-->
सावरकर आणि वास्तव

सावरकर आणि वास्तव

बुधवार दि. 18 डिसेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
सावरकर आणि वास्तव
सध्या विधीमंडळात सावरकरांचा अपमान झाला असे सांगत भाजपाच्या सर्व सदस्यांनी गदारोळ केला तसेच मी पण सावरकर अशा टोप्या घालून निषेध केला.  विनायक दामोदर सावरकर हे भाजपाला वंदनीत आहेत, याचे महत्वाचे कारण म्हणजे स्वातंत्र्य चळवळीशी संबंधीत नेता त्यांच्याकडे एकही नाही. आहेत ते एकमेव सावरकरच आहेत. त्यामुळे त्यांचा आधार ते नेहमी घेत असतात. सावरकर हे हिंदुत्ववादी होते, स्वतंत्र्य चळवळीत सहभागी होते, विज्ञानवादीही होते, स्पष्टवक्ते होते, त्यांनी गाय हा एक पशू आहे व त्याची हत्या करण्यात चुकीचे काय असेही म्हटले होते, त्यांनी ब्रिटीशांकडे माफी मागितली होती हे वास्तव त्यांच्याबाबतीत स्वीकारावयास हवे. त्यांनी माफी मागितली होती हे वास्तव मान्य करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे त्यांचे महत्व काही कमी होत नाही. महात्मा गांधींच्या हत्येच्या आरोपीतही त्यांचा समावेश होता. मात्र त्यांची निर्दोष सुटका त्यातून झाली होती, हे वास्तव आपण सर्वांनीच मान्य केले पाहिजे. राहूल गांधी यांनी केलेले विधान पाहता त्यात त्यांनी काही अवमान त्यांचा केलेला नाही. राहूल गांधी यांनी वास्तवापेक्षा काही वेगळे सांगितलेले नाही. भाजापवाले नेहमीच पंडीत नेहरु, इंदिरा गांधी यांच्या विषयी अनेकदा विकृत माहिती प्रसवत असतात. खरे तर त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नसतोही. परंतु त्यांचा गांधी, नेहरु घराण्यावर खुन्नस असल्याने ते हा उद्योग करतात. मात्र त्याबाबतीत कॉँग्रेसवालेही फारसे बोलत नाहीत कारण त्यांनी मत स्वातंत्र्य मान्य केले आहे. आपल्याकडे नेहरु, गांधी विषयी विरोधात अगदी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी काहीही बोलले तरी त्याची वाहावा होते. मात्र सावरकरांविषयी वास्तव बोलले तरी यांना मान्य होत नाही, हे चुकीचे आहे. सावरकरांचा जन्म 1883चा आणि 1901 मध्ये ते मॅट्रिकला असताना त्यांचे लग्न झाले. त्यांच्या कॉलेजच्या शिक्षणाचा भार त्यांचे सासरे (भाऊराव चिपळूणकर) सांभाळतील या अटीवर सावरकर लग्नाला तयार झाले. इंग्लंडमध्ये सावरकरांनी फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली. ते इंडिया हाऊसमध्ये राहत होते. त्यांनी 1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक लिहिले होते. कर्नल वायलींच्या खूनामध्ये सावरकरांचा हात आहे, असा संशय ब्रिटिशांना होता. त्यामुळे सावरकर लंडन सोडून पॅरिसला येऊन राहिले. मदनलाल एकाकी तुरुंगात पडला आणि पुढे फासावर गेला. नाशिकला ब्रिटीश अधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ती हत्या सावरकरांनी अमीन याच्यामार्फत पाठवलेल्या पिस्तुलाने करण्यात आली होती. सावरकर पॅरिसला होते. ते स्वतः काही करत नाहीत केवळ बोलतात अशी चर्चा त्यांच्याच संघटनेतील सहकारी करू लागल्याने सावरकर पॅरिसहून पुन्हा लंडनला आले. त्यांना परत आणत असताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात बोटीच्या स्वच्छतागृहातून समुद्रात उडी मारली व पोहत फ्रान्सचा किनारा गाठला. पुढे त्यांच्यावर दोन खटले चालवून त्यांना जन्मठेपेच्या दोन शिक्षा देण्यात आल्या आणि 4 जुलै 1911 रोजी त्यांची रवानगी 50 वर्षांसाठी अंदमानला करण्यात आली. अंदमानात गेल्यावर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली आणि केवळ 9 वर्ष 10 महिन्यांतच त्यांना माफी देण्यासाठी भारतात परत आणण्यात आले. याच काळात अंदमानात शेकडो स्वातंत्र्यसैनिक हालअपेष्टा भोगत होते. त्यातील अनेकांना अंदमानातच मृत्यू आला. सावकरांनी त्यांना अटक होऊन शिक्षा होईपर्यंत केवळ हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कारच केला नाही तर एक मुसलमान हा हिंदू इतकाच राष्ट्रवादी असू शकतो, असे म्हटले आहे. नंतरच्या काळात त्यांच्या देशभक्तीपासून मुस्लिमद्वेष, हिंदुत्वाचा कट्टर पुरस्कार करून मुस्लिम, ख्रिश्‍चन यांना दुय्यम ठरवणे आणि मग द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडण्यापर्यंत झालेला मत बदल सध्याच्या वातावरणात लोकांपुढे येणे गरजेचे आहे. त्यांच्या मतपरिवर्तनाचे उत्तर सावरकरांच्या दयेच्या अर्जावर क्रॅडॉक यांनी केलेल्या टिपणीत आहे. त्यांच्या तुरुंगातील आदर्श वागणूकीची बक्षिसी ब्रिटीश सरकारने त्यांना दिली. त्यांची 50 वर्षांची शिक्षा कमी करून 9 वर्षे 10 महिन्यांत भारतात आणण्यात आले. त्यानंतरची पाच वर्षे राजकारणात भाग न घेण्याची आणि रत्नागिरी जिल्ह्याची हद्द जिल्हाधिकार्‍याच्या परवानगीशिवायन ओलांडण्याची अट घालून रत्नागिरीत ठेवण्यात आले. सावरकर 1924 मध्ये ती रत्नागिरी वास्तव्यास येताच काही आठवड्यातच रत्नागिरीत हिंदू महासभेची शाखा सुरू करण्यात आली. ती सुरू करण्यासाठी सावरकरांचे बंधू बाबाराव यांचा पुढाकार होता. सावरकर रत्नागिरी रहाण्यास येणे आणि हिंदू महासभेची शाखा सुरू होणे हा योगायोग नव्हता आणि ही गोष्ट ब्रिटिशांच्या नजरेतून सुटणारीही नव्हती. पण त्याला ब्रिटिशांनी हरकत घेतलेली नाही कारण ह्यासाठी सावरकरांची सुटका करण्यात आली होती, असेही बोलले जाते. गांधी खून खटल्यातही त्यांची पुढे सुटका झाली असली तरी त्यात त्यांच्यावर आरोप झाले होते, हे विसरता येणार नाही. सावरकर हे भाजपाला वंदनीय आहेत हे मान्य परंतु त्यांच्याविषयी जे वास्तव आहे ते मांडण्याचा अधिकार त्यांच्या विरोधी असलेल्या विचारातील लोकांनाही आहे हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे सावरकरांविषयी विरोधात बोलणारे चुकीचे हे म्हणणे योग्य नाही. सारवकरांवरील वास्तव मान्य करुनच भाजपा नेत्यांनी टिकाटिपणी करावी. सध्या सभागृहाचा मोलाचा वेळ याविषयावर खर्ची घालू नये.
----------------------------------------------------------------------

0 Response to "सावरकर आणि वास्तव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel