-->
नवी मुंबईचा सन्मान

नवी मुंबईचा सन्मान

संपादकीय पान बुधवार दि. १२ ऑगस्ट २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नवी मुंबईचा सन्मान
देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत तिसरे क्रमांक मिळविण्याचा मान नवी मुंबई शहरास मिळाला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, देशाची राजधानी दिल्ली असली तरीही स्वच्छतेच्या बाबतीत ती पिछाडीवर आहे. मात्र मुंबई विस्तारत असताना ७०च्या दशकात नवी मुंबई विकसीत करण्याचा निर्णय झाला, एक नियोजनबध्द शहर उभारावे व मुंबईतील जनता ज्या सुविधांपासून वंचित राहिली आहे त्या सर्व सुविधा नवी मुंबईत पुरवाव्यात अशी कल्पना त्यावेळी होती. अर्थातच ही कल्पना आज नवीन मुंबईचा स्वच्छ शहर म्हणून सन्मान झाला असताना पूर्णपणे यशस्वी झाली असे म्हणता येईल. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचा क्रमांक शेवटून शंभरांच्या यादीत म्हणजे ४७६ शहरांमधून ३९७ वा लागला. त्यामुळेे देशाची राजधानी एक बकाल शहर आहे असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. मुंबई व त्याच्या उपनगराचा क्रमांक या यादीत १४७ वा आला. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातील स्वच्छ शहरांची पहाणी करण्यात आली होती. त्यानुसार हे क्रमांक लावण्यात आले. एक लाख किंवा त्याहून जास्त वस्ती असलेली शहरे त्यासाठी निवडण्यात आली होती. शहरातील स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा, स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा हे नित्कर्ष यासाठी ठरविण्यात आले होते. संपूर्ण देशांचा विचार करता उत्तर भारत हा जास्त अस्वच्छ असलेला भाग ठरला आहे. उत्तर भारतातील आघाडीच्या १०० शहरात केवळ १२ शहरांचा समावेश आहे. तर दक्षिण भारतातील ३९ शहरे ही या आघाडीच्या १०० शहरात समाविष्ट आहेत. पूर्वेतील २७, पश्‍चिमेतील १५ व ईशान्य भारतातील ७ शहरांचा या १०० शहरांमध्ये समावेश आहे. कर्नाटकातील म्हैसूर हे शहर सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. या शहराने देशात स्वच्छतेबाबत पहिला क्रमांक पटकाविला. तर मध्यप्रदेशातील दामोह हे शहर सर्वात अस्वच्छ शहर म्हणून नोंदविले गेले. बिहारची राजधानी असलेल्या पटना शहराचा क्रमांक ४२९ वा लागला. २०१४ साली चंदीगढला देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून मान मिळाला होता, यंदा मात्र या शहराचा क्रमांक २१वर घसरला आहे. पश्‍चिम बंगालची स्वच्छतेच्या बाबतीत कामगिरी उत्कृष्ट आहे. या राज्यातील आघाडीच्या १०० शहरांच्या यादीत २५ शहरे आहेत. खरे तर उत्तरप्रदेशात सर्वात  जास्त संख्येने शहरे आहेत, मात्र पहिल्या १०० शहरांच्या यादीत या राज्यातील केवळ एकच शहर म्हणजे इटावा आले आहे. त्यावरुन या राज्यातील नागरिकरणाच्या समस्यांचा अंदाज येतो. स्वच्छता अभियानाचा आघाडीने पुरस्कार करणार्‍या पंतप्रधानांच्या मतदारसंघातील वाराणसी हे शहर तब्बल ४१८व्या क्रमांकावर आले आहे. पंतप्रधानानंनी स्वच्छ भारत मोहिमेची सुरुवात याच शहरातून केली होती व निवडून आल्यानंतर गंगा नंदी स्वच्छ करण्याची शपथ घेतली होती. परंतु पंतप्रधान मोदी यांच्या घोषणा या केवळ कागदावरच राहिल्या आहेत, हे पुन्हा एकदा या शहरांच्या यादीवर नजर टाकल्यास जाणवते. एकूणच पाहता आपल्याकडे स्वच्छतेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरजेची आहे. अजून शहरात स्वच्छेतेबाबत अज्ञान आहे तर ग्रामीण भागाकडून एवढ्यात अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. महाराष्ट्रातील नवी मुंबई हे शहर तिसरे आल्यामुळे राज्याने देखील नागरीकरण करताना कोणती पथ्ये पाळणे गरजेचे आहे ते समजू शकते. सर्वात मोठ्या प्रमाणावर आज नागरीकरण महाराष्ट्रात होत आहे. परंतु त्यातून उद्भविणार्‍या प्रश्‍नांचे कुणालाच काही देणे-घेणे नाही. नवी मुंबई हे शहर ७०च्या दशकात जाणून बुजून विकसीत केले होते. त्यासाठी नामवंत वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी या शहराची रचना करताना सांडपाणी, पिण्याचे पाणी व इमारतींच्या रचना कशा असाव्यात याची आखणी योग्यरित्या केली. यातून हे शहर उभे राहिल्यामुळे आज त्याला पुरस्कार मिळाला आहे. मुंबईचा जसा विकास होत गेला व हे शहर आता आणखी लोकसंख्या सामावून घेऊ शकणार नाही याची कल्पना आल्यावर असा प्रकारचे जुळे शहर उभारण्याची कल्पना राज्यकर्त्यांना सुचली होती. परंतु हळूहळू नवी मुंबई हे चांगले विकसीत होईल व तेथे सर्व कार्यालये हलविली तर मुंबईचा भारही कमी होईल अशी कल्पना होती. मात्र ही कल्पना काही शेवटपर्यंत प्रत्यक्षात उतरली नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे मुंबई व नवी मुंबई ही शहरे जोडण्यासाठी उत्कृष्ट सार्वाजनिक वाहतूक सेवा पुरविण्यात आली नाही. हे शहर विकसीत झाले व नंतर तेथे रखडत लोकल पोहोचली. रस्ते नंतर उभारण्यात आले. त्यावेळी जर ही दोन्ही शहरे मेट्रोसारख्या अत्याधुनिक सेवेने जोडले गेले असते तर नवी मुंबईचा चेहरा मोहरा अजूनही पालटला गेला असता. आता या शहराचा समावेशही स्मार्च शहरात करण्यात आला आहे. खरे तर अशा प्रकारची शहरे स्मार्ट करुन सरकार केवळ दिखावा करणार आहे. अर्थात जी शहरे सध्या गबाळी आहेत त्यांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांचा त्यांचा समावेश स्मार्ट शहरांच्या यादीत करणे गरजेचे आहे. नवी मुंबईला कमतरता भसत होती ती आन्तरारष्ट्रीय विमानतळाची, पण ती देखील आता पूर्ण होणार आहे. या शहरात मेट्रो येतच आहे. सान्ताक्रुझ विमानतळ ते नवी मुंबईतील विमानतळ हे देखील मेट्रोने जोडले जाणार आहे, त्यामुळे नवी मुंबई हे शहर आता एक परिपूर्ण अत्याधुनिक शहर होईल. आता पुढील टप्प्यात पनवेल, पेण व अलिबाग ही शहरे मुंबईला चार पदरी रस्त्याने जोडली गेल्यास नवी मुंबईचा तो एक विस्तार ठरेल. मात्र सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीवर हे सर्व अवलंबून आहे.
-------------------------------------------------------------  

0 Response to "नवी मुंबईचा सन्मान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel