-->
कोकणासाठी खुशखबर

कोकणासाठी खुशखबर

शनिवार दि. 21 जुलै 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
कोकणासाठी खुशखबर
ज्या कोकणात सर्वाधिक मत्य उत्पादन होतो तेथे मत्सविज्ञान विद्यापीठ नाही तर तेथून एक हजार किलोमीटरवरील नागपुरातील पशूविज्ञान विद्यापीठास ते जोडलेले होते, असे विचित्र परंतु राजकीयदृष्टया सत्ताधार्‍यांना सोयिस्कर असा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. यातून सरळसरळ कोकणावर अन्यायच होत होता. कोकणातील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी याविरोधात आजाव उठविला होता. परंतु काहीच झाले नव्हते. शेवटी सरकारने कोकणात स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्‍वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभेत दिले. कोकणातील जनतेसाठी ही एक मोठी खुशखबर ठरली आहे.  रत्नागिरीमध्ये मत्स्यविद्यापीठ झाल्याने केवळ रत्नागिरीतीलच नव्हे तर मुंबईपासून कोकणातील विद्यार्थ्यांना मत्स्यप्रक्रिया उद्योगांसह समुद्र विज्ञान विषयांचे विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली उपलब्ध होतील. यातून मत्स्योत्पादन वाढीस लागून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. सरकारने उशिरा का होईना हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. खरे तर नागपूरच्या पशुविज्ञान केंद्राला मत्सविज्ञान जोडण्याची काहीच गरज नव्हती. पशु व मत्य यांचा सुताराम संबंध नाही, परंतु केवळ नागपूरातील व विदर्भातील लोकांना खूष करण्यासाठी हा निरणय घेतला गेला होता. सरकारने आपली ही चूक सुधारल्याबद्दल त्यांचेअभिनंदन. कारण एकूण मत्स्य उत्पादनापैकी 72 टक्के म्हणजेच 4.4 लाख मे.टन उत्पादन 720 कि. मी. लांबीच्या कोकण किनारपट्टीवर होते. राज्यात गोड्या पाण्याच्या क्षेत्रात 1.25 लक्ष टन, तर कोकण किनारपट्टीवर 4.4 लाख टन मत्स्योप्त्पादन होते हे आपण प्रकर्षाने लक्षात घेतले पाहिजे. तीन-चार वर्षांपूर्वी केरळ व तामीळनाडूमध्ये स्वतंत्ररित्या मत्स्यविद्यापीठे सुरु झाली आहेत. अशा प्रकारच्या विद्यापीठाच्या निर्मितीनंतर या राज्यानी अनेक फायदे अनुभवले. परंतु आपल्याकडे हे विद्यापीठ राजकारणाच्या जाळ्यात फसले होते. आठ वर्षांपूर्वी नागपूरमधील पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाकडे पुरेसा निधी व कर्मचारी नसल्याने महाराष्ट्र विधीमंडळात या प्रश्‍नावर चर्चा उपस्थित झाली होती. महाराष्ट्र सरकार तर्फे डॉ. मुणगेकर समिती नेमण्यात आली व समिती निर्णय देईल त्या ठिकाणी वर्षभरात कोकणात मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले. परंतु त्या मुणगेकर समितीचा अहवाल धूळ खात पडला. असा प्रकारच्या समित्या नेमणे हे केवळ वेळकाढू धोरण असते, याबाबतीतही असेच झाले. कोकणातील नद्या, खाडया, समुद्र व 70 खाडयांच्या भोवती असलेले क्षेत्र मत्स्यशेतीला उपलब्ध असल्याने कोकणातील विद्यार्थ्यांना फिशरीज इंजिनिअरींगचे पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. या संबंधीचे प्राथमिक स्तरावरील तांत्रिक शिक्षण केंद्र सरकारच्या समुद्र उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणामार्फत पनवेल येथे दिले जाते. वस्तुतः फिशरीज इंजिनिअरींगचे सर्व प्रकारचे पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षण कोकणात उपलब्ध झाले पाहिजे. विशेषकरुन मत्स्य व्यवस्थापन, मत्स्य पर्यावरण, मत्स्य काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, मत्स्यसंवर्धन, मत्स्य जलशास्त्र, मत्स्यसंपत्ती व्यवस्थापन, निर्यातीचे व्यवस्थापन आणि एकूणच मत्स्य शिक्षण विस्तार आदि अभ्यासक्रमांचा अंतर्भाव झाला पाहिजे. यातून मत्स्य विज्ञानाची एक शैक्षणिक संस्कृती कोकणात उदयाला येईल, अशा अपेक्षा व्यक्त करता येऊ शकेल. सध्या आपण अतिशय पांरपारिक पद्दतीने किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मासेमारी केली तरी त्यात सास्त्रशुद्दता नाही, याचा परिणाम एकऊमच या व्यवसायावर होतो. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय व्यवसाय केल्यामुळे लहान व मध्यम आकारातील मच्छिमारांना याचा फटका बसतो. या विद्यापीठामुळे ही कमतरता भरुन काढता येईल. मत्स्योत्पादनात भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो, तर महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक लागतो. निमखाच्या 14485 हेक्टर खाजणक्षेत्राचा महाराष्ट्रात 5 टक्के देखील वापर होत नाही. याउलट गुजरातमध्ये खाजणक्षेत्राचा 50 टक्क्यांहून अधिक वापर होत आहे. खार्‍या पाण्यातील मच्छिमारीची उत्पादनक्षमता यानंतर वाढण्याची बिलकुल शक्यता नाही. 2 लाख 27 हजार शेततळी मत्स्यशेतीकरिता वापरली पाहिजेत. सध्या आपण 4300 कोटी रुपये एवढे मत्स्योत्पादन निर्यात करतो हे लक्षात घेतले तर कोकण किनारपट्टीवर मत्स्य विद्यापीठ होणे हे किती गरजेचे आहे, ते अधोरेखित होते. भात व मत्स्यशेती विद्यापीठातच नव्हे तर आशिया खंडात यशाचे सूत्र म्हणून मान्यता पावले आहे. मत्स्य जीवशास्त्र मत्स्यप्रक्रिया तंत्रज्ञान व मत्स्य इंजिनिअरींग या सर्व बाजू शेती विज्ञानाला संलग्न आहेत. भारतीय कृषीक्षेत्रामध्ये पिके, वृक्ष, कीटक या जीव घटकांचा समन्वय आहे. तसेच भारतीय शेतकरी मिश्रशेती व्यावसायिक आहे. त्यामधून विशिष्ट विषय वेगळे करणे चुकीचे आहे. कोकण कृषी विद्यापीठाने कृषी फलोत्पादन, वन, कुरण विकास व मत्स्य विज्ञान विकास, प्रादेशिक स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण, परंतु एकात्मिक पध्दतीचा अवलंब केला आहे. डॉ. एम. एस. स्वामीनाथन समितीने याच संकल्पनेवर आधारीत कृषी पदवीचा पुरस्कार केला आहे. मत्स्यव्यवसायातील नवीन-नवीन अभ्यासक्रम व त्यातील तंत्र-मंत्र उपलब्ध होऊन मत्स्योत्पादन वाढून रोजगाराच्या संधी निश्‍चितपणे वाढण्याकरिता मत्स्यविद्यापीठाची गरज आहे. मत्स्यविद्यापीठाच्या निमित्ताने कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र आले ही गोष्ट आशादायी आहे. आता शासनाने मत्स्यविद्यापीठाकरिता भरीव आर्थिक तरतूद करुन विनाविलंब मत्स्यविद्यापीठ मार्गी लावावे. पुढील आर्थिक वर्षापासून हे विद्यापीठ जरी मार्गी लागले तरी त्याचा फायदा येत्या दोन-चार वर्षात दिसू शकेल.
--------------------------------------------------------

0 Response to "कोकणासाठी खुशखबर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel