-->
मोदी सरकारची कसोटी / राज्य पावसाने सुखावले

मोदी सरकारची कसोटी / राज्य पावसाने सुखावले

शुक्रवार दि. 20 जुलै 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मोदी सरकारची कसोटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत परीक्षा होणार आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सरकारविरोधात अविश्‍वास प्रस्ताव स्वीकारला आहे. देशातील लोकांच्या समस्या सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याने लोकसभेत तेलगु देसम पक्षानेे मोदी सरकारविरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडला होता, याला काँग्रेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अविश्‍वास प्रस्तावाची नोटीस स्वीकारल्याने आता मोदी सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत परीक्षा होणार आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या या अधिवेशन काळात तिहेरी तलाक, मागासवर्गीय आयोग, महिला आरक्षण आदींसारख्या अनेक महत्त्वाच्या विधयकांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. तीन आठवडे चालणार्‍या या अधिवेशनात 68 आणि राज्यसभेत 40 विधेयक प्रलंबित आहेत. काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकार जनतेचे प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरले असल्याची टिका केली होती. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी त्यांची चर्चा झाल्यावर दिल्लीत काही तरी शिजत असल्याचे राजकीय वातावरण होते. आता अविश्‍वास ठरावामुळे पावसाळी अधिवेशनही वादळी होणार याबाबत काही शंका नाही. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला.  सरकारसमोर अनेक महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर करुन घेण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे संसदेत सरकारला चहुबाजूंनी घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी रणनीती आखली आहे. गेल्या चार वर्षांत मोदी सरकारला पहिल्यांदाच संसदेत अविश्‍वास प्रस्तावाच्या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी देखील असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, मात्र तो स्वीकारण्यात आला नव्हता. कारण पंतप्रधान मोदी यांना असा प्रस्ताव नकोच होता. सरकार यात पास होईल यात काही शंका नाही. सरकारकडे तसे पुरेसे संख्याबळ आहे, परंतु या ठरावाच्या चर्चेच्या निमित्ताने विरोधक जे सरकारचे वाभाडे काढतात ते मोदींना नको होते. परंतु यावेळी त्यांचा नाईलाज झालेला दिसतो. तेलगू देसम पक्षानेही शेतकरी व अन्य पातळ्यांवरही सरकार अपयशी ठरत असल्याची टीका केली. लोकसभेत गेल्या 15 वर्षांत पहिल्यांदाच सत्ताधार्‍यांविरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तेलगू देसमच्या अविश्‍वास प्रस्तावाला विरोधी पक्षांमधील 50 खासदारांनी पाठिंबा दिला आहे. आता अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा कधी होणार, याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष घेतील. भाजपासाठी अविश्‍वास प्रस्ताव चिंतेचा विषय नसेलही. पक्षाकडे बहुमत असून एनडीएतील मित्रपक्षांचीही त्यांना साथ मिळू शकेल. परंतु यामुळे सरकारचे लक्ष विचलीत होते व विरोधकांना वाजवीपेक्षा जास्त प्रसिध्दी मिळते ते मोदी सरकारला नको असते. यानिमित्ताने लोकसभेत सरकारचे वाभाडे काढावयाची संधी विरोधकांना उपलब्ध झाली आहे. सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली जाणार आहे, त्यादृष्टीने विरोधकांनी आपली व्यहरचना आखण्यास सुरुवात केलीच आहे. परंतु यातून कसेे सुटायचे याचीही आखणी मोदी सरकारने केली असणार यात काही शंका नाही. परंतु सरकारसाठी हा कसोटीचा काळ ठरावा.
राज्य पावसाने सुखावले
राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आता संपूर्ण राज्य सुखावले आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून, धरणेही ओसंडून वाहत आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, नगर, नाशिकमधील धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातार्‍यातील कोयना धरणातून यंदा प्रथमच पाणी सोडण्यात आले असून, पुणे जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे उजनी धरणाची पाणीपातळी अचल साठ्यातून उपयुक्त पातळीत आली आहे, तर गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात अतिवृष्टी झाली असून, मराठवाड्यातही जोरदार पाऊस पडला. सांगलीतील चांडोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने ऐतवडे खुर्द येथील सांगली- कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने पिके पाण्यात गेली. सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. महाबळेश्‍वर, पाटण, जावळी, सातारा, कर्‍हाड तालुक्यांत पिके पाण्याखाली गेल्याने ती कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यात पश्‍चिमेकडील तालुक्यात दमदार पाऊस सुरू असून, धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर पूर्वेकडील दुष्काळी तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याने खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. नगर जिल्ह्यातील पश्‍चिम भागात पावसाचा जोर असल्याने भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणांत पाण्याची आवक होत आहे. नाशिक जिल्ह्यात नद्या- नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गंगापूर, दारणा, चणकापूर, पुनंद या चार धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी, दारणा, कादवा, आरम, गिरणा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने नदीच्या काठी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. धुळे व जळगाव जिल्ह्यांत संततधार पाऊस सुरू आहे. नंदुरबारमध्ये तुलनेने पावसाचा जोर कमी आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, बार्शीटाकळी या तालुक्यांमध्ये सातत्याने पाऊस पडत आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. काही भागात जादा पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसानही झाले आहे. मुंबईला पुरवठा करणारी धरणे देखील ओसंडून वाहू लागल्याने राज्यातील या महानगराचा पाणीप्रश्‍न सुटला आहे.
------------------------------------------------------

0 Response to "मोदी सरकारची कसोटी / राज्य पावसाने सुखावले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel