-->
समाधानकारक पाऊस

समाधानकारक पाऊस

शनिवार दि. 25 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
समाधानकारक पाऊस
केरळात पडलेल्या महाभयंकर पावसानंतर तेथे पूर आला व या देवभूमीची वाताहात झाली. त्याचवेळी गेले आठवडाभर महाराष्ट्रातही अनेक भागात दमदार पाऊस पडला. राज्याच्या बहुतांशी भागात हा पाऊस पडल्याने अनेक दुष्काळी भाग सुखावला आहे. त्यामुळे यंदाचे वर्षे चांगले जाणार अशी चिन्हे दिसत आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह, मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोटामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे कोकण, पुणे, नाशिक विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान 3 हजार 264 प्रकल्पांमध्ये 853.10 टीएमसी (59 टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे व कोकण विभागात समाधानकारक चांगला पाणीसाठा झाला असताना मराठवाड्यातील पाणी स्थिती अत्यंत चिंताजनक असून, जायकवाडी वगळता उवर्रीत धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे, तर विदर्भाताही यंदा अपुरा पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी सद्याची स्थिती आहे. मॉन्सूनच्या पावसाचे दणक्यात आगमन झाल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मराठवाडा, खानदेशाबरोबरच, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने दडी मारली होती. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाने या जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ झाली. तर मराठवाड्यातील बहुतांशी धरणे मात्र बर्‍यापैकी कोरडीच होती असे चित्र होते. मात्र ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यानंतर पावसाने दणक्यात हजेरी लावल्याने धरणे भरली. नाशिक, नगरमधील नद्यांमुळे जायकवाडीच्या तर पुणे जिल्ह्यातील नद्यांमुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. कोयना धरण फुल्ल झाल्याने पाणी सोडण्यात येत आहे. पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असून, सर्व प्रकल्पामंध्ये मिळून 58.04 टीएमसी म्हणजेच अवघा 22 टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाने दमदार हजेरी लावल्याने प्रमुख धरणे भरली. या धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हळूहळू वाढू लागला. धरणात अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. माजलगाव, मांजरा (बीड) निम्न तेरणा, येलदरी ही मुख्य धरणे अद्यापही समाधानकारक पातळीत नाहीत. मोठ्या 45 प्रकल्पांमध्ये 38.34 टीएमसी (24 टक्के), मध्यम 81 प्रकल्पांमध्ये 8.30 टीएमसी (22 टक्के) आणि लहान 838 प्रकल्पांमध्ये 11.40 टीएमसी (33 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे येते अजूनही मोठा पाऊस अपेक्षित आहे. तरच ही धरणे भरतील व येथील शेतकर्‍याला दिलासा मिळू शकेल. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर धो-धो कोसळलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे कोयनेसह जवळपास सर्वच प्रमुख धरणे फुल्ल झाल्याने यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. उन्हाळ्यात अचल पातळीत गेलेल्या उजनी धरणांत मंगळवारी चल व अचल पाणीसाठा मिळून 97.27 टीएमसी (83 टक्के), तर कोयना धरणातही 101.36 (96 टक्के) एकूण पाणीसाठा झाला आहे. विभागातील सर्व 725 धरणांमध्ये मिळून सध्या 432.62 टीएमसी (81 टक्के) पाणीसाठा आहे. 35 मोठ्या प्रकल्पांमध्ये 393.08 टीएमसी (89 टक्के), मध्यम 50 प्रकल्पांमध्ये 26.80 टीएमसी (56 टक्के) आणि लहान 640 प्रकल्पांमध्ये 12.78 टीएमसी (26 टक्के) पाणीसाठा झाला आहे. नाशिक विभागातील धरणांच्या पाणलोटात यंदा पावसाचे प्रमाण कमी दिसत आहे. गेल्या काही दिवसांत पाऊस वाढल्याने धरणांमध्ये पाणी साठा वाढला. चांगला पाणीसाठा झाल्याने गंगापूर, दारणा, भंडारदरा, निळंवडे धरणासह अनेक लहान-मोठ्या धरणातून पाणी सोडण्यात आले. नाशिक विभागात यंदा निम्मा पाणीसाठा असून, लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण 570 प्रकल्पांमध्ये 114.32 टीएमसी (55 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मोठ्या 23 प्रकल्पांमध्ये 85.54 टीएमसी (66 टक्के), मध्यम 53 प्रकल्पांमध्ये 16.09 टीएमसी (38 टक्के) आणि लहान 494 प्रकल्पांमध्ये 12.64 टीएमसी (33 टक्के) पाणी आहे. सर्वाधिक पाऊस पडणार्‍या कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाने गेले आठवडाभर धुमशान घातले असून, सह्याद्रीच्या पश्‍चिम उतारावरून वाहणार्‍या नद्या दुधडी भरून वाहत आहेत. या नद्यांमुळे कोकणातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. कोकणात यंदा 90 टक्के पाणीसाठा झाला आहे. मुबंईसह शहरी भागाला पाणीपुरवठा करणारे सर्वच प्रकल्प ओसंडून वाहिले आहेत. ठाण्यातील भातसा, पालघरमधील कवडास, धामनी, सिंधुदुर्गमधील तिल्लारी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. कोकणातील सर्व 162 धरणांमध्ये मिळून 111.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. कोकणातील 11 मोठ्या प्रकल्पामध्ये मिळून 80.42 टीएमसी (93 टक्के), 7 मध्यम प्रकल्पामध्ये 15.50 टीएमसी (90 टक्के) तर 158 लघु प्रकल्पात 16.06 टीएमसी (81 टक्के) पाणीसाठा आहे. विदर्भात यंदा गतवर्षीपेक्षा चांगला पाऊस असला तरी धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागात यंदा पन्नास टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. पूर्व विदर्भातीलगोसी खुर्द, इटियाडोह, कामठी खैरी, तातेलाडोह अजूनही पुरेसा पाणीसाठा झाला नाही. तर पश्‍चिम विदर्भातील काटेपुर्णा, ऊर्ध्ववर्धा, इसापूरसह अनेक धरणात 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. पावसाचा अजून एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे अजूनही चांगला पाऊस पडेल व धरणे राज्यातील सर्व पूर्ण भरतील अशी आशा आहे. सध्यातरी कोकणासह राज्यातील स्थिती समाधानकारक आहे.
---------------------------------------------------------

0 Response to "समाधानकारक पाऊस"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel