-->
संपादकीय पान सोमवार दि. ०१ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
अत्याधुनिक स्टिल्थ विनाशिका नाविक दलासाठी महत्वाची
-------------------------------------------------
शांततेसाठी प्रथम सामर्थ्यवान असण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीची आयएनएस कोलकाता ही अत्याधुनिक स्टिल्थ विनाशिका राष्ट्राला अर्पण करताना अलीकडेच व्यक्त केली. आयएनएस कोलकाता ही कोलकाता श्रेणीतील पहिली विनाशिका आहे. या स्टिल्थ विनाशिकांच्या बांधणीचा प्रकल्प प्रोजेक्ट-१५ ए नावाने राबविला जात आहे. त्याद्वारे कोलकाता, कोची आणि चेन्नई या विनाशिकांची बांधणी मुंबईच्या माझगाव गोदीत करण्यात येत आहे.
कोलकाता श्रेणीतील युद्धनौका नौदलाच्या पश्चिम विभागात कार्यरत असणार आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने अरबी समुद्रापासून सुएझ कालव्यापर्यंत विस्तारलेले असणार आहे. प्रोजेक्ट-१५ बी द्वारे दाखल होणार्‍या बंगळुरू श्रेणीतील विनाशिका नौदलाच्या पूर्व विभागात कार्यरत असणार आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र दक्षिण चीन सागरापर्यंत विस्तारलेले असेल. त्यातील पहिली विनाशिका २०१८पर्यंत भारतीय नौदलात सामील होईल. हिंदी महासागरातील भारतीय नौदलाचा प्रभाव टिकवून ठेवण्यात आणि चीनच्या या महासागरातील वाढत्या नाविक हालचालींवर लक्ष ठेवण्यात कोलकाता सारख्या विनाशिका महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
सध्या चीनकडे स्टिल्थ विनाशिका नसल्या तरी भविष्यात त्या चिनी नौदलात येण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना, चीनने स्टिल्थ लढाऊ नौका बांधण्यास एव्हाना सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर कोलकाताच्या सामिलीकरणामुळे भारतीय नौदलाचा आत्मविश्वास वाढण्यासही मदतच होणार आहे. व्यापारी, आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने चीनने अलीकडील काळात आफ्रिका आणि पश्चिम आशियातील देशांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आहेत. परंतु त्यासाठी चीनला हिंदी महासागरातून जाणार्‍या जलमार्गांवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागत आहे. दुसरीकडे या मार्गांच्या सुरक्षेसाठी चीनने हिंदी महासागरात अत्यंत धूर्तपणे नौदलाच्या हालचाली वाढविलेल्या आहेत. भारताच्या शेजारील देशांमध्ये तळ विकसित करून हिंदी महासागरातील सर्वांत प्रबळ नौदल असलेल्या भारतीय नौदलाला आव्हान देण्याचा डाव चीनकडून खेळला जात आहे. त्याचबरोबर सोमाली चाचांपासून आपल्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी चीनसह जगातील प्रमुख देशांनी आपल्या युद्धनौका एडनच्या आखातात तैनात केल्या आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे भारतीय नौदलाची चिंताही वाढली आहे. या वर्षी चीनने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तैनात केलेली अणुपाणबुडी दक्षिण हिंदी महासागरात पाठविली होती. जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हिंदी महासागरातील जलवाहतूक सुरळीत चालू राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातच जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, आग्नेय आशिया देशांसाठी या जलमार्गांचे महत्त्व अनन्यसाधारण बनले आहे. त्यामुळे त्या देशांनी भारताशी नाविक सहकार्य वाढविले आहे. परिणामी हिंदी महासागरातील जलवाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालू ठेवण्याची आंतरराष्ट्रीय जबाबदारी भारतीय नौदलावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर, कोलकाता श्रेणीतील विनाशिकांमुळे भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय दरारा वाढविण्यास मदत होणार आहे. एकीकडे, अरबी समुद्रात पाकिस्तानकडून भारताच्या सुरक्षेला कायमच आव्हान देण्याचे प्रयत्न होत आहेत. अलीकडील काळात पाकिस्तानच्या युद्धनौकांचा त्याच्या सागरी सीमेबाहेर वावर वाढला आहे. अशा परिस्थितीत कोलकाताच्या मदतीने पाकिस्तानी नौदलाच्या हालचालींवर नियंत्रण मिळणे शक्य होणार आहे. अत्याधुनिक संपर्क साधनांच्या मदतीने हिंदी महासागर किंवा त्याही पलीकडे संचार करत असताना या विनाशिकेचा उपग्रहाच्या साहाय्याने मुख्यालयाशी संपर्क राखणे शक्य होणार आहे. त्याच वेळी आसपासच्या परिसरात असलेल्या भारताच्या इतर युद्धनौकांशी संदेशांची आणि माहितीची देवाणघेवाण आणि विश्लेषण करण्यासाठी एक माध्यम म्हणून कोलकाताचा उपयोग होणार आहे. या देवाणघेवाणीत शत्रूला शिरकाव करता येऊ नये, याचीही विशेष काळजी घेता येणार आहे. अलीकडील काळात आग्नेय आशिया आणि जपान, दक्षिण कोरिया यांच्याबरोबर भारताचे संबंध बळकट होत आहेत. या क्षेत्रातील देशांशी संबंध विकसित करणे, भारताच्या आर्थिक-सामरिक हितसंबंधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. आज चीन आणि पाकिस्तानच्या नौदलांच्या वाढत्या हालचालींमुळे भारताला वरचेवर आव्हान मिळू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलात आलेली आयएनएस कोलकाता प्रभावी अस्त्र ठरणार आहे. पण येत्या तीन-चार वर्षांमध्ये भारतीय नौदलात सामील होणार्‍या फ्लीट सपोर्ट शीपच्या मदतीने तिचा पल्ला आणि प्रभाव आणखी वाढविणे शक्य होईल.
-------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel