-->
आशियाच्या हिरोंचा सन्मान

आशियाच्या हिरोंचा सन्मान

शनिवार दि. 28 जुलै 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
आशियाच्या हिरोंचा सन्मान
लडाखसारख्या दुर्गम भागात शिक्षण, शालेय विज्ञानासारख्या क्षेत्रात आमूलाग्र बदल करुन आदर्श शिक्षणाचा श्रीगणेशा गिरविणारे सोनम वांगचुक व रस्त्यावरुन भटकणार्‍या वेड्यांना आपल्या आश्रयाला आणून त्यांना पुन्हा ठिकठाक करणारे डॉ. भरत वाटवानी यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. या दोघांचे सामाजिक काम पाहता, या पुरस्काराने आशिया खंडातील या दोघा हिरोंचा खर्‍या अथार्र्ने सन्मान झाला आहे. या दाघांचे कामही तसे विभन्न क्षेत्रातीलच आहे. आमीर खान यांच्या गाजलेल्या  थ्री इडियटस् या चित्रपटातील फुंगसुक वांगडू ही व्यक्तीरेखा सोनम वांगचुक यांच्यावर बेतलेली होती. या चित्रपटानंतर वांगचुक हे प्रकाशझोतात आले. आपल्या देशात शैक्षणिक पध्दती नेमकी कशी असावा याचे एक मॉडेल त्यांनी लडाखसारख्या अतिदुर्गम भागात करुन दाखविले. मुलांना शिक्षण देताना ते पुस्तकी नसावे, त्याचबरोबर त्यांना त्यात गोडी निर्माण व्हावी व त्या शिक्षणाचा त्यांना पुढील आयुष्यात उपयोग व्हावा यासाठी त्यांनी आजवर अनेक प्रयोग केले. त्यांनी लडाखच्या दुर्गम भागात शिक्षण पद्धतीत कल्पक बदल केले, पाणी टंचाईवर मात करणारे हिमस्तुप बनवले, लाखो लोकांना, मुलांना प्रयोग करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. स्वत: त्यांचा शाळेतील प्रवेश हा वयाच्या नवव्या वर्षी झाला. त्यांना त्यांच्या आईनेच आपल्या मातृभाषेतील प्राथमिक शिक्षण दिले. पुढे त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. केले. इंजिनिअरिंगची शाखा निवडताना त्यांचे वडिलांशी मतभेद झाले व त्यांना आपले शिक्षण स्वत: खर्च करुन करावे लागले. त्यानंतर त्यांनी फ्रांन्समधून दोन वर्षेाचा अर्किटेक्चरचा कोर्स केला. वांगचुक यांना शिक्षकी पेशाची आवड असल्याने त्यांनी अर्थातच शिक्षणाचे क्षेत्र निवडले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी एका मासिकासाठी संपादनाचे कामही केले. लवकरच त्यांनी एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली व लडाखमध्ये शिक्षण क्षेत्रात काम सुरु केले. लडाखच्या हिल कौन्सिलसाठी त्यांनी शैेक्षणिक आराखडा तयार केला व त्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले. याचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते झाले होते. त्याचवेळी डॉ. सिंग यांनी वांगचुक यांची नियुक्ती मानव साधन संपत्ती मंत्रालयाच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या राष्ट्रीय कौन्सिलवर करुन त्यांच्या कार्याची दखल घेतली होती. लडाख, नेपाळ, सिक्किम या भागात सौर उर्जेचा वापर कसा होईल यासाठी त्यांनी खास रचना असलेली घरे कशी बांधावीत याचे मॉडेल तयार केले होते. यातून अनेकांनी घरे बांधली व सौर उर्जा घरातच निर्माण केली. अशाच प्रकारे त्यांनी थंडीच्या दिवसात उबदार राहिल अशा शाळा बांधल्या. त्यामुळे भर थंडीतही शाळेत मुलांना शिकायला येणे शक्य झाले. अन्यथा त्यापूर्वी थंडीच्या दिवसात या शाळा बंद ठेवाव्या लागत होत्या. त्यांनी प्रामुख्याने थंड प्रदेशातील मुलांचे प्रश्‍न व त्यांच्या शैक्षणिक समस्यांकडे लक्ष दिले असले तरी देशातील मुलांनाही त्यांचा लाभ घेणे शक्य आहे. प्रामुख्याने त्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा केलेला आग्रह. त्यामुळे मुलांना चांगले शिक्षण घेता येते, हे त्यांनी अनेक प्रयोगाअंती सिध्द करुन दाखविले. अशा प्रकारे त्यांनी शिक्षण, पर्यावरण व अर्थकारण अशा क्षेत्रात आपले येगदान दिले. डॉ. भरत वाटवानी यांनी व त्यांच्या पत्नीने घरातून टाकून दिलेल्या मनोरुग्णांना आसरा देऊन त्यांच्यावर मानसिक उपचार करुन त्यांना चांगले केले. अनेकदा रस्त्यावर खितपत पडलेल्या व समाजाने वाळीत टाकलेल्या अशा वेड्यांना आपल्या दवाखान्यात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यास त्यांनी 20 वर्षापूर्वी सुरुवात केली. अनेक मानसिक रुग्ण त्यांच्या उपचारास चांगला प्रतिसाद देऊ लागले व त्यांची प्रकृती चांगली झाल्यावर त्यांना त्यांनी त्यांच्या नातेवाईकांशी भेटून त्यांचे मनोमिलन केले आहे. आजवर त्यांनी पाच हजारांच्यावर वेड्यांना चांगले करुन त्यांना पुन्हा आपल्या घरी पाठवून दिले आहे. असा लोकांसाठी डॉ. वाटवाणी हे देवदूतच ठरले आहेत. त्यांनी केलेले हे काम अतिशय कठीणच आहे. कारण अनोखळी एखाद्या वेड्याला आपल्या आश्रमात आणून त्यांच्यावर औषधोपचार करणे ही काही सोपी बाब नाही. अनेकदा त्यांच्यावर टीकाही झाली, परंतु त्यांनी त्या टिकेचा कधी विचारच केला नाही. त्यांनी रायगडात कर्जत जवळील वेणगाव येथेे आपला एक आश्रम सुरु केला. आज त्या ठिकाणाहून अनेक रोगी बरे होऊन आपल्य घरी गेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी मानसिक रोग जडलेल्यांना बरे करुन पुन्हा माणसात आणले व त्यांना या जगात राहाण्याचा मार्ग सुकर केला. अनेकदा ज्यांची ठार वेडे म्हणून गणणा झाली होती त्यांना ठीक करुन ते कामधंदा करुन आपले पोट भरु लागले आहेत. आता त्यांना नातेवाईकात आपले स्थान मिळविता आले. शिक्षणक्षेत्रात क्रांती करणारे वांगचुक किंवा वेड्यांना ठीक करणारे डॉ. वाटवानी यांची समाजसेवा हा आजच्या तरुण पिढीपुढे आदर्श आहे. त्यांच्या कार्याची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने जगाने घेतली. या आशियातील दोघा हिरोंना आमचा सलाम!
------------------------------------------------------------------

0 Response to "आशियाच्या हिरोंचा सन्मान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel