-->
दुभंगलेले समाजमन

दुभंगलेले समाजमन

शुक्रवार दि. 27 जुलै 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
दुभंगलेले समाजमन  
लाखोंची उपस्थिती असूनही कमालीची शिस्त आणि संयम हे मराठा आरक्षण मोर्चाचे वैशिष्ट्य असल्याचे गेल्या वर्षात बोलले गेले. परंतु मराठा युवकांचा हा संयम सुटला व गेल्या दोन दिवसात त्याचा उद्रेक झाला. कोणत्याही राजकीय नेत्याचा वा पक्षाचा आधार न घेता मराठा मोर्चे निघत होते. मराठा तरुणांमधील अस्वस्थता यातून प्रगट होत होती. या मराठा तरुणांच्या मोर्च्यानंतर त्यांच्या आंदोलनातील हवा काढण्यासाठी मुंबईतील मोर्चासमोर सरकारतर्फे काही घोषणा करण्यात आल्या. स्कॉलरशिपसाठी मार्कांची अट कमी करण्याच्या व फीमध्ये सवलती देण्याच्या घोषणेला मोर्चातील तरुण-तरुणींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी आरक्षणाबाबत सरकराने मौन बाळगले होते, कारण ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे सांगून सरकारला आपला वेळ काढायची संधी चालून आली होती. सरकारने जे दिले त्यावर मराठा तरुणांनी तात्पुरते समाधान मानून घेतले व आरक्षणाचे समाधानही लवकरच वाट्याला येईल अशी अपेक्षा होती. शेवटी सरकारने केवळ गप्पाच केल्या व आपली फसवणूक केल्याचे समजल्यावर मराठा आरक्षण आंदोलनाने पुन्हा जोर पकडला. त्यातच मध्यंतरी सरकारने जंबो मेगा भरती जाहीर केली. ही भरती बहुदा येत्या दशकातील शेवटची असावी. त्यामुळे त्याअगोदर आरक्षण द्यावे अशी मराठा तरुणांची अपेक्षा होती. कारण शेती काही ठीक चालत नाही, खासगी नोकर्‍याही नाहीत अशा वेळी सरकारी नोकरी हा या तरुणांना मोठा आधार वाटत होता. पंढरपुरातील पुजेवरुन अखेर ठीणगी पडी. मुख्यमंत्र्यांनी वातावरणातील दाहकता लक्षात घेता, माघात घेतली व पुजेला जाणे टाळले. यात धुर्तपणा मुख्यमंत्र्यांनी जरुर केला व प्रश्‍नापासून त्यांना पळणे काही शक्य नव्हते. मराठा मोर्चाचे तरुण नेतृत्व संयमी असले तरी अशा गर्दीचा गैरफायदा उठवणारे विघ्नसंतोषी असतात. त्यांनी गडबड केली असती तर महाराष्ट्रात सर्वोच्च स्थानी असलेल्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेला तडा गेला असता. वारकरी परंपरा ही धार्मिक म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक आहे. मुख्यमंत्र्यांची अस्वस्थता समजू शकते, पण अशा वेळी शब्द फार जपून वापरायला हवे होते. तसे न झाल्यामुळे आरक्षणाची मागणी करणारे तरुण संतापले. आंदोलनाला धार चढली. काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. यामुळे वातावरण तापण्यास मदत झाली. एखादा तरुण जलसमाधी घेतो व आयुष्य संपवितो, ही बाब अतिशय गंभीरच आहे. परंतु या तरुणाला आपला जीव संपविण्यापर्यतची  वेळ येते, ही बाब फार दुर्दैवी आहे. यातून मराठा समाजातील तरुणांची मानसिक अवस्था लक्षात येते. हे सर्व हत असताना सरकारने ढीम्मपणे आपला कारभार केला. हे प्रकरण संपवून त्यातून या प्रश्‍नाची उकल करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचे सहकारी काही ना काही तरी वारगळू लागले. यातून भडका वाढणे स्वाभाविकच होते. अखेर तरुणांचा संयम सुटून या आंदोलनाला हिंसक वळण लागले. सरकारने काही चांगल्या योजना मराठा समाजासाठी जाहीर केल्या; पण त्या तरुणांपर्यंत पोहोचल्या का, याचा काहीही आढावा घेण्यात आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणे आपल्या राज्यातील मुख्यमंत्री देखील फक्त घोषणा करतात, पण त्या वास्तवात उतरत नाहीत असे तरुणांचे म्हणणे आहे. अर्तात यात काही खोटे नाही. तथ्य आहेच. त्यातून मुख्यमंत्र्यांवरील त्यांचा विश्‍वास उडालेला आहे. सरकारी योजना मराठा तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे नेते व कार्यकर्ते काम करताना दिसत नाहीत. सध्या मराठा तरुणांची अस्वस्थता फार बिथरलेली आहे. शेतीवर भागत नाही. ती शेती देखील तटपुंजी आहे. औद्योगिकीकरण वेगाने होत नसल्याने नोकर्‍या मिळत नाहीत. आरक्षण नसल्याने व्यावसायिक शिक्षणामध्ये शिरकाव होत नाही. यातून तरुणांमध्ये नैराश्य पसरले आहे. सरकार केवळ गप्पा करते, त्यापुढे त्यांच्या हातून काही घडत नाही. तरुणांना आपल्यापेक्षा पुडे जाणारे अन्य तरुण दिसतात. परंतु आपला विकास न झाल्याचे दिसते. समाजातील मराठा नेते आहेत, आमदार आहेत, परंतु त्यांनी आपला स्वात:चाच विकास करुन घेता. समाजाचा विचार केला नाही. त्यामुळे मराठा समाजाला त्यांचा काय फायदा झाला असा प्रश्‍न पडतो. केवळ इतिहासाच्या ओझ्याखाली कितीकाळ जगायचे. शिवाजी महाराजांचे केवळ नाव घेऊन पोट भरता येत नाही. मराठा व मराठेतर अशी फूट वेगाने रुंदावत चालली आहे. आमच्या हक्कांवर आक्रमण होत आहे अशी भावना मराठेतरांमध्ये आहे. याचे राजकीय परिणाम जे व्हायचे ते होतील, पण सामाजिक परिणाम वाईट असतील. हे थांबवण्यासाठी आरक्षण झटपट मिळणे कसे कठीण आहे व आरक्षण मिळेपर्यंत न थांबता मराठा समाजाचा विकास होणे कसे शक्य आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी परिणामकारक संवाद साधला पाहिजे. सध्याच्या स्थितीत आपल्यासारख्या पुरोगामी राज्यातील समाज मने दुभंगत चालली आहेत, हे आपल्याला परवडणारे नाही. हे समाजमन पुन्हा एकत्र आणणे हे अवघड काम आता सत्ताधार्‍यांवर आहे.
--------------------------------------------------------

0 Response to "दुभंगलेले समाजमन "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel