-->
सनातनी विद्रुप चेहरा

सनातनी विद्रुप चेहरा

रविवार दि. 26 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
सनातनी विद्रुप चेहरा
------------------------------------------
ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा उलगडा पाच वर्षांनी का होईना होत असताना हिंदुत्ववादी सनातनी विचारांच्या लोकांचा विद्रुप चेहरा आता सर्वांच्यापुढे येऊ लागला आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातील विशेष पथकाने डॉ. दाभोलकरांच्या हत्ये प्रकरणी वैभव राऊत, सचिन अंदुरे, शरद कळसकर, श्रीकांत पांगारकर, अमोल काळे यांना अटक केल्यावर या कटाचा बहुतांशी भाग आता उलगडू लागला आहे. डॉ. दाभोळकरांची हत्या झाल्यावर मिशन अँन्टी हिंदू हा कट आखण्यत आला होता व त्यात 36 जणांच्या हत्येचा कट होता, हे आता उघड झाले आहे. त्यापैकी 16 विचारवंत, पत्रकार, साहित्यिक महाराष्ट्रातील होते. या सर्व कटाचा मुख्य सूत्रधार हा डॉ. विरेंद्र तावडे हाच असल्याचे आता पुराव्यानिशी सिध्द होत आहे. जून 2016 साली तावडेला सी.बी.आय.ने पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमातून अटक करण्यात आली होती. डॉ. दाभोलकरांची हत्या झाली ते पिस्तुलही सी.बी.आय.ने हस्तगत केले आहे. त्यामुळे या तपासाला आता अचानक वेग आला आहे. गेले पाच वर्षे हा तपास थंडावलेल्या स्थितीत असताना आता अचानक का बरे याला वेग यावा. महत्वाचे या पाच वर्षात चार वर्षे भाजपा-शिवसेनेचे राज्य आहे तर एक वर्षे कॉग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. कॉग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांना डॉ. दाभोलकरांची हत्या ही हिंदुत्ववादी संघटनांनी केली याची पूर्ण कल्पना होती. सुरुवातीपासून यातील अनेकांचे बोट हे अर्थातच सनातन संस्थेवर होते. असे असतानाही कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या त्यावेळच्या सरकारने हिंदू मते दुखावली जाऊ नयेत हा हेतू डोळ्यापुढे ठेवून धीमे गतीने पावले टाकली. त्यातच सरकार बदलून भाजपा-शिवसेनेच आल्यावर हिंदुत्ववाद्यांचेच सरकार सत्तेवर आले, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची अपेक्षाच नव्हती. हिंदू अतिरेकी म्हणून मालेगावपासूनच्या विविध बॉम्बस्फोटात पकडले गेलेले आरोपी सुटले आणि हिंदू अतिरेकी ही संकल्पना अत्सित्वातच नाही असे ठासून सांगण्यात आले. अतिरेकी कारवायात पकडले गेलेल्यांची निर्दोष सुटका झाल्याने आजवर एवढा मोठा हिंदूंच्या विरोधात बनाव करण्यात आला होता का, असा प्रश्‍नही उपस्थित होतो. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर दाभोलकरांसह ज्या चार डाव्या विचारवंतांच्या हत्या झाल्या, त्याचा छडा लावावा यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने वेळोवेळी आंदोलन, निदर्शने करुन सरकारवर दबाव टाकला जात होता. त्यातच न्यायालयांनीही सातत्याने तपास यंत्रणांवर गुन्हेगार शोधण्याचा तगादा लावला होता. तसेच अनेकवेळा त्यांनी तपासातल्या दिरंगाईबाबत सरकार व या यंत्रणावर ताशेरे ओढले होते. अर्तात असे असूनही तपास काही वेग घेत नव्हता. कर्नाटकातील निवडणूका जाल्यावर मात्र हे चित्र पालटले. कर्नाटकात जनता दल व कॉग्रेसचे सरकार आल्यावर गौरी लंकेश व प्रा. कलबुर्गी यांच्या मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी कंबर कसली. त्यासाठी अर्थातच त्यांना कर्नाटक सरकारचे बळ मिळाले. जर कर्नाटकात भाजपाच्या नेतृत्वाकालील सरकार आले असते तर या अटका झाल्या नसत्या हे सांगावयास कुणी मोठ्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. गौरी लंकेश यांचे खुनी सापडल्यावर त्यांच्याकडून अनेक महत्वाचे दागेदोरे सापडले. यातून अखेर महाराष्ट्र सरकारलाही त्या धागेदोर्‍यानुसार, तपास करणे भाग पडले व वैभव राऊतची पहिली अटक झाली. तपास यंत्रणांना अशा प्रकारच्या गुन्ह्यात राजकीय पाठबळ किती व कसे मिळते त्यावर बरेचसे अवलंबून असते, हे पुन्हा एकदा यावरुन सिद्द झाले.
वैभव राउत हा दहशतवादी, दहशतवाद विरोधी पथकाने पकडला. त्याच्या घरात शस्त्रात्रं, दारुगोळा, हातबॉम्ब हे मुबलक प्रमाणात मिळालं. अनधिकृत सूत्रांच्या मते, मराठा आरक्षण आंदोलन आणि आता येऊ घातलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणपती मंडळांच्या मंडपांमध्ये स्फोट घडवून आणायचे, म्हणजे त्याचं खापर मुस्लिमांवर जाईल आणि अपेक्षित धार्मिक दंगे उसळतील, असा त्याचा डाव होता. अर्थात सरकारने अजून यावर काहीही औपचारिक भाष्य केलेलं नाही हे लक्षात घेण्यासारखं आहे. कदाचित अद्याप चौकशी चालू असल्याने सरकार ते टाळत असावं असा संशयाचा फायदा सरकारला द्यायला हरकत नाही.
सध्या आपल्याकडे धार्मिक व्देशाने वातावरण इतके खराब झाले आहे की, प्रत्येक जण एक संशयीताच्या नजरेने पाहतो आहे. वैभव राऊतसारख्या टोकाच्या विचाराच्या व खूनाचा आरोप असलेल्याच्या समर्थनार्थ मोर्चा निघतो व त्यात देश का नेता कैसा हो, वैभव राउत जैसा हो, अशा घोषणा देणार्‍या लोकांचे आश्‍चर्य वाटते. कथुआ मध्ये 11 वर्षांच्या असिफावर झालेल्या बलात्कारानंतर याच धर्मद्वेषाने पछाडलेल्या लोकांनी आरोपींच्या सुटकेसाठी मोर्चे काढले. त्यात कश्मिरमधील भाजप सरकारचे मंत्री आणि आमदार सामील झाले. हे जे काही चालले आहे ते निषेधार्थ आहे. आपण एक सुसंस्कृत देश म्हणून किती रसातळाला गेलो आहोत याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे हे दहशतवाद्यांच्या समर्थनासाठी मोर्चे काढणारे आणि आम्ही असल्या भानगडीत पडत नाही म्हणून शांत बसणारे लोक आहेत. जे मोर्चे काढतात ते तर धर्मांध असतात. पण शांत बसणार्‍या लोकांचा शांतपणा हा मूक पाठींबा असतो किंवा ते मूर्खांच्या नंदनवनात रहात असतात. मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी, अभिनव भारत संघटनेचा कर्नल प्रसाद पुरोहित आणि सह आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांना ठार मारायची योजना आखली. दिवंगत हेमंत करकरे यांनी त्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावे कोर्टात सादर केले. सध्या केंद्रात मंत्री असलेल्या भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या उपस्थितीत ते संघाच्या त्या नेत्यांना सुद्धा दाखवण्यात आले. आपली सुरक्षा वाढवा, अशी याचना करणारे पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना तातडीने पाठवण्यात आले. त्यावेळच्या युपीए सरकारने सुरक्षा तात्काळ वाढवली. दरम्यान, पुरोहितला अटकच झाली होती. स्वतःला हिंदू धर्माचा रक्षक म्हणवणारा एक दहशतवादी, एका आद्य हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांना मारायला निघाला होता. खुद्द आर एस एस च्या नेत्यांच्या जिवाची ज्यांना पर्वा नाही त्याच पैदाशीतल्या वैभव राऊतसारख्या दहशतवाद्याला, मराठा मोर्च्यातले किवा गणेशोत्सव मंडळांच्या मंडपातले निरपराध हिंदू भाविक मेल्याने काय फरक पडला असता? दहशतवादाला रंग नसतो आणि धर्म तर मुळीच नसतो! देशातील हे चित्र खरोखरीच बदलेल का, असा प्रश्‍न आहे.
-------------------------------------------------------------------

0 Response to "सनातनी विद्रुप चेहरा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel