-->
सगळीकडेच चमत्कार!

सगळीकडेच चमत्कार!

संपादकीय पान शुक्रवार दि. २० मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सगळीकडेच चमत्कार!
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता सर्वच राज्यात चमत्कार झाल्याचे आपल्याला स्पष्ट जाणवेल. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाला आपण यावेळी फार मोठी बाजी मारु व अनेक राज्यात सत्तेत येऊ असे वाटले होते. मात्र त्यांचे ते स्वप्नच राहिले आहे. फक्त आपवाद काय तो आसाम राज्यात. येथे त्यांना सत्ता काबीज करण्यात यश आले आहे. या निवडणुकांच्या आदल्याच दिवशी दिल्ली विधानसभेतील पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर झाला होता. त्यात भाजपाला सपाटून मार खावा लागला होता. आपला त्यात सर्वाधिक यश मिळाले होते तर कॉँग्रेसला जेेमतेम यश मिळाले होते. या निकालांशी सुसंगत असाच निकाल यावेळी पाच राज्यांचा लागला असे म्हणता येईल. भाजपाला आसाममध्ये अनपेक्षित असे यश लाभले आहे. गेले सलग तीन वेळा तेथे कॉँग्रेसची सत्ता होती व आसाम हा कॉँग्रसेचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र भाजपाने केंद्रातील सत्तेच्या जीवावर कॉँग्रेसचा हा बालेकिल्ला काबीज केला आहे. आसाम गण परिषद या एकेकाळी राज्यात सत्तेत असलेल्या व आता मरणप्राय अवस्थेत आलेल्या स्थानिक पक्षाशी भाजपाने यावेळी युती केली होती. कॉँग्रेसची सलग पंधरा वर्षे येथे सत्ता असल्याने येथील जनता कॉँग्रेसच्या कारभाराला विटली होती. त्यातून त्यांनी भाजपाकडे एक पर्यायी पक्ष म्हणून पाहिले. राज्यातील सत्ताधार्‍यांच्या विरोधातील मते भाजपाने बरोबर आपल्या पदरात पाडून घेण्यात यश मिळविले. तसेच येथे हिंदू मतांचेही केंद्रीकरण करण्यात भाजपा यशस्वी ठरली आहे. भाजपाच्या दृष्टीने आसामात सत्ता येणे हा एक चमत्कारच म्हटला पाहिजे. केरळमधील कॉँग्रेसची सत्ता जाऊन तेथे डावी आघाडी सत्तेत आली आहे. कॉँग्रेसची केरळात सलग दहा वर्षे सत्ता होती व कॉँग्रसेच्या भ्रष्ट राजकारणाला येथील जनता कंटाळली होती. येथे देखील भाजपाने सत्ताधार्‍यांच्या विरोधातील ही मते आपल्या पारड्यात कशी पडतील याकडे पाहिले होते. तेथे राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या शाखा वाढविण्यापासून ते तेथे हिंदुत्ववाद रुजविण्याचा जोरदार धंदा भाजपा गेली दोन दशके करीत आहे. परंतु त्यात त्यांना काही यश लाभले नाही. कारण तेथे डाव्या आघाडीच्या रुपाने एक समर्थ पर्याय कॉँग्रेसला होता. त्यामुळे अर्थातच डावी आघाडी विजयी होणे क्रमप्राप्त होते. केरळातील डाव्यांची सर्व गणिते यावेळी जुळली आहेत. एकीकडे भाजपाशी मुकाबला करीत असताना दुसरीकडे कॉँग्रेसशी त्यांनी लढत दिली. खरे तर केरळात परस्परविरोधात उभे असताना तिकडे माकपची पश्‍चिम बंगालमध्ये कॉँग्रसेशी मैत्रीपूर्ण लढत होती. याचा एकूणच केरळातील राजकारणावर काही परिणाम होणार असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र हे अंदाज खोटे ठरले आहेत. केरळात पुन्हा एकदा डाव्या आघाडीचे सरकार तब्बल दहा वर्षानंतर सत्तेवर येत आहे. पश्‍चिम बंगाल या राजकीयदृष्ट्या संवेदनाक्षम असलेल्या राज्यात नेमके काय होणार याकडे अनेकांचे लक्ष होते. येथे तृणमूलच्या ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेत मागच्यावेळपेक्षा जास्त जागा घेऊन सत्तते आल्या आहेत. ममतादीदींनी घडवून आणलेला हा एक चमत्कारच म्हटला पाहिजे. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व कॉँग्रेस यांच्यात आघाडी होती. या दोघांच्या मतांची मागच्यावेळची बेरीज करता हे दोघे पुन्हा सत्तेत येणार असा होरा होता. परंतु यावेळी पश्‍चिम बंगालमधील ही सर्व गणिते फोल ठरली आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही निवडणूक एक हाती जिंकली आहे. खरे तर ममतादीदींच्या तृणमूल कॉंग्रेसचा शहरात वरचश्मा होता तर माकपचा ग्रामीण भागात. मात्र यावेळी ही परिस्थिती बदलली आहे. कॉँग्रेस व माकप यांची युती ही वरच्यावर झाली. त्यांची मते तळागाळातून हस्तांतरीत झाली नाहीत, हे वास्तव आहे. याचा अर्थ ही युती तळातील कार्यकर्त्याला पसंत नव्हती. बिहारमधील निवडणुकीनंतर डावे व कॉँग्रेस तसेच एकूणच सर्वधर्मसमभाव मानणारे पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया वेग घेऊ लागली होती. आता मात्र या आघाडीला दोन पावले मागे जावे लागले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपाला फारसे यश लाभलेले नाही. त्यांनी खरे तर हिंदू मतांचे केंद्रीकरण करण्याचा डाव खेळला होता. मात्र त्यात ते काही यशस्वी झाले नाहीत. पश्‍चिम बंगालमध्ये ममतादिदींच्या यशामागे एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे दीदींची स्वच्छ प्रतिमा. गेल्या पाच वर्षात बंगालमध्ये फार मोठी काही विकास कामे किंवा बदल झालेले दिसले नाहीत. मात्र ममतादिदीनी आपली प्रतिमा स्वच्छ राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्या हाताखाली पक्षाची भ्रष्ट यंत्रणा कार्यरत असली तरीही त्यांच्या वैयक्तीक स्वच्छ प्रतिमेमुळे लोकांनी त्यांच्या बाजूने पुन्हा एकदा कौल दिला आहे. तामीळनाडूत जे. जयललीता या ए.आय.डी.एम.के.च्या नेत्या पुन्हा एकदा सत्तास्थानी आल्या आहेत. तामीळनाडून २७ वर्षानंतर प्रथमच सलग एकाच पक्षाला सत्तेत प्रथमच संधी देण्यात आली आहे. अशा प्रकारे जयललीतांनीही हा एक चमत्कारच केला आहे. तसे पाहता जयललीता यांच्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यातून त्यांना सत्ता सोडावी लागली होती. मात्र पुन्हा न्यायालयाने त्यांची सुटका केल्यावर त्या सत्तास्थानी आल्या. त्यामुळे तामीळनाडूच्या निवडणुकीत भ्रष्टाचार हा मुद्दा नव्हता. तेथे जयललीतांनी गेल्या निवडणुकीत दिलेली आश्‍वासने अगदी लॅपटॉप देण्यापासूनची सर्व आश्‍वासने पाळली आहेत. त्याचबरोबर त्यांनी सुरु केलेल्या गरीबांना जेवण देण्याच्या अम्मा कँटिंन हे अल्पावधीत लोकप्रिय झाले आहे. त्याची गत आपल्याकडील एक रुपयातील झुणका भाकर प्रमाणे झाली नाही. त्यामुळे जयललीतांनी जनतेला भावणारी कामे जरुर केली, त्यातूनच त्यांचा विजय झाला आहे. त्यांच्या शेजारी असलेल्या पॉँडीचेरी या लहान राज्यात कॉँग्रेसला अनपेक्षीत यश लाभले आहे. कॉँग्रेसचा सर्वत्र पराभव होत असताना पॉँडीचेरीत झालेला कॉँग्रेसच्या बाजूचा चमत्कार आश्‍चर्यकारकच आहे. जनतेने पक्ष वा व्यक्ती पाहून नव्हे तर आपली कामे करणार्‍याला प्राधान्याने पुन्हा निवडून दिले आहे. जनतेला जिकडे बदल आवश्यक वाटत होता तिकडे त्यांनी सत्ताधारीही बदलले आहेत. प्रत्येक राज्यात झालेल्या चमत्कारामागचा नेमका अर्थ राजकीय पक्षांनी ओळखण्याची गरज आहे.
-------------------------------------------------------------------------  

0 Response to "सगळीकडेच चमत्कार!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel