-->
नक्षलवादाचा बाऊ

नक्षलवादाचा बाऊ

गुरुवार दि. 30 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
नक्षलवादाचा बाऊ
सध्या राज्य सरकारने जशी उजव्या हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात मोहीम उघडली आहे तसेच डाव्या नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहिम उघडून त्यांच्या विरोधात बाऊ उभा केला आहे. परंतु यात सरकार यशस्वी होणार नाही. कारण हिंदुत्ववाद्यांच्या कारवाया कशा हिंसक होत्या व त्यांनी कोणाकोणा विरोधात कट रचले हे आता उघड होत आहे. गेले चार वर्षे सरकारने हिंदुत्ववाद्यांचे हे कोंबडे झाकले होते. पंरतु कर्नाटकच्या ए.टी.एस.ने त्यांचे पितळ उघड पाडल्यावर इकडे महाराष्ट्राच्या तपास यंत्रणांचे धाबे दणाणले व कारवाया सुरु झाल्या. आता सरकार आपण कसे कुणाच्याच विरोधात नाही हे भासविण्यासाठी डाव्या नक्षलवाद्यांच्या कारवाया दडपण्यासाठी कारवाया करीत आहे. परंतु गेल्या वेळी देखील अनेक नक्षलवादी संघटना व व्यक्ती सुखरुप सहिसलामत सुटले होते. आता देखील सरकारचा हा देखावा लवकरच उगड पडेल. प्रतिबंध घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे मुंबई, हैदराबाद, रांची, दिल्ली, फरीदाबाद या पाच शहरांमध्ये सहा जणांच्या घरांवर एकाच वेळी छापे घातले. त्यामध्ये नामवंत कवी वरवरा राव यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली, तर एकाची चौकशी सुरू आहे. दरम्यान, माओवाद्यांना खतपाणी घालणार्‍या थिंक टँकवरील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे.
शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद घेण्यात आली होती. त्यातील चिथावणीखोर भाषणामुळेच दुसर्‍या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचाराची घटना घडल्याचा पोलिसांना संशय होता. खरे तर यात काही तथ्य नाही. भीमा कोरेगावचे दंगलखोर कोण आहेत याची कल्पना सर्वांनाच आहे. एल्गार परिषदेमध्ये बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या समर्थकांचा सहभाग होता, परिषदेच्या आयोजनामागील सूत्रधार हे प्रमुख माओवादी नेते होते. त्यांनीच या परिषदेला अर्थपुरवठा केल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सुधीर ढवळे, प्रा. शोमा सेन, रोना विल्सन, ऍड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत यांना अटक केली होती. त्यांच्याकडून काही पत्रके व लॅपटॉप जप्त केला होता. सर्व जण बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंधित असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. ढवळे, विल्सन, गडलिंग, राऊत यांच्या चौकशीदरम्यान त्यांच्यामध्ये झालेल्या दोनशे ते अडीचशे ई-मेलची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये तेलंगणमधील कवी वरवरा राव, मुंबईतील वेरनोन गोन्साल्वीस, ठाण्यातील अरुण परेरा, छत्तीसगड येथील सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा यांच्या नावांची माहिती पोलिसांना मिळाली होती. ढवळे, सेन, विल्सन, गडलिंग व महेश राऊत यांनी वेळोवेळी ई-मेलद्वारे गोन्साल्वीस, परेरा, राव, भारद्वाज व नवलाखा यांच्याशी संपर्क साधल्याचे पोलिस तपासामध्ये निष्पन्न झाले होते. एल्गार परिषदेचा तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे एकाच वेळी देशभरात विविध ठिकाणी छापे घातले व राव, गोन्साल्वीस, परेरा, भारद्वाज व नवलाखा यांना अटक केली. एल्गार परिषदेमध्ये बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून पाच जणांना अटक केली आहे. माओवादी चळवळ जिवंत ठेवण्यात यांचा मोठा सहभाग होता. विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याअंतर्गत संबंधितांना अटक करण्यात आली आहे. यातील वरवरा राव हे नामवंत कवी, लेखक असून यापूर्वी 1973, 1975, 1986मध्ये माओवाद्यांशी संबंधांवरून अटक झाली होती. विरासम या क्रांतिकारी लेखक संघटनेचे ते संस्थापक आहेत. अरुण परेरा यांना यापूर्वी एका गुन्ह्यामध्ये अटक व सुटका झाली होती. सध्या ते वकिली करीत आहेत. वेरनोन गोन्साल्वीस यांना यापूर्वी एका गुन्ह्यात सात वर्षे शिक्षा, त्यानंतर सुटका झाली आहे. गौतम नवलाखा यांचा काश्मिरी फुटरतावाद्यांशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. सुधा भारद्वाज या छत्तीसगडमधील सामाजिक कार्यकर्त्या असून छत्तीसगड मुक्ती मोर्चाशी 1986 पासून संबंधित आहेत. छत्तीसगड पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजच्या (पीयूसीएल) सध्या सरचिटणीस आहेत. छत्तीसगडमधील रांचीतील सुसान अब्राहम, क्रांती टेकुला, फादर स्टॅन स्वामी आणि गोव्यात प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या निवासस्थानीही पोलिसांचे छापे पडले आहेत. स्टॅन स्वामी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. छाप्याच्या वेळी तेलतुंबडे निवासस्थानी नव्हते असे सांगण्यात आले. राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे बड्या राजकीय नेत्याला संपविण्याबाबतचे पत्र सुमारे दोन महिन्यांपूर्वी व्हायरल झाले होते. त्यावरून देशभर गोंधळ उडाला होता. या पत्राबाबतची कोणतीही माहिती पोलिसांनी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र, माओवाद्यांकडूनच ते पत्र फुटल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. हा बडा नेता म्हणजे पंतप्रदान नरेंद्र मोदी आहेत. अर्थात नक्षलवादी मोदींना मारतील हे अशक्य वाटते. कारण मोदींना मारुन त्यांना मोठा करण्याचे पाप नक्षलवादी करणार नाहीत. नक्षलवादी चळवळ ही बंदुकीतून क्रांती करण्यासाठी जन्माला आली, हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. त्यांची ताकद आहे क्षीण होत असली तरी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. प्रत्यक्षात जनतेते काम करणारे जसे नेते आहेत तसेच त्यांचे समर्थक मध्यमवर्गीयही आहेत. आता नक्षलवाद्यांना बंहुकीच्या नळीतून क्रांती काही शक्य नाही हे पटले आहे. परंतु ते अजून निवडणुकीच्या प्रक्रियेत आलेले नाहीत, काळाच्या ओघात येतीलही. परंतु ते आपल्या विरोधातील विचारांच्या नेत्यांना ठार मारीत नाहीत, हे देखील तेवढेच खरे. त्यांची लढाई ही प्रस्थापित सत्तेच्या विरोधात असते. अनेक नक्षलवादी आता मुख्य प्रवाहात आले आहेत. त्यामुळे सरकारने त्यांचा बाऊ उभा केला आहे.
-----------------------------------------------------------------------------

0 Response to "नक्षलवादाचा बाऊ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel