-->
भाजपाला धोका राहूल गांधींचाच...

भाजपाला धोका राहूल गांधींचाच...

रविवार दि. 22 जुलै 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
भाजपाला धोका राहूल गांधींचाच...
-----------------------------
लोकसभेत झालेल्या अविश्‍वासाच्या ठरावाच्या वेळी कॉग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे झालेले तडाखेबंद भाषण पाहता भविष्यात भाजपाला खरा धोका हा राहूल गांधींपासूनच आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे तर आपले भाषण झाल्यावर राहून गांधी यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या जागेवर जाऊन गळाभेट घेतली व सिक्सरच मारला. राहुल गांधी यांनी भाषण संपल्यावर अनपेक्षितरित्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिठी मारली, तेव्हा स्वतः नरेंद्र मोदी यांना सुद्धा एक क्षण काय झाले समजले नाही पण जेव्हा राहुल गांधी मिठी मारून गेले तेव्हा नरेंद्र मोदींनी स्वतःहून राहुल गांधी यांना पुन्हा बोलवले आणि त्यांच्याशी नंतर हस्तांदोलन केले. याव्दारे राहूल गांधीं यांच्यातील एक कोमलहृदयी राजकारणी आपल्याला पहायला मिळाला. खरे तर मोदींनी या नेत्याकडून हसत खेळत उभे राहून स्वीकार केला पाहिजे होता, परंतु तेवढी खिलाडू वृत्ती मोदींमध्ये नाही. मात्र त्यावेळी मोदींचा चेहरा पार पडला होता. आपल्याला किती बदनाम करा, आपल्याला कितीही वाईट म्हणा, आपल्याला पप्पू म्हणा, परंतु माझ्या मनात तुमच्या विषयी काकणभरही राग नाही. तुमच्यातला चांगला माणूस मी जागा करणार आहे, असे सांगून राहूल गांंधी यांनी सर्वांचीच मने जिंकली. अर्थात त्यांच्या या भाषणात व्यत्यय आणाणार्‍या भाजपा सदस्यांनाही राजूल गांधींच्या मनात निश्‍चितच आदर वाटला असेल, परंतु ते दाखवू शकत नाहीत, हे आपण समजू शकतो. आपल्याला हा आपला देश कसा हवाय? एकमेकांत मारामारी करणारा, रोज सकाळी उठून द्वेष करणारा, जातीवरून - धर्मावरून तुटून पडणारा, ओरबाडणारा, क्रूर, हिंसक, विद्रुप? की प्रेम आणि आदर देणारा, सहमतीने आणि मैत्रीने राहणारा, गुण्यागोविंदाने एकमेकांना साथ देऊन जगणारा, सांभाळून घेणारा? काळ मोठा कठीण आहे. आपल्या सगळ्यांसमोरचाच. असा एकमेकांचा द्वेष करत बसलो तर आपण सर्वच जण होरपळून जाऊ. संसदेत एकमेकांवर आरडाओरड करणारा देश बघून झाल्यावर राहुल उठून मोदींच्या जवळ जातो आणि मिठी मारतो. यातला ड्रामा एक भाग आहे. पण छोटासाच. मोठा भाग आहे तो विचाराचा. मी प्रेम करतो, तुम्ही कितीही द्वेष पसरवा माझ्याबद्दल, हेटाळणी करा, खोटेनाटे सोशल मीडियातून ओता माझ्याविरोधात, पण मी प्रेम करतो. आणि करतच राहीन. विरोध करून झाल्यावरही एकमेकांबद्दल आस्था असणारा माझा देश माझ्या संसदेत मला दिसला पाहिजे. आपल्यासमोर एकीकडे आक्रस्ताळा द्वेष आहे, बीभत्सपणा आहे. दुसरीकडे लोकशाहीवादी प्रेम आहे, आपुलकी आहे, उदारता आहे. आणि निवड आपल्याला करायची आहे, हे राहूल गांधींचे भाषण त्यांची परिपक्वता दाखविणारे आहे. या भाषणाच्या निमित्ताने राहूल गांधी यांच्यातील एक नवा नेता उदयाला आला आहे, सुरुवातीला त्यांची असलेली अपरिपक्व भाषणे हा सर्वांचाच थट्टेचा विषय होती. भाजपा व मोदींसाठी ती एक मते खेचण्यासाठी असलेली एक मोठी पर्वणीच ठरली होती. परंतु एकेकाळी पप्पू म्हणून हिणवलेले राहूल गांधी हेच भविष्यात भाजपासाठी आव्हान ठरणार आहेत, हे आजच्या त्यांच्या भाषणावरुन दिसते. गांधी घराण्याची यासाठीच भाजपाला भीती वाटत आली आहे. घराणेशाही कोणत्या पक्षात नाही, सर्वच पक्षांमध्ये आहे. जनतेने आपल्याकडे घराणेशाही मान्य केली आहे. इंदिरा गांधींना डोक्यावर घेणारी जनता त्यांचा पराभवही करते. त्यामुळे आपली घराणेशाही ही काही राजेशाही नाही. जनतेला कुणीच गृहीत धरुन आपल्याकडे राजकारण करु शकत नाही. मात्र भाजपाने नेहमीच गांधी घराण्याचा धसका घेतल्याने त्यांचा बागुलबुवा उभा केला आहे व घराणेशाहीच्या विरोदात आपण उभे ठाकल्याचे जनतेला भासविले आहे. जर भाजपाला घराणेशाही नको आहे तर त्यांनी त्यांच्या आमदार, खासदारांच्या मुलांना राजकारणात येण्यासाठी प्रतिबंध करावा. परंतु त्यांना फक्त गांधीं घराण्याची घराणेशाहीच डोळ्यात सलते. राहूल गांधींच्या या कृतीमुळे मोदी वरमल्याने भाजपात संतापाची लाट येणे आपण समजू शकतो. मात्र राहूल गांधीचे वडिलांसारखे सौजन्य, पोक्तपणा, राजकारण असले तरी वैक्तीचे नातेसंबंध, ज्येष्ठांबाबत आदर, पंतप्रधानपदाचा सन्मान या बाबी प्रकर्षाने जाणवल्या आहेत. गेल्या काही वर्षात मोदींनी देशातील राजकारण, समाजमन बिघडविले आहे. देशातील प्रत्येक मुस्लिमांकडे लोक संशयाने बघू लागले आहेत. यातून भाजपाने आपली व्होट बँक तयार केली. रिझर्व्ह बँक, नियोजन आयोग, अलिप्त राष्ट्र चळवळ या संस्था नामशेष करुन आपली स्वातंत्र्यानंतरतची कमाई संपविली आहे. नोटाबंदीमुळे देशाने शंभरहून जास्त लोकांचे प्राण गेले. बरे त्यातून निष्पन्न काहीच निघाले नाही, उलट हजारो लोकांचे रोजगार बुडाले. देशातून बाहेर जाणार्‍या काळ्या पैशाचा ओघ काही थांबला नाही, उलट तो गेल्या वर्षात वाढला. महिलांवरील अत्याचाराची मालिकाच सुरु झाली. त्याहून सर्वात वाईट बाब म्हणजे, सरकारचा खोटेपणा उघड झाला. प्रत्येकाच्या खात्यत पंधरा लाख रुपये काही जमा झाले नाहीत, काळ्या पैशाचा ओघ काही कमी झाला नाही. महागाई सातत्याने वाढत गेली. दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याची घोषणा हवेत विरली आहे. या सर्व बाबींचा पाढा या अविश्‍वासाच्या ठरावामुळे राहूल गांधींना वाचून दाखविता आला. त्यांनी ज्या प्रभावाने भाषण केले ते पाहता, त्यांच्या रुपाने देशातील एका नवीन नेतृत्वाचा उदय झाला आहे. अर्थात भाजपाला हे मान्य होणार नाही, पण हे वास्तव पुढील कालात स्पष्ट होईल.
--------------------------------------------------------------   

0 Response to "भाजपाला धोका राहूल गांधींचाच..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel