-->
विलीनीकरण आवश्यक

विलीनीकरण आवश्यक

संपादकीय पान शनिवार दि. २१ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
विलीनीकरण आवश्यक
गेल्या अनेक वर्षांपासून पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाच्या चर्चेत असलेल्या देशातील सर्वात मोठया सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँकेने भारतीय महिला बँकेलाही ताब्यात घेण्याचे आहे. स्टेट बँकेने याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला असून अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र स्टेट बँकेच्या समूहातील पाच सहयोगी बँकांचे मुख्य स्टेट बँकेत विलीनीकरणाचा प्रयत्न कर्मचार्‍यांच्या विरोधामुळे वेळोवेळी बारगळला आहे. मात्र दोन वर्षांपूर्वीच केवळ महिलांसाठी अस्तित्वात आलेल्या भारतीय महिला बँकेचा प्रस्ताव सादर करत स्टेट बँकेने अनपेक्षित पाऊल उचलले आहे. कर्मचार्‍यांचा विरोध डावलून आज ना उद्या पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण केले जाणार हे निश्चित आहे. स्टेट बँक ऑफ बिकानेर ऍन्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाळा व स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या पाच सहयोगी बँका स्टेट बँकेच्या आहेत. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र (२००८) व स्टेट बँक ऑफ इंदूर (२०१०) या सहयोगी बँकांचे यापूर्वीच मुख्य बँकेत विलीनीकरण झाले आहे. यानंतर स्टेट बँकेने स्टेट बँक ऑफ बिकानेर ऍन्ड जयपूर या बँकेला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र कर्मचार्‍यांच्या विरोधामुळे तो मागे पडला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणासाठी केंद्र सरकारने बँक बोर्ड ब्युरो अस्तित्वात आणले आहे. हे मंडळ सार्वजनिक बँकांमधील प्रमुख तसेच व्यवस्थापकीय संचालक पदावरील नियुक्यांमध्येही लक्ष घालणार आहे. स्टेट बँकेतील सहयोगी बँका विलीन करण्यास कर्मचार्‍यांचा विरोध आहे. या विरोधामागचडे महत्वाचे कारण हे कर्मचार्‍यांच्या विलीनीकरणानंतर हाल होतील असे वाटते. परंतु बँका जगल्या तर कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या वाचणार आहेत. सध्या जगात एवढी जबरदस्त मंदी आहे की आपल्याला त्याची सुदैवाने तेवढी झळ बसलेली नाही. मात्र अनेक कारणांचा परिपाक म्हणून आपल्याकडील बँकांच्या अनुत्पादीत मालमत्ता झपाट्याने वाढल्या आहेत. याचाच अर्थ बँकांची आर्थिक परिस्थीती बिघडली आहे. याला सरकारची धोरणे जशी कारणीभूत आहेत तसेच या बँकांचे व्यवस्थापनही जबाबदार आहे. आज जगात अशी परिस्थीती आहे. व त्यावर जर मात करायचे असले तर बँका सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी बँकांचे आकारमान मोठे आसण्याची आवश्यकता असते. बँक जेवढी मोठी तेवढे ती नफ्या-तोट्याचे गणित अधिक योग्यरित्या मांडू शकते. बँकांना जर जास्त थकीत मालमत्तांचा सामना करायचा असेल तर ती बँक आकारमानाने मोठी असले तर ती अधिक समर्थपणाने करु शकते. त्याउलट छोट्या बँकांना या स्पर्धेच्या काळात टिकाव धरणे कठीण पडते. त्यामुळे विलीनीकरण ही महत्वाची बाब आहे. कारण या विलीनीकरणामुळे बँका मोठ्या होतील. आज जगातील आघाडीच्या शंभर बँकांमध्ये आपली एकही बँक नाही, त्याउलट चीनच्या बँका आहेत. कर्मचार्‍यांनी देखील आपले स्वत:चे हीत न पाहता बँकांचेही भविष्य पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी बँकांच्या विलीनीकरणास विरोध न करणे हे सर्वांच्याच हिताचे आहे.  

0 Response to "विलीनीकरण आवश्यक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel