-->
सोशल मिडियाची आव्हाने

सोशल मिडियाची आव्हाने

सोमवार दि. 23 जुलै 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
सोशल मिडियाची आव्हाने
सध्या आपल्याकडील वातावरण पूर्णपणे सोशल मिडियाच्या प्रभावाखाली आले आहे. फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, व्हॉट्सप ही अतिशय वेगवान माध्यमे आता सर्वव्यापी झाली आहेत. एकेकाळी स्वातंत्र्यानंतर साक्षरता वाढल्यावर आपल्याकडे वृत्तपत्रांचे खप झपाट्याने वाढले होते. आता त्याहीपेक्षा मोठ्या झपाट्याने केवळ वैयक्तिक स्तरावरच नाही, तर संस्थात्मक पातळीवरही माहितीची देवाणघेवाण सुलभपणे होताना आपण पाहतो. माहिती झपाट्याने पसरते हे वास्तव आहे, मात्र ती माहिती कशी आहे? त्यातील खरे वास्तव काय आहे? खोटी माहिती या माध्यमातून झपाट्याने पसरत जाते हे सध्या मोठे काळजीचे कारण ठरत आहे. बहुतेक वृत्तपत्रांचे आणि वाहिन्यांचे फेसबुक पेज आणि ट्विटर हॅण्डल असल्यामुळे ही माध्यमे हळूहळू मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. पण संवादाची म्हणून ओळखली जाणारी ही माध्यमे गेल्या काही वर्षांत विसंवादाची माध्यमे म्हणून समोर येऊ लागली आहेत. सोशल मिडियाच्या उदयामुळे लोकांना आपली मते व्यक्त झटपट वेगाने व्यक्त करण्याचे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, हे देखील तेवढेच खरे. पूर्वी आपल्याकडे वृत्तपत्रांत पत्र लिहून लोक व्यक्त होत असत, परंतु आता हा प्रकार आता कमी झाला आहे. त्यापेक्षा सोशल नेटवर्गींकमध्ये आपले त व्यक्त करुन लोक समाधान पावतात. परंतु याव्दारे एक चुकीचे टोक गाठले जात आहे. मुले पळवणारी टोळी ही एक सोशल मिडियावरील अफवा आपल्या देशातील नऊ राज्यांत तीस जणांचा बळी घेते हे कशाचे लक्षण आहे ? भयभीत आणि काहीतरी अघटित घडेल अशा आजारी मनोवस्थेला पोचलेला हा समाज आज हातात मोबाईल घेऊन फिरताना विलक्षण करुण दिसत आहे. झुंडीच्या झुंडीने जाऊन एखाद्या माणसाचे संशयाने तुकडे तुकडे केले, ही आता भीषण बातमी न राहता ती एक नित्याची बाब बनणे हे आपण मनाने दगड होत चालल्याचे लक्षण आहे. अफवा, खोट्या बातम्या पसरवल्या जातात यात केवळ ते करणारी संबंधित व्यक्ती किंवा गट केवळ जबाबदार नसतो, तर त्याला ते पसरवायला मदत करणारी अनुकूल यंत्रणा आणि राजकीय, सामाजिक परिस्थितीही तेवढीच जबाबदार असते. आपण आपल्याकडे सोशल मिडियाचे असे परिणाम पाहत असताना अन्य देशात त्याचे कसे पडसाद कसे आहेत, हे पाहणे महत्वाचे ठरेल. आपल्यापेक्षा अगेदर अमेरिकेत, युरोपमध्ये सोशल मिडिया विकसीत पावला. पण तिथे असले क्रूर तांडव सहसा पाहायला मिळत नाही. एक जबाबदार समाज म्हणून आपण किती खालावले गेलो आहोत हेच यावरुन दिसते. समाज दूषित होतोय, हिंसक होतोय म्हणून आधुनिक यंत्रणा नाकारणे हे चुकीचेच आहे. यासाठी आपल्याला जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. आपल्यातील जाणत्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सेल्फि काढण्याच्या नादात आपला जीव गमावलेले शेकडे लोक आपल्याला भेटतात हे आपल्यातील घसरत्या समाजमनाचे लक्षण म्हटले पाहिजे. आपल्यापुढे असलेला धोका पण किती आंगावर घ्यायचा हे आता ठरविण्याची वेळ आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये या संबंधीच्या धोक्याच्या सूचना वारंवार शिक्षकांनी वर्गात द्यायला हव्यात. या माध्यमाच्या विळख्यात अजून न गुरफटलेली नवी पिढी आपल्याला वाचवायची असेल तर तिचे प्रबोधन हे मोठे आव्हान आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. आपली कुटुंबव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली नाही. त्यामुळे पालकांना यात महत्वाची भूमिका निभावता येऊ शकेल. वेगाने आदळणारे तंत्रज्ञान आणि सुख-सुविधांची रेलचेल आपल्या कुटुंबाला आणि समाजाला विस्कळित तर करणार नाही ना याची काळजी प्रत्येकाने घेतली तर हा विकासाचा मेगा हायवे आपला जीवनप्रवास नक्की सुखाचा करेल. रिलायन्सने नुकतेच मोबाईल व डाटा पुरविण्यासाठी आणकी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. गेल्या वेळी रिलायन्सने बाजारात प्रवेश केला त्यावेळी करलो दुनिया मुठ्ठीमे ही घोषणा दिली होती, ही योजना त्यांनी खर्‍या अर्थाने यशस्वी करुन दाखविली. स्वस्तात मोबाईल सेवा देऊन सर्वसामान्यांच्या हातात त्यांनी मोबाईल सेवा पोहोचविली. परंतु आता ब्रॉडब्रँड सर्वांना पोहोचवून ते अनेक धोके समाजापर्यंत पोहोचविणार आहेत. यातूनच आभासी जग सर्वसामान्यांसाठी आणखी जवळ येणार आहे. सध्या जगाच्या स्थिरजोडणी इंटरनेट नकाशावर आपला 134 वा क्रमांक आहे. त्यामुळे त्यात आपण बरेच मागे आहोत. आता रिल्यान्सच्या या नवीन आवतारामुळे प्रत्येकाच्या हातात झपाट्याने सर्फिंग करता येणारे नेट पोहोचणार आहे. अर्थात तेही अतिशय नाममात्र शुल्कात. रिलायन्सची कंपनी म्हणून यातील बाजारपेठ काबीज करण्याची स्ट्रॅटिजी आपण समजू शकतो. परंतु यातून तरुण पिढी व आपल्यातील समाजमन कोणत्या दिशेला भरकटेल याचा थांगपत्ता लागणे कठीण आहे. भारत ही जगातली सर्वात मोठी मोबाईलची बाजारपेठ असून जगातल्या एकूण विक्रीपैकी दहा टक्के फोन एकट्या भारतात विकले जातात. 2017 मध्ये हा आकडा 29.9 कोटी इतका होता. आता पुढील टप्प्यात सोशल मिडिया व एकूणच संपर्क माध्यमाची गगनभरारी आपल्याला नेमके कुठे घेऊन जाणार आहे हा प्रश्‍न विचार करायला लावणारा आहे. यातून अनेक नवीन प्रश्‍न निर्माण होणार आहेत. गुन्हेगारीचे स्वरुप बदलत जाणार आहे. त्याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे तरुण पिढी उध्दस्थ होण्याच्या टप्प्यावर पोहोचू शकते. सोशल मिडिया हे चांगले आहे, परंतु ते तुम्ही कसे वापरता त्यावर बरेचसे अवलंबून आहे.
----------------------------------------------------

0 Response to "सोशल मिडियाची आव्हाने"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel