-->
गणेश मंडळांना आवाहन....

गणेश मंडळांना आवाहन....

रविवार दि. 09 सप्टेंबर 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
गणेश मंडळांना आवाहन....
---------------------------------------------------
एन्ट्रो- येत्या आठवड्यात आपण विघ्नहर्त्याचे स्वागत मोठ्या उत्साहात करणार आहोत. लोकमान्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात एका ध्येयाने प्रेरित होऊन गणेशोत्सव सुरु केला, त्यात त्यांना यशही आले. आता आपण पुन्हा एकदा समाजउन्नतीसाठी गणेशोत्सव मंडळांना हाताशी धरल्यास एक मोठी चळवळ उभी राहू शकते. याची सुरुवात यंदापासूनच केल्यास उत्तम होईल. अशा प्रकारे विधायक काम करणार्‍या गणेश मंडळांच्या पाठिशी कृषीवल समर्थपणे उभा राहिल, याबाबत काहीच शंका नाही...
--------------------------------------
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशात्सव सुरु केल्याच्या घटनेला आता दीडशे वर्षाहून जास्त काळ लोटला आहे. त्यापूर्वी घरोघरी गणपती बसविला जाई. मात्र लोकमान्यांनी गिरगावात पहिला सार्वजनिक गणपती स्थापन करुन लोकांना त्यानिमित्ताने एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. लोकमान्यांंची ध्येयधोरणे तर आपण कधीच विसरलो आहोत. ते गृहीत धरले तरीही आजही गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती, विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविता येऊ शकतील अशी स्थितीत आहे. टिळकांनी सुरुवात केल्यावर आपल्याकडे सार्वजनिक गणेशोत्सव ठिकठिकाणी स्थापन झाले. त्यावेळी स्वातंत्र्याचा लढा नुकताच कुठे आकार घेत होता. ब्रिटीशांना त्यांच्या देशात हाकलून दिल्याशिवाय आपण आपल्या देशाची प्रगती करु शकत नाही यावर लोकमान्य टिळक ठाम होते. त्यासाठी देशातील जनतेला एकत्र आणण्याची गरज होती आणि लोकांना जमविण्याचे एक साधन म्हणून त्यांनी सार्वजनिक गणपती मंडळे स्थापन करण्यात पुढाकार घेतला. आज त्या घटनेला दीड शतकाहून जास्त काळ झाला. गणपतींच्या या दहा दिवसात विविध विषयांवर चर्चासत्र, वादविवाद, करमणुकीचे कार्यक्रम (आतासारखे नव्हेत) चालत. यातून लोकांच्या मनात स्वातंत्र्यांचा अंगार फुलविला गेला. स्वातंत्र्यानंतर मात्र काळाच्या ओघात ही परिस्थिती बदलत गेली व गणपती मंडळांचे स्वरुप बदलत गेले. गेल्या वीस वर्षात तर गणपती मंडळांना बाजारी स्वरुप आहे, ही सर्वात वाईट गोष्ट म्हटली पाहिजे. गणपतीच्या मूर्तींपुढे केले जाणारे विभत्स डान्स तसेच एकूणच करमणुकीच्या कार्यक्रमांचे स्वरुप पाहता लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव यासाठीच का सुरु केले होते असा प्रश्‍न उपस्थित होतो. गणपतीच्या मंडपात पत्ते खेळण्यापासून जे विविध उपक्रम दहा दिवस केले जातात ते पाहता एक प्रकारचे नैराश्यच यावे. यासाठीच लोकमान्यांनी गणपती उत्सव सुरु केला होता का, असे वाटू लागते. आता सार्वजनिक गणपती मंडळांकडे बर्‍यापैकी निधी जमा होतो. अनेक मंडळे त्यातून विधायक उपक्रम, समाजउपयोगी कामे हाती घेऊन सध्याच्या स्थितीतही आपले वेगळेपण दाखवित असतात. सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला लालबागचा राजा गणपतीच्या मंडळाने अनेक समाजहिताच्या बाबी हाती घेतल्या आहेत. यात वाचनालय चालविण्यापासून ते अल्प किंमतीत डायलेसिस करुन देण्याची सुविधा उपलब्ध करणे या अनेक बाबींचा समावेश आहे. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम अनेक मंडळे हाती घेतात हे देखील एक वास्तव आहे. मात्र असे उपक्रम राबविणार्‍यांची संख्या एकूण मंडळांची तुलना करता अल्पच आहे. गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाचे जे स्वरुप बदलले ते पाहता आता पन्हा एकदा त्यात बदल करण्याची निकड निर्माण झाली आहे. सध्याचे जे स्वरुप आहे ते पाहता आपण आपल्या मूळच्या ध्येयापापासून ढळलो आहोत हे नक्की. गणपती हा आता एक उत्सव म्हणून साजरा केला जातो इथपर्यंत योग्यच आहे. परंतु मंडळांकडे जो करोडोंचा निधी जमा होतो तो चांगल्या ठिकाणी किंवा एखाद्या समाजउपयोगी प्रकल्पासाठी हा निधी खर्च झाल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या या उपक्रमास आधुनिक टच देत असताना त्याला जर सामाजिक उपक्रमतेशी जोडले तर एक चांगला उद्देश साध्य होऊ शकतो. सार्वजनिक गणेश मंडळे विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ शकतात. अगदी एखादे दुष्काळी गाव दत्तक घेण्यापासून ते गरीब मुलांच्या शिक्षणाची सोय करणे यासांरखे उपक्रम ते राबवू शकतात. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाल्यास प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचा निर्णय जर राज्यातील एक लाख गणेश मंडळांनी घेतला तर एक हजार कोटी रुपये सहजरित्या उभे राहातात. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यार्ंंसाठी ही रक्कम मोठी आहे. त्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने सरकारला ही थेट मदत करुन या रकमेचा योग्य विनिमय होतो आहे किंवा नाही ते पाहाण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांची गावपातळीवर नियुक्ती करावी. समजा असे करणे गणेश मंडळांना योग्य वाटत नसेल तर पाच-दहा गावांनी एकत्र येऊन एक समुदाय स्थापन करावा व त्यातील प्रत्येकाने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे कुटुंब दत्तक घ्यावे. आज अनेक गावात आरोग्याच्या, शिक्षणाच्या सुविधा नाहीत तेथे त्या सुविधा उपलब्ध ही गणेश मंडळे करुन देऊ शकतात. गेल्या वर्षी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यार्ंंसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आर्थिक सहाय्य देण्यास सुरुवात केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाम फाऊंडेशनला ही मंडळे आपले योगदान देऊ शकतात. अमिर खान यांच्या पाणी फांऊंडेशनने गेल्या वर्षात पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी लक्षणिक काम केले आहे. त्यांना देखील गणेश मंडळे आर्थिक मदत देऊ शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे हे बिन राजकीय काम म्हणून केले गेले पाहिजे. गणेश उत्सवात ज्याप्रमाणे सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात त्याच धर्तीवर सर्व जाती-धर्माचे लोक या चळवळीत सहभागी होणे गरजेचे आहे. आपण विघ्नहर्त्याचे स्वागत मोठ्या उत्साहात करतो. परंतु आपल्या घरात जर अस्वस्थता असेल तर कोणताच उत्सव साजरा होऊ शकत नाही. ज्यांच्या घरात आज चुल पेटू शकत नाही त्याला आधार देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. गणेश मंडळांनी या कामी पुढाकार घेतल्यास विघ्नहर्ता गणेश खर्‍या अर्थाने त्यांच्यावर प्रसन्न होईल. लोकमान्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात एका ध्येयाने प्रेरित होऊन गणेशोत्सव सुरु केला, त्यात त्यांना यशही आले. आता आपण पुन्हा एकदा समाजउन्नतीसाठी गणेशोत्सव मंडळांना हाताशी धरल्यास एक मोठी चळवळ उभी राहू शकते. याची सुरुवात यंदापासूनच केल्यास उत्तम होईल. अशा प्रकारे विधायक काम करणार्‍यां गणेश मंडळांच्या पाठिशी कृषीवल समर्थपणे उभा राहिल, याबाबत काहीच शंका नाही.
--------------------------------------------------------------

0 Response to "गणेश मंडळांना आवाहन...."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel