-->
पहिले (दमदार) भाषण

पहिले (दमदार) भाषण

शनिवार दि. 21 डिसेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
पहिले (दमदार) भाषण
नागपूर आधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, शरद पवारांचे नातू रोहित पवार हे आपले पहिले भाषण कसे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या तिघांच्याही भाषणाचे वर्णन दमदार असेच करता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे या तिघांचाही भाजपा विरोध कडवा होता, हे ही जाणवले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधीमंडळात आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबरदस्त चिमटे काढले. उध्दव हे त्यांच्या मवाळ स्वभावाबाबत सर्वांना परिचित आहेत. मात्र एखादी ठाम भूमिका घेऊन त्यावर बोलताना ते सभागृहात दिसले. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे झालेले सकारात्मक बदल जाणवू लागले आहेत.  शिवाजी पार्कवरील  जाहीर सभेत बोलणे आणि विधान सभेत बोलणे यातील फरक ध्यानात घेऊन अतिशय संयमित, सभ्य, पण सडेतोड आणि पुरावे देऊन केलेले विधान सभेतील भाषण यासाठी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे  मुक्तकंठाने अभिनंदन केले पाहिजे. भाजपने मारलेले टोमणे, केलेले आरोप, उडवलेली खिल्ली या प्रत्येक मुद्द्याला ठाकरे यांनी जे प्रत्यत्तर दिले ते लाजबाब आहे. समोर बसलेले भाजपचे धुरीण अगदी फडणवीस यांचेसकट सर्व ज्या प्रकारे गप्प बसले होते ही गोष्ट खूप बोलकी आहे. भाजप म्हणजे भारत जलानेवाली पार्टी असे म्हहणणारे नितीश कुमार तुम्हाला चालतात, गोव्यात गाईचे मांस मुबलक उपलब्ध करून दिले जाईल म्हणणारे पर्रीकर सरकार तुमचेच होते, इकडे गो माता आणि तिकडे खाता हा दुटप्पीपणा, कर्नाटक सरकारने नेहमीच बेळगावी जनतेवर अन्याय केला आहे त्यांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही आणि देशाबाहेरील लोकांना न्याय द्यायला निघाला आहात, शेतकर्‍यांबद्दल रडतात, शेतकरी आत्महत्या ही थट्टा झाली आहे वगैरे मुक्ताफळे उधळता आणि वर त्यांचा खोटा कळवला दाखवता, शरद पवार माझे गुरू आहेत म्हणता आणि त्यांची संगत केली की आमच्याकडे बोट दाखवता, इत्यादी विधाने कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता त्यांनी केली. ठाकरेंचा हा संयम राज्य कारभार करायला उपयुक्त ठरेल. ज्ञानेश्‍वर आणि इतर संतांची वचने उपरोधाने वापरून त्यांनी 15 लाख, नोटाबंदीेचे 50 दिवस आणि इतर आश्‍वासने यांत्तील फोलपणा दाखवला. उद्धवजी मुख्यमंत्रीपदाची आब राखून बोललात. मात्र फडणवीस सत्ता गेली म्हणून गळा काढत विधानसभेत शिवसेनेच्या विरोधात रेकत होते. शेवटी संत गाडगे बाबा यांची वचनेे वाचून दाखवत आपले सरकार त्यानुसार कारभार करणार आहे ही ग्वाही ठाकरेंनी दिली ती उल्लेखनीय वाटते. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर नागपुरात शिवसैनिकांसमोर बोलतानाही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली व भाजपाचे वाभाडे काढले. एकूणच तीन भिन्न विचारांच्या पक्षांची मोट बांधणे हे सोपे नसले तरी हे पुढील पाच वर्षे टिकविण्याच्या निर्धाराने उध्दव ठाकरे बोलू लागले आहेत. नागरिकत्व विधेयकाच्या सुधारणांवरही त्यांनी आता ठोस भूमिका घेतली असून जामिया विद्यापीठेत जे झाले त्याची जालियनवाला बागेतील घटनेशी तुलना करुन भाजपावरील टीका अधिकच आक्रमक केली आहे. भाजपाला अजूनही वाटते की या तीन पक्षांचे जमणार नाही व शेवटी आपल्यासोबत शिवसेना सत्तेसाठी घरोबा करणार. परंतु उध्दव यांचे जे भाषण विधीमंडळात झाले आहे ते पाहता भाजपाचे काही स्वप्न काही सत्यात उतरेल असे दिसत नाही. उध्दव यांचे नागपुरातील शिवसैनिकांपुढील भाषणही भाजपाचे मनोधैर्य खच्ची करणारे होते. यापूर्वी जेव्हा 2014 साली भाजपाने आमच्याशी युती तोडली होती त्यावेळीही आम्ही हिंदूच होतो, आम्ही काही धर्मांतर केले नव्हते. या सवालावर भाजपा मात्र निरुत्तर झाली आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर ज्यावेळी भाजपाने सरकारवर टीका केली त्यावेळी त्यांनी इकडे गळा काढण्यापेक्षा केंद्रातील सरकारपुढे गळा काढा निधी तरी येईल असे ठणकावून सांगून भाजपाचा दुटप्पीपणा उघड केला. एकूणच पाहता उद्दव यांच्या संदर्भात असलेले सर्व गैरसमज दूर होत असून हळूहळू ते आपली पक्कड घट्ट करु लागले आहेत. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची लाभल्यापासून त्यांच्यातील विश्‍वास वाढल्याचे दिसते. केवळ उध्दवच नव्हे तर त्यांचे पुत्र आदित्य यांचे विधासभेतील पहिले भाषण भाजपाची पार हवा काढणारेच ठरले. चिखलात कमळ फुलते, असे म्हटले जाते. पण त्यासाठी आधी चिखल करा आणि मग कमळ फुलवा, असे आता होणार नाही, हे त्यांचे वक्तव्य म्हणजे सिक्सरच होती. महाराष्ट्रात तीन पक्षांची ताकद एकत्र आली आहे. सर्वत्र गोंधळ घालून देश पेटवायचा आणि मग राज्य आणायचे ही शिवसेना किंवा अन्य दोन्ही पक्षांची भूमिका नाही. आम्ही भयमुक्त महाराष्ट्र घडवायला निघालो आहोत, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भाजपला सुनावले. सभागृहातील दिग्गजांना नमन करतो, ज्यांनी मला सभागृहात पाठवले त्यांना नमन करतो, अशी सुरुवात करून आदित्य ठाकरे यांनी आपल्यातील शालिनता आम जनतेला दाखविली. त्याचबरोबर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचे भाषणही तरुणांसाठी दिशादर्शक ठरले. शरदरावांचे आपण वारस आहतो हे त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणातून दाखवून दिले.
---------------------------------------------------

0 Response to "पहिले (दमदार) भाषण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel