-->
अखेर माज उतरला!

अखेर माज उतरला!

शुक्रवार दि. 07 सप्टेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अखेर माज उतरला!
भाजपाचे प्रवक्ते व मुंबईतील आमदार राम कदम यांनी दहिहंडीच्या वेळी मुलींविषयी केलेल्या बेताल विधानाबद्दल तीन दिवसानंतर अखेर माफी मागितली आहे. खरे तर त्यांना माफी मागायला जनतेने व महिला वर्गांनी भाग पाडले आहे. तरुण मुलींना पळवून नेण्याविषयी त्यांनी केलेल्या बेताल विधानाबद्दल त्यांनी खरे तर तातडीने माफी मागावयास हवी होती, परंतु ते केवळ दिलगिरी मागण्यावर निभावून नेत होते. मात्र विविध चॅनेल्स, वृत्तपत्रे व सोशल मिडियावर त्यांच्यावर एवढा टीकेचा भडिमार झाला की, त्यांना अखेर तीन दिवसांनी माफी मागावीच लागली. आपल्याकडे लोकप्रतिनिधी कसे नसावेत याचे उत्तम उदाहरण राम कदम ठरले आहेत. यापूर्वी ते मनसेत होते व त्यावेळी ते किर्तनकार होते असे म्हणतात आता भाजपात आल्यावर त्यांनी केलेले महिलांवरील किर्तन त्यांना चांगलेच महाग पडले आहे. यातून भाजपाचे जाहीर व्यक्त करावयाचे एक विचार व त्यांच्या लोकप्रतिनिधींची मनातली मते काय आहेत यातून स्पष्ट झाली आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी  प्रशिक्षण द्यायला हवे, असे बोलतात तर त्यांच्याच पक्षाचे नेते मुलींना पळवून नेण्याची भाषा करतात. भाजपाने खरे तर केवळ माफी नाही तर राम कदम यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे होता. देशातील महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत असताना त्यांना विवाह करताना मात्र तयंचा स्वतंत्र वितार करता येणार नाही. तर त्यांनी एखाद्या तरुणाला नकार दिला तर त्या मुलीला पळवून आणण्याची भाषा करणे म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती भाजपात कशी रुजली आहे, त्याचे उत्तम उदाहरण ठरावे. राम कदम यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांना आलेला सत्तेचा माज आहे. आपले कुणीच वाकडे करु शकत नाही ही त्यांची समजूत यातून प्रतिबिंबत होते. आपल्या कार्यकर्त्यांना ते अशा प्रकारे जाहीरपणे आवाहन करतात हे लांछनास्पद आहे. राम कदम हे टी.व्ही. वरील चर्चेत अनेकदा भाजपाचे प्रवक्ते म्हणून येतात, त्यावेळीच त्यांच्या चेहर्‍यातील व बोलण्यातील मग्रुरी काही लपत जात नाही. कोणताही अभ्यास नसताना ते ठामपणे भाजपा स्टाईलने खोटे रेटून नेत असतात. आता देखील आपल्या राजकीय विरोधकांनी आपल्याला संपविण्यासाठी केलेला हा डाव आहे, असे म्हणत माफी मागितली आहे. दहिहंडीच्या वेळी अभिनेत्रीला राखी बांधावयास देऊन त्यांनी असेच एक मोठे नाटक रचले. तुमची मानसिकता पुरुषी असताना तुम्ही राखी बांधून त्यात काही मोठा फरक पडणार नाही. उलट यातून राम कदम यांच्यातला व्हिलनच जनतेपुढे आला आहे. राम कदम यांचे विचार म्हणजे, पुरुषी मानसिकतेशी संबंधित आहे. एकविसाव्या शतकातही तिच्यात काहीही बदल घडत नाही, याइतकी दुसरी खेदाची बाब असू शकत नाही. दहीहंडीचा खेळ सुरू असताना आणि मुख्य म्हणजे त्या खेळात युवकांबरोबरच युवतीही सहभागी होत असताना, हजारोंच्या जनसमुदायासमोर कदम यांनी हे तारे तोडले आहेत. तुमच्या आई-वडिलांना मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणू, अशा वल्गना करताना आपण सार्वजनिक जीवनात वावरत आहोत, लोकप्रतिनिधी आहोत, याचेही त्यांचे भान सुटले. हे सारेच अत्यंत किळसवाणे तर आहेच; शिवाय त्यामुळे त्यात मुलीच्या पसंती-नापसंतीचा जराही विचार करायची कदम आणि त्यांच्यासारख्याच देशातील बहुसंख्य पुरुषांची तयारी नाही, हेच दिसून आले आहे. कदम यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध झाला, समाधानाची बाब मानावी लागेल. त्यांना तर सोशल मिडियावरुन घेरण्यात आले. त्यांच्यावर टिकेची झोड उठली. एकीकडे सरकार मेरी बेटी, मेरा अभिमान असा प्रचार करीत असते, तर दुसरीककडे महिलांविषयी अशी मते त्यांचेच नेते जाहीरपणाने व्यक्त करतात यावरुन हे सरकार किती भोंदू आहे, ते स्पष्ट होते. राम कदमांच्या रुपाने पुरुषी मानसिकता उघड होत असताना उत्तर प्रदेशातील भाजपच्या दोन खासदारांनी महिला आयोगाच्या धर्तीवर राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. पुरुषांनाही स्त्रियांकडून त्रास दिला जात आहे, असा कांगावा काही मंडळी नेहेमी करीत असतात. मात्र अनेक कौटुंबिक समस्यांचे मूळ नातेसंबंधातील तणावांमुळे तयार होते. पुरुषांनी परंपरेने चालत आलेले हक्क आणि वर्चस्व गाजविण्यामुळे स्त्रीवर होणारे अन्याय आणि नातेसंबंधातील तणावातून सहन कराव्या लागणार्‍या वेदना यांत मूलभूत फरक असतो. समाजातील दुर्बल घटकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या कायद्यांच्या, विशेष संस्थात्मक रचनेविषयी तसेच घटनेने या घटकांना दिलेल्या हक्कांविषयी हल्ली कुरकुर करणार्‍यांची संख्या वाढली आहे. राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापण्याची मागणी हा त्यातलाच एक प्रकार असल्याचे दिसते. पुरुषांवर अन्याय होत असला तर त्याची कारणे शोधावी लागतील, यातील बहुतांशी घटना या कौटुंबिकच आढळतील. आपल्या घटनेने सर्वांना म्हणजेच महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले असताना, देशातील अनेक जण; त्यातही राजकारणात वावरणारी मंडळी मध्ययुगीन काळातच अद्याप कशी रेंगाळत आहेत, भाजपा नेहमीच रामाचा गजर करते. परंतु राम हा मर्यादापुरुषोत्तम होता. भाजपाचा हा राम रावणासारखा वागत व बोलत आहे. राम कदमांचा माज यावरुन उतरला असे दिसत असले तरीही राम कदम हे खुन्नस ठेऊन वागणारे आहेत. त्यांच्याकडे घाटकोपरमध्ये त्यांची फौज आहे. कदाचित भविष्यात ही फौज आक्रमक होईल व बदला घेण्याचा प्रयत्न करील. त्यासाठी भाजपाने आत्तापासून या रामरुपी रावणाला आवर घालावा.
--------------------------------------------------------------

0 Response to "अखेर माज उतरला!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel