-->
पुन्हा कमळच!

पुन्हा कमळच!

बुधवार दि. 16 मे 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पुन्हा कमळच!
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार पुनरागमन झाले आहे. कॉग्रेस कर्नाटकातील आपली सत्ता राखेल असा अंदाज होता, पूर्ण बहुमत आले नाही तरी किमान तेथे कॉग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल असा होरा होता. परंतु हे सर्व अंदाज खोटे ठरवित भाजपाने बहुमत मिळविले आहे. कर्नाटकात भाजपने 2008 मध्ये स्वबळावर सत्ता येदुयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली संपादन केली होती. नंतर खाण घाटाळ्यांचे आरोप झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. यामुळे नाराज होऊन येदियुरप्पा यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपात पुन्हा प्रवेश केला होता. येदियुरप्पा यांनी पक्षाची साथ सोडल्याने 2013 मध्ये भाजप सत्तेवरुन पायउतार झाली होती. यावेळी भाजपने कोणताही धोका पत्करायचा नाही असे ठरवून येदियुरप्पा यांच्यासह भ्रष्टाचाराचा आरोप असेल्या रेड्डी बंधुंनाही सोबत घेतले. येदियुरप्पा यांना फक्त सोबत घेतले नाही तर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार केले. यामुळे यंदा भाजपच्या मतांची विभागणी टळली आणि एकगठ्ठा मते भाजपला मिळाली. तर मावळते मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी निवडणूक तारखा घोषित होण्याच्या तोंडावर राज्यात लिंगायत कार्ड खेळले होते. लिंगायत समाजाला त्यांनी धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर केला आणि केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवला होता. सिद्धारमैया यांनी खेळलेले लिंगायत कार्ड त्यांच्यावर बुमरँग झाले, हे आता निकाल पाहता स्पष्ट दिसत आहे. लिंगायतांची राज्यात 17% लोकसंख्या आहे, सुमारे शंभरच्यावर मतदारसंघात त्यांचे प्रभूत्व आहे. त्यामुळे हा समाज काँग्रेसवर नाराज झाला होता. अल्पसंख्याक दर्जामुळे वोक्कालिंगा समाज आणि लिंगायतांमधील दुसरा समाज वीरशैव हेही नाराज होते. कॉग्रेस अशी खेळी करुन हिंदूंमध्ये फूट पाडत आहे हा भाजपाचा प्रचार यशस्वी ठरला आहे. कर्नाटकची ही निवडणूक काँग्रेस व भाजपा या दोघांसाठीही प्रतिष्ठेची होती. याचे महत्वाचे कारण म्हणजे ही निवडणूक आता हरल्यामुळे कॉग्रसेच्या हातून एक राज्य आता गेले आहे. आता त्यांच्या हातात केवळ तीनच राज्ये राहिली आहेत. तर भाजपाच्या हातात दक्षिणेतील महत्वाचे राज्य आले आहे. भाजपासाठी हा एक मोटा विजय म्हटला पाहिजे व कॉग्रेसच्या निराशेत भर घालणारा हा निकाल आहे. राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून झालेली ही पहिली निवडणूक होती. त्यात अपयश लाभल्यामुळे कॉग्रेसला आता भविष्यात विजयश्री खेचण्यासाठी नवे आखाडे बांधावे लागणार आहेत. मोदी व शहा या जोडीच्या डावपेचापुढे अजूनही कॉग्रेस प्रभावहीन होत चालली आहे. केंद्रात भाजपा सत्तेत येऊन चार वर्षे लोटली असताना नरेंद्र मोदी हे चलन अजूनही निवडणुकीच्या रिंगणात यशस्वी ठरत आहे, असाच या निकालाचा अर्थ आहे. नरेंद्र मोदी यांनी यावेळी कर्नाटकात प्रचार करताना इतिहासाची बरीच तोडमोड केली. तरुण पिढीला इतिहासाची कल्पना नसल्याने त्यांना मोदी जे काही बोलतात ते खरेच वाटते. आजही मोदींच्या फसव्या पण प्रभावी भाषणामुळे त्यांच्यावर मोहीत होऊन मतदान करणारे लोक आहेत. आजवर गेल्या चार वर्षात मोदींनी दिलेली आश्‍वासने किती पाळली, ते विचारायचे लोकांना अजून तरी सुचत नाही किंवा मोदींच्या प्रभावी भाषणशैलीपुढे अनेक मुद्दे गौण ठरत आहेत. त्यामुळे भाजपा उसळी मारते आहे असे वाटते. कॉग्रेसच्या कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नव्हता. ते एक चांगले प्रभावी प्रशासक म्हणूनही ओळखले गेले होते. त्यांनी अलिकडच्या काळातील शेतकर्‍यांना पहिली कर्जमाफी दिली होती. अनेक चांगल्या योजनाही जनतेसाठी राबविल्या होत्या, असे असूनही लोकांनी पुन्हा कॉग्रेसला सत्तेचा कौल दिलेला नाही. असे बोलले जाते की शेवटच्या तीन दिवसात जी देवाणघेवाण होते त्याला हल्ली विशेष महत्व मतदार देऊ लागला आहे. अर्थात हे दरवेळीच फायदेशीर असेल नाही. कर्नाटकच्या जनतेला बदल हवा होता हे सत्य आहे. कदाचित सत्तेवर असलेल्यांबद्दल जनतेची निराशाच असते. कॉग्रेसला हा घटक तापदायक ठरल असावा. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, कर्नाटकातील मुस्लिमबहुल असलेल्या 33 मतदारसंघापैकी 17 मतदारसंघात भाजपाने विजय नोंदविला आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार कॉग्रेसच्या बाजुने उभा राहिलेला नाही. कर्नाटकच्या मागच्या तीन विधानसभा निवडणुकांचे विश्‍लेषण सांगते की, राज्यातील लिंगायत आणि एस.सी.-एस.टी. मतांचा परिणाम असणार्‍या ज्या जागांवर जो पक्ष तग धरतो, त्यांचीच राज्यात सत्ता येते. प्रदेशात 70 जागांवर लिंगायत आणि 80 जागांवर एस.सी.-एस.टी. मतदारांचा प्रभाव आहे. यावेळीही या तिन्ही समुदायाची मते ज्या पक्षाला जातील, त्याच पक्षाचे सरकार येण्याची शक्यता सर्वात जास्त असेल. 2013 मध्ये काँग्रेसने जेव्हा सत्तेत पुनरागमन केले तेव्हा त्यांनी लिंगायतांचा परिणाम असणार्‍या 70 पैकी 47 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, एस.सी.-एस.टीं.चा प्रभाव असणार्‍या 80 पैकी 52 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. या प्रकारे काँग्रेसने लिंगायत आणि एस.सी.-एस.टी.चा प्रभाव असणार्‍या 99 जागा जिंकल्या होत्या. राज्यात सरकार स्थापनेसाठी कमीत कमी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसने 2013 मध्ये एकूण 122 जागा जिंकल्या, ज्यात 81 टक्के जागा त्यांना लिंगायत-एस.सी.-एस.टी. मतदारांच्या बळावर मिळाल्या होत्या. कॉग्रेसची आपली सर्व भिस्त सिद्दरामय्या यांच्यावर होती. परंतु त्यांचा हा घोडा त्यांना काही विजयश्री खेचू देऊ शकलेला नाही. मराठी बांधवांच्या सीमेवरील भागातही यावेळी मराठी एकीकरण समितीचा प्रभाव कमी झालेला दिसला आहे. एकूणच हा निकाल कॉग्रेससाठी अभ्यासाचा व भाजपासाठी डोक्यात हवा जाऊ न देणारा ठरावा.
------------------------------------------------------------------

0 Response to "पुन्हा कमळच!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel