-->
पुन्हा विदेश दौर्‍यावर / नेत्र बँका वाढवा

पुन्हा विदेश दौर्‍यावर / नेत्र बँका वाढवा

गुरुवार दि. 26 जुलै 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पुन्हा विदेश दौर्‍यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्‍वास ठराव जिंकल्यावर आफ्रिकेतील रवांडा, युगांडा आणि द. आफ्रिका या तीन देशांच्या पाच दिवसांच्या दौर्‍यावर रवाना झाले आहेत. रवांडा आणि युगांडा या देशाला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. आजवर 56 देशांना भेटी दिल्यावर आता त्यांनी आपल्या शेवटच्या वर्षात आफ्रिका खंडाकडे लक्ष केंद्रीत केलेले दिसते. सर्वात आधी ते रवांडा नावाच्या छोट्याश्या देशात पोहोचले. ही भेट अत्यंत खास आहे, कारण हा देश जरी छोटा असला तरी या देशाला त्यांनी 200 गायी भेट दिल्या आहेत. दिल्लीपेक्षाही कमी लोकसंख्या असलेला हा देश. चीनचे राष्ट्रपतीही रविवारी रवांडा या ठिकाणी पोहचले आहेत. त्यापाठोपाठ आता मोदींनी या देशात पाऊल टाकले आहे. गिरिंका या उपक्रमा अंतर्गत देशातील पूर्व भागातून या गायींची खरेदी करुन या देशात देण्यात आल्या आहेत. गिरिंका या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे एक गाय आवश्यक आहे. त्यामुळे या 200 गायींची खरेदी करण्यात आल्या आहेत. जेव्हा एखाद्या गायीला पिल्लू होईल तेव्हा ते शेजार्‍याला भेट देण्यात येणार आहे. गरीबातल्या गरीब कुटुंबासाठी गाय हे उदरनिर्वाहाचे साधन असल्यानेच रवांडा येथील गरीब कुटुंबांना 200 गायी भेट देण्यात आल्या आहेत. घरात गाय असेल तर गरीब कुटुंबाला घरच्या घरीच दूध मिळेल असाही विचार आहे. रवांडा हा देश छोटा असला तरीही राजधानीचे शहर असलेल्या किगलीत अत्यंत रचनात्मक रित्या मेट्रोचे जाळे उभारण्यात आले आहे. तसेच किगलीमध्ये आणि संपूर्ण देशात वेळेला अनन्य साधारण महत्त्व आहे. या देशाचा आदर्श भारतानेही घ्यायला हवा असा हा देश आहे. हा देश 1994 नंतर विकसित व्हायला सुरूवात झाली. याआधीचा रवांडाचा इतिहास हा नरसंहारक आहे. महिला सशक्तीकरणातही रवांडा हा देश अव्वल स्थानी आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची मागणी भारतात होते आहे. यासंबंधीचे विधेयक भारतात प्रलंबित आहे. खरे तर हा देश लहान व गरीब असला तरी त्यांच्याकडून आपल्याला बरेच शिकता येईल असेच आहे. या दोन दिवसांच्या दौर्‍यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी युगांडा येथे पोहोचले. आफ्रिकेतील या दौर्‍यामुळे जवळपास अवघे विश्‍वच मोदींच्या विदेश दौर्‍यांनी पूर्ण होईल असेच दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या चार वर्षात 56 देशांना भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये आता आणखी तीन देशांचा समावेश होईल. रवांडा आणि युगांडा या दोन देशांच्या दौर्‍यांमुळे मोदी 58 देशांना भेट देणारे भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. मोदींनी गेल्या चार वर्षातील 171 दिवस विदेशात घावले आहेत. त्यामुळे पंतप्रधान कार्यकाळातील 12 टक्के वेळ त्यांचा परदेशात गेला आहे. गेल्या चार वर्षांत मोदींच्या या दौर्‍यावर 1484 कोटी रुपयांचा खर्च झाला असून एप्रिल 2015 च्या दौर्‍यावेळी सर्वाधिक करण्यात आला आहे. त्यामध्ये फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांना मोदींनी भेटी दिल्या होत्या. मोदींच्या चार वर्षीय कार्यकाळात त्यांनी अमेरिकेला सर्वाधिक वेळा भेट दिली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नऊ वर्षातील कार्यकाळात विदेश दौर्‍यावर 642 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. मोदींच्या तुलनेत मनमोहनसिंग यांचा नऊ वर्षातील विदेश दौर्‍यांचा खर्च निम्म्यापेक्षाही कमी आहे. मोदींच्या या विदेश दौर्‍यांचा देशाला नेमका फायदा काय? विदेशी गुंतवणूक काही आलेली नाही. तसेच अलिप्त राष्ट चळवळ ही मोदींनी संपविली आहे. या विदेश दौर्‍याचा देशाला खरोखरीच फायदा आहे का, हा सवाल आहे.
नेत्र बँका वाढवा
राज्यात डोळ्यांसाठी दृष्टीहिनांची प्रतीक्षा यादी मोठी असतानाही मरणोत्तर नेत्रदानासाठी नेत्र बँकांचीच संख्या पुरेशी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दक्षिण कोकण व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही नेत्र बँका उपलब्ध नाहीत. 35 पैकी 14 जिल्ह्यांमध्ये एकही नेत्र बँक नसल्याने नेत्रदानात मोठा अडथळा अद्यापही कायम आहे. मृत्यूपश्‍चात सहा तासांच्या आत नेत्रदान व्हायला हवे अन्यथा डोळ्यांतील कोर्निया प्रत्यारोपणासाठी उपयोगी राहत नाही; परंतु राज्यात केवळ 73 नेत्र बँका उपलब्ध आहेत. राज्यभरात केवळ मुंबई जिल्ह्यात 11 नेत्र बँका उपलब्ध आहेत. त्याखालोखाल पुण्यात 9, सांगलीत 8, नाशिक 5, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, अहमदनगर या जिल्ह्यांत प्रत्येकी 4 नेत्र बँका उपलब्ध आहेत. सोलापूर, जळगाव, लातूर येथे प्रत्येकी 3, जालना, कोल्हापूर, ठाणे, वर्धा, धुळे या जिल्ह्यांत प्रत्येकी 2 नेत्र बँका उपलब्ध आहेत; तर सातारा, रायगड, नांदेड, यवतमाळ, अकोल्यात केवळ एकच नेत्र बँक उपलब्ध आहे. बुलढाणा, हिंगोली, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, पालघर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम आणि नंदुरबार जिल्ह्यांत एकही नेत्र बँक उपलब्ध नाही. यामुळे राज्याला नेत्रदानाचा अपेक्षित टप्पा गाठायला असंख्य अडचणी येत आहेत. दक्षिण कोकणात नेत्र बँका उपलब्ध नसल्याने सांगलीतील नेत्र बँकांची मदत घेतली जाते. नेत्रदानाची मोहिम आपण हाती घेता, त्याचा प्रचार व प्रसार करतो. मात्र मृत्यूनंतर जर नेत्र बँक उपलब्ध झाली नाही तर नेत्रदानाचा काहीच फायदा होत नाही. मृत माणसाची नेत्र दानाची कितीही इच्छा असली तरीही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सरकारने नेत्र बँक तातडीने वाढविण्याची आवश्यकता आहे.
--------------------------------------------------------------------

0 Response to "पुन्हा विदेश दौर्‍यावर / नेत्र बँका वाढवा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel