-->
विमान कंपन्यांचे दरयुध्द

विमान कंपन्यांचे दरयुध्द

संपादकीय पान शनिवार दि. २१ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
विमान कंपन्यांचे दरयुध्द
गेल्या वर्षभरात देशातील विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झालेली असतानाच दुसरीकडेे विमान कंपन्यांतील स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे. गेल्या दोन दिवसात विमान कंपन्यांच्या स्पर्धेतून सुरु झालेले तिकीटांचे दरयुध्द आता अधिक आक्रमक होत चालले आहे.  इंडिगो, स्पाइस जेट, एअर एशिया या कंपन्यांनी तर ५११ रुपये ते २०११ रुपयांच्या दरम्यान (कर वगळता) किमतीने तिकिटांची विक्री करण्याची योजना आखली आहे. विमान कंपन्यांच्या अशा बंपर सेल योजनांचा गेल्या तीन वर्षांचा कालावधी लक्षात घेतला तर अशी विक्री योजना जून अथवा जुलै महिन्यात घोषित होते आणि त्याचा कालावधी हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंतचा असतो. परंतु, यंदा प्रथमच जून ते सप्टेंबर या तुलनेने कमी गर्दीच्या कालावधीसाठी ही सेल योजना या कंपन्यांनी घोषित केली आहे. विमान
कंपन्यांनी तिकीट विक्रीची ही योजना दिल्ली, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, चेन्नई यासारख्या व्यस्त मार्गांसोबतच देहरादून, बागडोरा, उदयपूर, जम्मू, कोलकाता या आणि अशा अनेक नियमित नसलेल्या मार्गांकरिताही राबविली आहे. हवाई क्षेत्र गेल्या दोन दशकांपूर्वी खासगी उद्योगांना खुले झाल्यापासून या क्षेत्रात जबरदस्त स्पर्धा सुरु झाली. सरकारी कंपनी एअर इंडियाचा मक्तेदारी संपुष्टात आली व या कंपनीस खासगी कंपन्यांशी स्पर्धा करावी लागली. या स्पर्धेमुळे विमानने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली. कारण रेल्वेच्या तिकीटात आणखी थोडे जास्त पैसे घातले तर विमानाचे तिकीट काढता येत असले तर कोण रेल्वेने जाणार अशी परिस्थीती आहे. विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने चालू आर्थिक वर्षात देशातील विमान कंपन्यांच्या ताफ्यातील विमानांच्या संख्येत ५० नव्या विमानांची भर पडणार आहे. यातील बहुतांश विमानेही ए-३२० सारखी महाकाय प्रकारातील आहेत. दरवर्षीचा प्रवाशांचा कल पाहिला तर जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये तुलनेने कमी लोक विमानाने प्रवास करतात. विशेषत: शाळा-कॉलेज सुरू होत असल्यामुळे पर्यटनासाठी जाणार्‍या लोकांची संख्या फारच कमी असते. कमी प्रवासी असलेल्या काळातही अधिकाधिक लोकांना विमान प्रवासाकडे आकृष्ट करण्यासाठी यंदा विमान कंपन्यांनी आताच तिकिटांची ही बंपर सेल योजना जाहीर केली आहे. या सर्व घडामोडी पाहता विमान प्रवासाची बाजारपेठ विस्तारत चालली आहे. त्यात ग्राहक हा राजा ठरणार आहे. अशा स्थितीत अब्जावधी रुपये खर्च करुन अहमदाबाद ते मुंबई ही बुलेट ट्रेन सुरु करणे किती व्यवहार्य आहे हे सरकारने ठरविणे आवश्यक आहे.
-------------------------------------------------------------

0 Response to "विमान कंपन्यांचे दरयुध्द"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel