-->
फ्लिपकार्ट-वॉलमार्टची  सोयरिक

फ्लिपकार्ट-वॉलमार्टची सोयरिक

मंगळवार दि. 15 मे 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
फ्लिपकार्ट-वॉलमार्टची
सोयरिक
फ्लिपकार्ट या भारतीय ई-कॉमर्स कंपनीवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिकी वॉलमार्ट रिटेल कंपनीने तब्बल 16 अब्ज डॉलर मोजले आहेत. अशा प्रकारचे हे जगातले दुसर्‍या क्रमांकाचे डील ठरले आहे. बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल या तरुणांनी तिशीतल्या दोघा तरुणांनी फ्लिपकार्ट ही कंपनी केवळ 80 हजार रुपयांच्या भागभांडवलावर सुरु केली होती. त्यावेळी ऑनलाईनच्या क्षेत्रात फारसे कुणी आपले पाय रोऊ इच्छित नव्हते. त्यावेळी या दोघा तरुणांनी भविष्याचा वेध घेत या क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांना सुरुवातीपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु हळूहळू ऑनलाईन खरेदी लोकप्रिय होऊ लागली व प्लिपकार्टचा विस्तार होत गेला. आपल्याकडे सुरुवातीच्या काळात कोणतीही ऑनलाईन कंपनी यशस्वी होणार नाही असे भविष्य वर्तविण्यात आले होते, कारण आपल्याकडे महिलांना दुकानात जाऊन खरेदी करण्याची हौस असते. मात्र महिलांची ही सवय मोडण्यास फ्लिपकार्टने विविध सवलती देऊन हातभार लावला. त्यावेळी या कंपनीला यातून मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार असा अनेकांचा होरा होता. मात्र या तरुणांनी हे सर्व अंदाज खोटे ठरविले व आपली कंपनी अवघ्या 13 वर्षात तब्बल 16 अब्ज डॉलरला विकली. आज देशांच्या कानाकोपर्‍यात फ्लिपकार्ट पोहोचली आहे. येथे सर्व वस्तू ऑनलाईन उपलब्ध आहेत व हीच त्यांची मोठी जमेची बाजू ठरली आहे. कर्तृत्वाची जागतिक मोहोर उमटवणारे हे दोघे भारतीय, याची ग्वाही देणारा म्हणून या व्यवहाराकडे पहावे लागेल. बुद्धिमत्ता, काळाचा वेध घेण्याची क्षमता आणि उद्यमशीलतेच्या जबरदस्त बळावर बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल या तरुणांनी मिळवलेले यश डोळे दिपवणारे आहे. एका भारतीय कंपनीला दुसर्‍या एका बहुराष्ट्रीय कंपनीने गिळले असे म्हणणे चुकीचे ठरेल. सध्या आपल्या देशातील बहुराष्ट्रीय कंपन्याही विदेशातील कंपन्या ताब्यात घेत आहेत. त्यामुळे हा केवळ व्यवहार आहे. दोन कंपन्यांची ही सोय्रिक भारतीय जनतेच्या कशी फायद्याची ठरणार आहे ते पहावे लागेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय मध्यमवर्गीय, नवश्रीमंतांचा वाढता टक्का गेल्या दशकभरापासून खेचून घेतो आहे. या मध्यमवर्गीयांच्या सुमारे 35 कोटी लोकसंख्येची ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी जगातील अनेक कंपन्या उत्सुक आहेत कारण ही लोकसंख्या अमेरिकेच्या लोकंसख्येच्या बरोबरीने आहे. मात्र यात सर्वतच कंपन्या यशस्वी होतातच असे नाही. व्होडाफोन या कंपनीने अशाच प्रकारे भारतीय बाजारात प्रवेश केला होता. परंतु रिलायन्सच्या जीओने एवढे मार्केट काबीज केले की, व्होडाफोनने आपला सर्व व्यवसाय आयडियाला विकून भारतातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ भारतात येणारी प्रत्येक बहुराष्ट्रीय कंपनी यशस्वी होतेच असे नाही. वॉलमार्ट देखील आता फ्लिपकार्टच्या माध्यमातून भारतात वॉलमार्ट प्रवेश करीत आहे. वॉलमार्टला जगात अनेक ठिकाणी बाजारपेठेत फटका बसला आहे. त्यांना जर्मनीतून आपला गाशा गुंडाळून पळावे लागले होते. मात्र अमेरिकेत ही कंपनी जोरात आहे. काळाच्या ओघात विदेशी असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या झंझावातापुढे फ्लिपकार्ट दुबळी पडू लागली होती. तेव्हा स्वदेशी फ्लिपकार्टला धोरणात्मक मदत करण्याची तत्परता मोदी सरकारने दाखविली नाही. त्याचबरोबर स्नॅपडील आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन कंपन्यांना एकत्र आणण्याची किमया उद्योजकांना जमली नाही. चीनमधली अलिबाबा ही ई-कॉमर्स कंपनी चिनी सरकारच्या ठाम हस्तक्षेपामुळे आज जगात क्रमांक एकवर पोहोचली. भारताने मात्र फ्लिपकार्ट ही पूर्ण स्वदेशी ई-कॉमर्स कंपनी बहुराष्ट्रीय करण्याची संधी गमावली. आज अलिबाबाला चीनी सरकार मुक्त हस्ताने मदत करताना आपण पहातो, मात्र आपले सरकार फ्लिपकार्टच्या बाबतीत तटस्थ राहते. त्यामुळे त्यांना वॉलमार्टशी सोयरिक करुन आपला तोटा कमी करण्याचा पर्याय स्वीकारावा लागला. एकेकाळी वॉलमार्टच्या प्रवेशाला अटकाव करण्यासाठी रिटेलमधील विदेशी भांडवलाला विरोध करणार्‍या भाजपाच्या राज्यातच वॉलमार्टने आपले पंख पसरवावे हा एक निव्वळ योगायोग नाही, तर भाजपाला नियतीने शिकविलेला हा धडा आहे. वॉलमार्टची भीती मुख्यतः रिटेल क्षेत्राला वाटते. अवाढव्य वॉलमार्टपुढे अस्तित्व गमावण्याची छोट्या, मध्यम व्यावसायिकांची भीती आहे. असंघटित बाजार-व्यवसायाला कालांतराने का होईना धक्के बसणार आहेत. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल यांच्या ऑनलाइन व्यापार उड्डाणांची झळ मोठ्या शहरातल्या दुकानांना बसू लागली आहे. वॉलमार्टच्या आता फ्लिपकार्टच्या माध्यमातून प्रवेश झाल्याने आता देशाच्या रिटेल उद्योगाच्या बाजारपेठेचे चित्र नजिकच्या काळात बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः शेती आणि शेतीसंलग्न व्यवसायांसाठी ई-कॉमर्स कंपन्या प्रगतीची नांदी ठरू शकतात. यातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. प्रतवारी, प्रक्रिया उद्योग, पुरवठादार, पॅकिंग, वाहतूक आदींतून रोजगार तयार होतील. सेवा आणि उत्पादन क्षेत्राला गती मिळेल. वॉलमार्टच्या इतर देशांमधल्या दालनांमध्ये भारतीय उत्पादनांची निर्यात अधिक सहजतेने होऊ लागेल. इंटरनेट व मोबाइल वाढीची गती पाहता पुढच्या दशकभरात ई-कॉमर्सचा पसारा ग्रामीण स्तरापर्यंत पोहोचलेला असेल. बाजारपेठेचा थेट सहभाग आणि आर्थिक गुंतवणूक त्यासाठी लागते. ई-कॉमर्स कंपन्या शेतीतली गुंतवणूक वाढवण्यास मदत करतील. ई-कॉमर्स हे व्यापाराचे भविष्य आहे. त्यातून अनेक लहान-मध्यम आकारातील व्यापार्‍यांना फटका बसणार हे उघड आहे. मात्र आपण ही प्रक्रिया रोखू शकत नाही, हे देखील जागतिक वास्तव आहे. परंतु या रिटेल व्यवसायाच्या एकाधिकारशाहीतून ग्राहक-शेतकर्‍यांची लूट होऊ नये, याची खबरदारी सरकारला घ्यावी लागेल.
----------------------------------------------------------------------

0 Response to "फ्लिपकार्ट-वॉलमार्टची सोयरिक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel