-->
फुटलेली कोंडी

फुटलेली कोंडी

शनिवार दि. 08 सप्टेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
फुटलेली कोंडी
समलैंगिक संबंध कायदेशीर असून कलम 377 नुसार समलैंगिकता हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसून, देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. समलैंगिक असणे यात कोणताही अपराध नाही, असा निर्णय ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निकाल म्हणजे आपल्या देशातील मानवतेच्या समानतेतील एक महत्वाचे पाऊल ठऱणार आहे. समलैंगिक संबंध असणार्‍यांची आजवर होत असलेली मानसिक व शारीरिक कोंडी फुटण्यास यामुळे मोठी मदत होईल. या निकालामुळे आपल्याकडील तथाकथीत संस्कृती रक्षकांची मोठी गोची होणार आहे. परंतु न्यायलयाच्या हा निकाल त्यांना नाईलाजास्तव स्वीकारावाच लागेल.
सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय 17 ऑगस्टला राखून ठेवला होता, यानुसार या निर्णयाची सुनावणी झाली. दोन सज्ञानांनी परस्पर संमंतीने ठेवलेले संबंध हा आता अपराध नसून, प्रत्येक व्यक्तीला लैंगिकतेबाबत मूलभूत अधिकार आहेत, तसेच एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर) यांनाही समान अधिकार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. तसेच आता जुनी विचारधारा बदलण्याची गरज आहे व प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार अशी माहिती न्यायालयाने दिली. न्यायालयाची ही टिपणी फार महत्वाची आहे. कारण आपल्याकडे याविषयीचा कायदा तब्बल 158 वर्षे जुना होता व त्यात कालानुरुप, वैज्ञानिकतेच्या निकषावर काही बदल करण्याची आवश्यकता होती. हे बदल स्वीकारण्याची मानसिकता सर्वांचीच नसली तरी समाजातील काही घटकांनी हे बदल स्वीकारले आहेत. आज सुमारे 25 देशात प्रामुख्याने विकसीत देशात समलैंगी संभोगाला मान्यता आहे. सौदी अरेबीयासारख्या देशात तर अशा प्रकारचा संभोग हा अनैतिक, अनधिकृत आहे व त्याबद्दल शिक्षाही आहे. परंतु प्रागतिक विचाराने चालणार्‍या देशांमध्ये आता या निकालाच्या निमित्ताने भारताचा समावेश झाला ही आपल्यासाठी अभिमानाची बाब ठरावी. गेली दोन दशके आपल्याकडे यावर विविध मते मतांतरे होती. काहींचा विरोध तर काहींचे समर्थन. सुरुवातीच्या काळात याचे समर्थकही दबकत दबकत बोलत होते, मात्र नंतर त्यांच्यातही धीर आला व या प्रश्‍नावर खुलेपणाने चर्चा सुरु झाली. सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये कलम 377 हा गुन्हा ठरवला होता. या कलमालाला गुन्हा ठरवणार्‍या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या गेल्या. मात्र अनेक याचिका व सुनावणीनंतर आज त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णय दिला. याविषयी काही मूलभूत बाबींचा आपम विचार केला पाहिजे. समलैंगिक असणार्‍या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधांना समलैंगिक संबंध असे म्हणतात. समान लिंगी व्यक्तींचे म्हणजे स्त्री-स्त्री अथवा पुरुष-पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध. समलिंगी (होमो सेक्शुअल) ही नैसर्गिक अवस्था आहे. साधारणतः 7 ते 14 या वयात ती जन्माला येते. या वयात येणार्‍या काही जणांना समलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटू लागते. ते शरीरसुखाच्या संदर्भात असते असे नाही. पण, आपल्यासारख्याच दिसणार्‍या, आपल्याच वयाच्या (किंवा त्याहून मोठयाही) व्यक्तीचे आकर्षण वाटू लागते. पुढे त्यांच्याशीच घट्ट मैत्री होऊ लागते. हे सगळे त्या वयात शारीरिक, मानसिक वाढीसाठी पूरक-पोषकच असते. त्यात सेक्स अभिप्रेत असतेच असे नाही. त्याची जाणीवही पुसटशी असते, मात्र आकर्षण वाटते ते मात्र फक्त समलिंगी व्यक्तींचेच! पुढे काही जण याच अवस्थेत अडकून पडतात. जन्मभर या अवस्थेत तरी राहतात, नाहीतर काही काळाने बायसेक्शुअल अवस्थेत जातात. समलिंगी शरीरसंबंध निर्माण होतात. कारण ही अवस्था संपत नाही. पुरुषांप्रमाणे महिलांनाही महिलांचे आकर्षण वाटू लागते व त्या महिला मनाने, तनाने जवळ येतात. त्यामुळे समलैंगिक हा प्रकार पुरुष व स्त्री या दोगांमध्ये आढळतो. अर्थात असे असणे हे अनैसर्गीक आहे का? समलैंगिक असणे हे शंभर टक्के नैसर्गिक आहे. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटते. म्हणजेच तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटते, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतित करावेसे वाटते याचा अर्थ तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. समलैंगिकतेकडे कल असणे ही विकृती नाही. हे नैसर्गिक आहे. आणि हा कुठलाही आजार नाही. ही एक शरीराची व मनाची अवस्था आहे. पुरुषाला जसे स्त्रीचे आकर्षण वाटणे, स्त्रीला पुरुषाचे आकर्षण वाटणे, त्यांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवावेसे वाटणे हे स्वाभाविक नैसर्गिक आहे, त्याचप्रमाणे स्त्रीला-स्त्रीचे, पुरुषाला-पुरुषाचे आकर्षण वाटू शकते. समान लिंगाच्या व्यक्तींबरोबर संबंध ठेवण्याकडे कल वाढतो. समलिंगी संबंध ठेवणारे अनेकजण समाजात आहेत. आजपर्यंत असे लोक हे संबंध छुपेपणाने आपला प्रेम व्यक्त करीत होते. यातून त्यांचा मानसिक कोंडमारा मोठा होत होता. आता त्यांचा हा कोंडमारा थांबणार आहे. पौगंडावस्थेत आणि तारुण्यात जे समलिंगी संबंधात अडकतात त्याला जबाबदार अनेकदा आजूबाजूचे वातावरण असते. काही मुलांची शरीरधारणा हेट्रोसेक्शुअलच असते, पण केवळ मानसिक-भावनिक आधार शोधण्यासाठी हे समलिंगी संबंधांचा आधार घेतात. वैज्ञानिकदृष्टीकोनाचा विचार करता यात गैर असे काहीच नाही. उलट अशा प्रकारच्या भावना, संवेदना दाबून ठेवणे हे अनैसर्गिक आहे. यातून अनेक गुन्हे, लुबाडणूक होऊ शकते. पुण्याच्या एका जोडप्याचे यासंबंधी चांगले उदाहरण देता येईल. उच्चशिक्षीत असलेल्या या दोघा मराठी पुरुषांनी अमेरिकेत मराठमोळ्या पध्दतीने लग्न केले, मात्र आपल्याकडे आल्यावर त्यांचा कोंडमारा होऊ लागला. लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहतात हे त्यांना नेहमी खटकायचे. आता त्यांच्यासारख्या अनेकांचा कोंडमारा कायद्याने फुटणार आहे. समाजही काळाच्या ओघात हे स्वीकारेल.
---------------------------------------------------------------------

0 Response to "फुटलेली कोंडी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel