंनी म्हटले. हा किस्सा अतिशय रंजक आहे. यशवंत देवांनी हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज संगीतकार अनिल विश्‍वास यांना आपले गुरू मानले होते. गुरू-शिष्याची अपूर्व भेट या प्रकरणात त्यांची प्रत्यक्ष भेट, त्यांचे देवांच्या शिवाजी पार्कवरील दोन खोल्यांच्या घरी येणे- हे सारे वर्णन अतिशय भावपूर्ण आहे. त्यावरुन त्यांच्या मनातील हळवेपणा जाणवतो. व. पु. काळे, रवींद्र पिंगे, ज्ञानेश्‍वर नाडकर्णी, गायिका उत्तरा केळकर, शोभा जोशी, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, योजना शिवानंद, कवी-गीतकार प्रवीण दवणे, गायक अरुण दाते, आशा खाडिलकर या सर्वानी यशवंत देव यांना आपले संगीतातले देव मानले. संगीतातले असे व्यक्तीमत्व नजिकच्या काळात तरी होणे नाही. संगीताचा हा देव खर्‍या अर्थाने आपला ठेवा इथे ठेवून देवाघरी गेला, असेच म्हणणे आता आपल्या हाती आहे.
----------------------------------------------

Related Posts

0 Response to "संगीताचा देव देवाघरी..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel