-->
अवयवदानाचे महत्त्व

अवयवदानाचे महत्त्व

संपादकीय पान सोमवार दि. १० ऑगस्ट २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अवयवदानाचे महत्त्व
मुंबईतील दोन आघाडीच्या रुग्णालयात गेल्या आठवड्यात दोन जणांच्या हृदयाचे रोपण करुन एक मोठा चमत्कार घडविला व त्या रुग्णांना जीवदान मिळाले. मुंबईत अशा प्रकारची शस्त्रक्रिया गेल्या ५० वर्षांत प्रथमच झाली. आपल्याकडे अशा प्रकारची शस्त्रक्रिया होऊ शकत होती. परंतु, एखाद्या माणसाचे हृदय काढल्यापासून चार तासांच्या आत दुसर्‍याला बसवावे लागते. जेवढ्या लवकर हे हृदय बसविले जाईल, तेवढ्या प्रमाणात हृदयरोपणाची शस्त्रक्रियाही यशस्वी होते. त्यामुळे मुंबईसारख्या महानगरात लवकरात लवकर हृदय एका जागेवरुन दुसर्‍या जागेवर नेणे, ही एक अवघड बाब होती. कारण, मुंबईतील वाहतूक समस्या पाहता हृदयाची वाहतूक एवढ्या झपाट्याने करणे, ही एक अशक्यप्राय बाबच होती. मात्र, यावर मुंबईतील पोलिसांनी तोडगा काढला व अशा प्रकारे रोपणासाठी नेण्यात येणार्‍या अवयवांची वाहतूक करण्यासाठी एक स्वतंत्र ग्रीन लाईन तयार करण्यात आली. अर्थातच, ही ग्रीन लाईन काही कायमस्वरुपाची नाही, तर ज्यावेळी आवश्यकता लागते, त्यावेळी त्याची गरजेनुसार निर्मिती करण्यात येते. अशा प्रकारची ग्रीन लाईन पोलिसांनी तयार केल्यामुळे आता अनेकांचे अवयव रोपण करणे सहजरित्या शक्य होईल. पोलिसांनी केलेल्या या कामाबद्दल त्यांचे सर्वात प्रथम अभिनंदन करण्याची आवश्यकता आहे. कारण, सध्याच्या व्यवस्थेत राहून कोणतीही नवीन यंत्रणा न उभारताही हे त्यांनी शक्य करुन दाखविले आहे. यानुसार, जेथून अवयव हलविले जाणार आहेत, तेथून ते रुग्णालयापर्यंतचा रस्ता हा पूर्णपणे मोकळा ठेवला जातो. मात्र, त्याच्या बाजूची लाईन सुरु ठेवण्यात येत असल्यामुळे वाहतूकही थोड्याफार प्रमाणात सुरुच राहते. त्यामुळेच मुंबईतील या दोघांचे जीव वाचविण्यात यश आले आहे. गेल्या आठवड्यात वाशी येथील एम.जी.एम. येथील रुग्णालयात एका रुग्णाचे हृदय काढून १९ कि.मी. लांब असलेल्या मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात केवळ १४ मिनिटे व ९ सेकंदात पोहोचविण्यात आले. जर मुंबई व नवी मुंबईच्या पोलिसांनी ग्रीन लाईन तयार केली नसती, तर हे हृदय पोहोचायला किमान दोन तास लागले असते. गेल्या सोमवारी पुण्याहून काढलेले एका रुग्णाचे हृदय विमानतळ ते फोर्टिस रुग्णालय या २० कि.मी. अंतरात केवळ १८ मिनिटांत पोहोचविण्यात आले. पुण्याहून हे विमानाने आणलेले हृदय केवळ दीड तासात रुग्णालयात पोहोचले व त्यामुळे एका माणसाला जीवदान मिळाले. ही दोन्ही उदाहरणे लक्षणीय आहेत; ती यासाठी की, आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, मात्र त्यासाठीची सर्व वाहतूक यंत्रणा नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागत होते. आता यावरही आपण मात केली आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो; तो म्हणजे, अवयव दानाची. आपल्याकडे हृदय, मूत्रपिंड यासारखे अनेक अवयव रुग्णाला हस्तांतरीत करण्याचे तंत्र आपल्या देशातील डॉक्टरांना अवगत आहे. मात्र, अवयवदानाविषयी आपल्याकडे गैरसमज असल्यामुळे याविषयी दान करण्याची प्रक्रिया वेग घेत नाही. त्याचबरोबर अवयवदानाबाबत कायदेशीर त्रुटी आहेत, त्यादेखील दूर करण्याची गरज आहे. अवयवदानाविषयीच्या कायद्याकडे आता आपण नव्याने पाहण्याची आवश्यकता आहे. यासाठी सरकारी पातळीवरुन त्वरेने हालचाली करण्याची गरज आहे. एखद्या माणसाचा ब्रेन डेड झाल्यावर तो माणूस मेल्यातच जमा असतो. अशा वेळी त्याचे अवयव जर कुणाला मिळाले, तर दुसर्‍याला नव्याने जीवन मिळू शकते. परंतु, याबाबत कायदे जसे सुलभ असण्याची आवश्यकता जशी आहे, तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहून केवळ भावनेच्या आहारी न जाता, अवयवदानाचा निर्णय घेण्याची गरज असते. त्यासाठी आपल्याकडे जनजागृती केली जाणे गरजेचे आहे. अपल्याकडे अनेकदा एखादा माणूस आपण निधन पावल्यावर नेत्रदानाचा किंवा देहदानाचा संकल्प सोडतो; परंतु त्यांचे नातेवाईक निधनानंतर गैरसमजुतीपोटी नेत्रदान किंवा देहदान करण्याची टाळाटाळ करतात किंवा त्याच्या या इच्छेची कोणालाही माहिती देत नाहीत. त्यामुळे अनेकदा इतरांचे जीव वाचू शकतात, याचा ते विचार करीत नाहीत. अवयवदानाच्या संदर्भात तामिळनाडू सरकारने पुढाकार घेऊन अनेक क्रांतिकारी कायदे केले आहेत. अशा प्रकारच्या कायद्यांमुळे अवयवदान हे सुलभ होऊ शकते. अवयवदान करणारा व अवयव स्वीकारणारा या दोघांनाही कोणत्याही कटकटी होत नाहीत वा तो कायद्याच्या कचाट्यात सापडत नाही. आपल्याकडे मोठी लोकसंख्या असल्यामुळे आपण मनुष्याच्या आयुष्याच्या मोलाला फारसे किंमत देत नाही, हे एक दुर्दैव आहे. मात्र, विदेशात कोणाच्याही आयुष्याला फार मोल असते. त्याचे महत्त्व तेथील नागरिक व डॉक्टरही बाळगतात. आपल्याकडेही अवयवदानाविषयी जनजागृती करताना ही बाब लक्षात घेतली गेली पाहिजे. आपण वैद्यकीय क्षेत्रात मोलाची झेप घेतली आहे. अनेक देशांतील लोक आपल्याकडे चांगल्या वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी येतात. त्यांना तेथील महागडी वैद्यकीय सेवा परवडत नाही व त्याच्या कमी खर्चात भारतात उपलब्ध होते. यातूनच आपल्याकडे मेडिकल टुरिझम आता वाढला आहे. अवयवदानाविषयी कायद्यातील क्लिष्टता कमी झाल्यावर व लोकांमध्ये जनजागृती झाल्यावर आपण वैद्यकीय सेवेत एक मैलाचा दगड गाठू शकतो. मुंबईत नुकत्याच झालेल्या हृदयरोपण शस्त्रक्रियेने हे दाखवून दिले आहे.
-----------------------------------------------------------------
-

0 Response to "अवयवदानाचे महत्त्व"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel