-->
गिरणी कामगारांना न्याय  मिळणार तरी कधी?

गिरणी कामगारांना न्याय मिळणार तरी कधी?

मंगळवार दि. 18 जुलै 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
गिरणी कामगारांना न्याय 
मिळणार तरी कधी?
मुंबईतील देशोधडीला लागलेल्या व ऐकेकाळच्या लढाऊ गिरणी कामगारांना सरकार कधी न्याय देणार आहे? गिरणी संपानंतर हा कामगार संपला व त्यांच्याबरोबरीने कामगार चळवळही हळूहळू संपत गेली. आता सरकार बदलल्यामुळे गिरणी कामगारांना आपल्याला न्याय मिलेल अशी एक नवी आशा निर्माण झाली होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जागांवर उभ्या राहाणार्‍या इमारतीत किंवा म्हाडाच्या जमिनीवरील इमारतीत फ्लॅट देण्याचे मान्यही केले होते. परंतु अजून त्यादृष्टीने काही ठोस पावले पडत नसल्याने हा कामगार पुन्हा एकदा संघर्षाचे अस्त्र घेऊन ठामपणे उभा राहिला आहे. येत्या 1 ऑगस्टला गिरणगावातील लोकमान्य् टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करुन गिरणी कामगार आपली ही अस्तित्वाची लढाई सुरु करेल. गिरणी कामगार हा प्रामुख्याने कोककण व पश्‍चिम महाराष्ट्रातून काबाडकष्ट करण्यासाठी मुंबईत आलेला होता. गिरण्यांचे भोंगे वाजायला बंद झाल्यावर तो गावाकडे परतला. मात्र आपल्या युनियनशी व आपल्या नेत्यांशी तो संपर्कात राहिला. आता त्यांना या महामोर्च्याला उपस्थित राहाता यावे यासाठी संपूर्ण कोकणात बैठका सुरु झाल्या आहेत. लोकमान्य टिळक यांनी गिरणी कामगारांना संघटीत केले होते. अशा या आपल्या आद्य नेत्याला स्मरुन गिरणी कामगार पुन्हा एकदा संघर्षात उतरत आहे. ब्रिटीशांनी आपल्या देशातून कापूस आयात करुन त्याची वस्त्रनिर्मीती करण्यासाठी येथील खासगी उद्योजकांना हाताशी घेऊऩ गिरणी सुरु केल्या. आपल्या देशातील हा पहिला मोठा उद्योग. या गिरण्यांच्या चिमण्या धूर ओकू लागल्या आणि आपल्याकडे औद्योगिकीकरणाची पहाट झाली. या औद्योगिकीकरणाबरोबरीने आपल्याकडे कामगार जन्माला आला. त्याकाळी मुंबई ही सात बेटे होती. गिरण्यांमुळे मुंबईचे चित्र पालटण्यास सुरुवात झाली. या गिरण्या सोन्याचा धूर ओकू लागल्या असे त्यावेळी संबोधिले जाई. येथे जन्माला आलेल्या कामगाराने आपल्या कष्टाच्या जोरावर देशात प्रगतीची पताका रोवली. मात्र स्वत:च्या हक्कसाठी त्याला नेहमीच संघर्ष करावा लागला. अगदी कामांच्या तासापासून ते पगारवाढीपर्यंत त्याला लढावे लागले. येथे काम करण्यासाठी कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातून कामगार आले. त्यांना रोजगार पाहिजे होता, कारण गावाकडे राहून त्यांना रोजगार मिळत नव्हता व शेतीवर कुटुंब पोसणे कठीण होते. अशावेळी कामगारांचे स्थलांतर हे मुंबईला होऊ लागले. मुंबई गजबजू लागली. या कामगारांच्या कष्टातून मुंबईला एक वैभव प्राप्त होऊ लागले. गिरणी मालकांनी यातून नफा खेचण्याचे काम केले. कामगार मात्र कष्ट करीतच राहिला. त्याने तुटपुंज्या पगारात कोणतीही तक्रार न करता काम केले. यातून युनियन्स स्थापन झाल्या. पक्षागणिक युनियन्सचे झेंडे गिरणगावाता फडकू लागले. लोकमान्य टिळकांच्या अस्तानंतर त्यांना कम्युनिस्टांच्या नेतृत्वखाली कॉ. डांगेचे नेतृत्व त्यांना लाभले. कॉ. डांगेंनी हाक दिली की गिरण्यांचे भोंगे वाजणे थांबत आणि हा कामगार संघर्षासाठी रस्त्यावर येई. त्याच काळात कॉग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील युनियनला मान्यता मिळाली, मात्र त्यांचे नेते हे कॉ. डांगेच होते. कॉ. डांगेंच्या नंतरही गिरणी कामगारांवर कम्युनिस्ट विचारांचा व त्यांच्या नेत्यांचा जबरदस्त पगडा होता. त्यामुळेच हा कामगार राजकीयदृष्ट्या परिपक्व आहे असे म्हटले जाई. कालांतराने या धंद्यातून कमविलेला पैसा हा अन्य उद्योगात गुंतविण्यास मालकांनी प्रारंभ केला. मुंबई व त्याच्या परिसराचे औद्योगिकीकरण 70च्या दशकात झपाट्याने झाले होते. गिरणी मालकांनी गिरण्यांतून कमाविलेला पैसा रासायनिक व अन्य क्षेत्रातील उद्योगात गुंतविण्यास सुरुवात केली. गिरण्यांपेक्षा यातून जास्त नफा त्यांना मिळत होता. तसेच या उद्योगातील कामगारांनी संघर्ष करुन मोठी पगारवाढ मिळविण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या या संघर्षातून डॉ. दत्ता सामंतांचे लढाऊ नेतृत्व उभे राहिले होते. अन्य उद्योगधंद्यातील कामगारांना डॉक्टरांनी संघर्षाच्या जोरावर कशी पगारवाढ मिळविता येते ते दाखवून दिले होते. गिरणी कामगारांच्या मनात ही बाब पक्की बसली होती. त्यांच्याच वयाचा असलेला अन्य उद्योगातील कामगार हा त्यांच्यपेक्षा कितीतरी पट जास्त पगार मिळवीत होता. त्यातून आपली कुठेतरी आर्थिक फसगत होते अशी समजूत झाली होती. त्यात काही चूकही नव्हते. त्यामुळेच हा कामगार डॉक्टर दत्ता सामंतांकडे नेतृत्व सुपूर्द करण्यासाठी गेला. नेहमीच स्टाईल नुसार डॉक्टरांनी त्यांना बजावले एक वर्षाचे रेशन भरण्याची तयारी ठेवा आणि माझ्याकडे या. गिरणी कामगारांनी अशा प्रकारचे केवळ अर्थकारण डोळ्यापुढे ठेवून आदेश देणारा कामगार नेता पहिल्यांचा पाहिला होता. आपला हा लढा दिर्घकालीन करायचा आहे हे उद्दिष्ट ठेवून गिरणी कामगार या संघर्षात उतरला होता. डॉक्टर सामंत हे हार मानणारे नेते नव्हते, लढाऊ नेतृत्व त्यांच्याकडे होते. त्यांनी अनेक लढे यशस्वी केले होते. मात्र गिरणी कामगार व अन्य उद्योगातील कामगार यांच्यात फरक होता. गिरणी धंदा आता जास्त नफा देणारा न राहिल्यामुळे मालकांनाही यात फारसा रस राहिला नव्हता. त्यांनी या धंद्यातून कमवून अन्य उद्योगात गुंतवणूक केलेली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर 82 साली संप सुरु झाला. डॉक्टरांच्या स्वभावानुसार त्यांनी हा संप कधी मागे घेतलाच नाही. असे असले तरी कामगार कधीच डॉक्टरांना दोष देत नाहीत. संपाला एक वर्ष झाल्यानंतर हा कामगार थकला. त्याची वाताहात झाली. अनेक जण गावाला गेले. ज्यांचे गावात काहीच नव्हते ते मुंबईत काही ना काही तरी काम करुन पोट भरु लागले. अनेक कामगार स्वर्गवासी झाले. आजही 35 वर्षानंतर जे जिवंत आहेत त्यांचा संघर्ष सुरु आहे...
----------------------------------------------------------

0 Response to "गिरणी कामगारांना न्याय मिळणार तरी कधी?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel