-->
असुरक्षित किनारपट्टी

असुरक्षित किनारपट्टी

संपादकीय पान मंगळवार दि. ११ ऑगस्ट २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
असुरक्षित किनारपट्टी
रायगड जिल्ह्यात दहशतवादी घुसल्याच्या चर्चेमुळे पोलीसांची जोरदार धावपळ सुरू आहे. काही नागरिकांनी पाहिलेले ते कोण, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र अद्याप पोलिसांना सापडलेले नाही. शनिवारी मुरुडमधील सायगाव येथे पहाटेच्या सुमारास आठ ते दहा संशयित फिरत असल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांत कळविले आणि पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांनी चांगलेच कामाला लावले. जिल्हा अधीक्षक सुवेझ हक यांनी जिल्ह्यातील २७ पोलीस ठाण्यांत सावधानतेचा इशारा देऊन सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. या घटनेने पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी मुरुडमध्ये आढळलेले संशयित नेमके कोण होते, याबाबत तपास सुरु आहे. याशिवाय संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील पोलीस ठाण्यांत संपर्क साधला असून, रायगड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात गेले काही दिवस चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल लंपास करण्याची मालिकाच सुरु केली होती. याबाबत अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. तसेच अवैध दारु प्रकरणाकडेही पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. अशा अनेक प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्‍वास डगमगत असतानाच नाकाबंदी केल्यानंतरही रोह्यात चोरीची घटना घडली. यावरुन पोलीस विभागाचा गलथान कारभार स्पष्ट होतो. अशा परिस्थितीत संशयितांबाबत तपास करण्यात रायगड पोलिसांना कितपत यश मिळेल, यएाबाबत शंका व्यक्त होत आहे. याकूब मेमनच्या फाशीनंतर घरी फोनद्वारे टायगर मेमन याने याकूबच्या फाशीचा बदला घेण्याची बातमी प्रसिध्द झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये एकूणच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत मुरुडमध्ये नऊ ते दहा जण संशयित फिरत असल्याच्या चर्चेने वार्‍यासारखा वेग पकडल्याने नागरिकांमध्ये अजूनच भीती निर्माण झाली आहे. पोलिसांना मदत करण्यासाठी जिल्ह्यात शीघ्र कृती दलाच्या जवानांची पथके दाखल झाली आहेत. स्वातंत्र्य दिनी काही तरी घातपात करण्याच्या उद्देशाने हे अतिरेकी घुसले असावेत असा एक अंदाज आहे. हे नऊ अतिरेकी जिल्ह्यातील मुरुड येथे किंवा रोहा तालुक्यातील फणसाड येथे लपले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार, पोलिसांचा तपास चालू आहे. अर्थात हे केवळ अंदाज आहेत. एकही अतिरेकी हाती लागलेला नाही. रायगड जिल्ह्यातील २० बंदरे ही अत्यंत संवेदनाक्षम असल्याचे नेहमीच सांगितले जाते. आता देखील नऊ अतिरेकी भालगाव खाडीतून आल्याची खबर पोलिसांना आहे. येथील फणसाड जंगलात हे अतिरेकी सध्या लपून बसले असून तेथून घातपात करण्यासाठी मुंबईला जाणार असल्याची चर्चा आहे. अर्थात या सर्व खबरा आहेत. मात्र एक वस्तुस्थिती आहे की यापूर्वीचे अनुभव घेऊनही सरकार ने यातून धडा घेतलेला नाही. आजही जिल्ह्यातील बंदरे व जेट्या या असुरक्षित आहेत. येथे रात्रं-दिवस सुरक्षा ठेवण्यासाठी जी गस्त ठेवली गेली पाहिजे त्याचा अभाव आहे. १९९३ साली झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोेटाच्या मालिकेत वापरली गेलेली शस्त्रे व स्फोटके ही रायगड जिल्ह्यातील शेखाडी येथे उतरविण्यात आली होती. शेखाडी मार्गे ही सर्व स्फोटके मुंबईला रवाना करण्यात आली होती. हे सर्व करण्यापूर्वी कुप्रसिध्द तस्कर दाऊद इब्राहीम याने या भागाची प्रत्यक्ष पहाणी केली होती. मात्र त्याचा कुणालाही पत्ता लागला नव्हता. त्यावेळी केवळ शस्त्रे उतरविण्यात आली नाहीत तर संदेरीच्या जंगलात प्रशिक्षण दिले तरी त्याचा कुणाला पत्ता लागला नव्हता. टायगर मेमन हा अलिबागच्या बिग फ्लॅश या हॉटेलात राहून गेला होता. टायगर मेमनचा या भागात असलेला यापूर्वीचा वावर पाहता तसेच त्याला या भागाची संपूर्ण माहिती असल्याने आता जर एखादा घातपात करावयाचा असेल तर तो या भूमिचा वापर करु शकतो. अर्थातच याची कल्पना प्रशासनाला असूनही त्याकडे जाणूवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अर्थात हा केवळ प्रशासकीय ढीलेपणाचा भाग झाला. मात्र या ढीलेपणाने अतिरक्यांचा धोका कितीही प्रमाणात वाढू शकतो. गेल्या आठवड्यात रायगडच्या किनारपट्टीवर ४७ पिंपे आढळली होती. यात ज्वालाग्रही पदार्थ असल्याचा अंदाज होता. परंतु एखाद्या बुडालेल्या बोटीतून आलेली ही पिंपे असू शकतात. मात्र याबाबतचे वास्तव नेमके काय आहे ते उघड झालेले नाही. सध्या जगात दहशतवाद बोकाळला आहे. आपल्याकडेही ९३च्या बॉम्बसोफोटानंतर दहशतवादी घटना घडल्या आहेत. २००८ साली कसाब व त्याच्या नऊ साथीदारांनी समुद्रमार्गे देशात घुसून असेच अतिरेकी थैमान घातले होते. यातील नऊ अतिरेक्यांना त्यावेळी कंठस्नान घालण्यात आले व कसाबला जीवंत पकडण्यात यश आले होते. कसाब पकडला गेल्याने पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया उघड झाल्या होत्या. त्यानंतर कसाबवर रितसर खटला चालवून त्याला फाशी देण्यात आले. त्यानंतर नुकताच मुंबई ब्मस्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनला फाशी दिल्याने अतिरेकी याचा बदला घेणार अशी चर्चा सुरु झाली आहे. परंतु अशा प्रकारच्या बदला घेण्याच्या धमक्या या अतिरेक्यांच्या नेहमीच येत असतात. मात्र या अतिरेक्यांच्या कारवायांना अटकाव कशा करायचा याची योजना सरकारने आखण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेत एकदा व्टीन टॉवर पाडल्यानंतर पुन्हा अतिरेकी कारवाया झालेल्या नाहीत. म्हणजे एकदा झालेल्या अतिरेकी कारवायातून त्यांनी धडा घेतला व आपल्या देशातील नागरिकांची कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. अशा प्रकारची व्यवस्था आपल्याकडे झालेली नाही. गेेल्या दोन दशकात आपल्याकडे अतिरेक्यांच्या किमान डझनभर लहान-मोठ्या कारवाया झाल्या असतील. परंतु त्यातून आपण अजूनही धडा घेतलेला नाही. केवळ रायगडचीच नव्हे तर संपूर्ण कोकण किनारपट्टी ही असुरक्षीत आहे. सध्याच्या घडामोडी हे त्याचे द्योतक आहे. आता तरी ही किनारपट्टी सुरक्षीत राहाण्याच्या दृष्टीने पावले टाकावीत.
----------------------------------------------------------------  



0 Response to "असुरक्षित किनारपट्टी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel