-->
मुंबईच्या कुशीतले नवे महानगर

मुंबईच्या कुशीतले नवे महानगर

संपादकीय पान गुरुवार दि. १९ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मुंबईच्या कुशीतले नवे महानगर
मुंबईचा जसा विस्तार होऊ लागला तसा त्याच्या शेजारच्या अनेक गावांचे रुपांतर शहरात होऊ लागले. पश्‍चिम उपनगरातील विरार-वसई, मध्य रेल्वेवरील कल्याण-डोंबिवली, भिवंडी ही एकेकाळची गावे महानगरपालिकेत रुपांतरीत झाली. आता उशीरा का होईना अखेर पनवेल ही महानगरपालिका म्हणून जन्माला आली आहे. ही रायगड जिल्हयातील पहिली व एकमेव महानगरपालिका ठरली आहे. मुंबईच्या शेजरीच असल्यामुळे गेल्या पंचवीस वर्षात पनवेल शहर झपाट्याने माणसांच्या गर्दीमुळे फुलू लागले होते. या लहानश्या गावाचे ही शहर कधी झाले हे कुणालाच समजले नाही. मात्र मुंबईतील घरे परवडत नसल्यामुळे मुंबईत नोकरी करणारा माणूस निवार्‍यासाठी बाहेरच्या लहान गावात फेकला गेला होता. यातूनच पनवेल विकसीत झाले. आता तर पनवेलची लोकसंख्या आठ लाखांच्या वर पोहोचली आणि हे शहर आता महानगरपालिकांच्या यादीत आले. राज्यातली ही २७वी महानगरपालिका. पूर्वीची पनवेल नगरपालिका, सिडकोचे विकसीत क्षेत्र व शेजारच्या ६८ गावांची मिळून ही महानगरपालिका होणार आहे. १८५२ साली पनवेलचे नगरपालिकेत रुपांतर झाले होते. तब्बल १६८ वर्षांचा उज्वल इतिहास या नगरपालिकेला लाभला आहे. अलिबाग नगरपालिकेने व पेण नगरपालिकेने आपल्या स्थापनेची दीडशे वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. परंतु त्याअगोदर पनवेल नगरपालिका स्थापन झाली होती. याच्याच शेजारी असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही वर्षात झपाट्याने आपला विकास करुन घेतला होता. मात्र पनवेल त्यात मागे पडले होते. रायगड जिल्ह्यातील ही पहिलीच महानगरपालिका असल्याने त्याला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पनवेल काय किंवा एकूणच रायगड जिल्हा ही संघर्षाची भूमी पहिल्यापासून राहिली आहे. अगदी चिरनेरच्या लढ्यापासून ते अलिकडच्या सेझच्या लढ्यापर्यंत प्रत्येक वेळी रायगडवासीयांनी एक मोठा इतिहास घडविला आहे. नगरपालिका स्थापन झाली त्यावेेळी पनवेल हे एक व्यापाचे एक मोठे केंद्र होते. मुंबईच्या गलबतातून मोठा व्यापार पनवेलवरुन होत असे. पुढे काळाच्या ओघात हा व्यापार कमी झाला व पनवेलचे यादृष्टीने महत्व कमी झाले. मात्र व्यापार हा रस्त्यावरुन वाढला. पनवेल ज्यावेळी लोकलने जोडले गेले त्यावेळी ते मुंबईचे उपनगर झाल्यात जमा होते. मात्र असे असले तरीही पनवेलने आपला ग्रामीण बाजही बर्‍यापैकी टिकविला होता. शहर व ग्रामीण भागांची ओळख झटकन पटत असे. पनवेलने आपली संस्कृती बर्‍यापैकी शहराच्या धामधुमीत टिकविली आहे. प्रामुख्याने आज जो ग्रामीण भाग पनवेल महानगरपालिकात आहे त्याने आपल्यातले जुनेपण टिकविले आहे. या भागातील जमीनी अनेक प्रकल्पांसाठी गेल्या, मात्र साडेबारा टक्क्यांसाठी जो लढा झाला त्यामुळे येथील भूमीपुत्रांच्या हाती थोडीफार का होईना जमीन शिल्लक राहिली. मात्र जमिनींना येथे सोन्याचा भाव आल्यावर येथील चित्र पालटू लागले. येथील जमीनधारकांच्या हाती झटपट पैसा आला, यामुळे येथील अनेकांची संस्कृती बदलली. नवनवीन चार चाकी मोटार व सोन्याचे दागिने घालणे व मिरविणे ही एक नवी संस्कृती जन्माला आली. सिडकोने जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. आणि कमी भावात जमिनी खरेदी करण्याचा सरकारचा निर्णय शेकापचे नेते दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने शेतकर्‍यांनी हाणून पाडला. जासई येथील आंदोलनात ५ शेतकरी गोळीबारात मारले गेले. सरकार १०,००० रुपये एकरी भाव देत होते. दि. बा. पाटील यांच्या आंदोलनामुळे ४०,००० रुपयांपर्यंत भाव गेला. सिडकोच्या जमिनीच्या भावाचा हा लढा दि. बां. च्या आंदोलनाचा हा निर्णायक टप्पा होता. असा हा आंदोलनाचा इतिहास असलेला पनवेल तालुका. सिडकोमुळे या तालुक्याचे भाग्य पालटले आहे. बहुसंख्य शेतकर्‍यांच्या दारात चारचाकी, दुचाकी दिसू लागल्या. आता तर येथे आन्तरराष्ट्रीय विमानतळ येऊ घातला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात पनवेल नवी मुंबईला मागे टाकेल. सध्या पनवेलच्या जागेचे भाव, दुकानांचे भाव, जमिनींचे भाव अंबानी, अदानी यांनाच परवडतील इतके भडकलेले आहेत. एकेकाळचे टांग्याचे गाव आता लॅन्डरोव्हरशिवाय बोलत नाही. त्याचबरोबर येथे नोकरीधंद्यासाठी आलेल्या जनतेने शहरात आपले वास्तव केले आहे. त्यामुळे तेथे पक्की नागरी संस्कृती आहे. मात्र ग्रामीण भागात वेगळे चित्र दिसते. पनवेलमध्ये आता समाविष्ट झालेल्या खारघर या ग्रामपंचायतीचे सध्याचे स्वरुप हे एका महानगरासारखे आहे. सिडकोच्या स्थापनेनंतर पनवेल नगरपालिकेच्या हद्दीबरोबरच तालुक्यातही शहरीकरण वाढले. येथील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायती, विकसीत नोडमध्ये सिडको, मूळ शहरामध्ये नगरपालिका, व रायगड जिल्ह्यात असल्याने रायगड जिल्ह परिषदेकडे आरोग्य व शिक्षणाची सोय होती. त्यामुळे या भागात चार विविध संस्था कार्यरत होत्या. यामुळे विकासाचे अनेक प्रश्‍न उपस्थित होत असत. आता महानगरपालिका स्थापन झाल्याने येथील सर्व जबाबदारी महानगरपालिकेवर येणार आहे. आता या भागातील विविध प्रश्‍नांची उकल नव्याने स्थापन झालेल्या महानगरपालिकेला करावी लागणार आहे. यातील रस्ते, पाणी, सांडपााणी, कचरा व्यवस्थापन, अग्नीशामक यंत्रणा यांचा समावेश आहे. शेजारच्या नवीन मुंबई महानगरपालिकेने येथील नागरिकांना यातील अनेक सुविधा चांगल्या तर्‍हेने पुरविल्या आहेत. पनवेल महानगरपालिका ही भविष्यात झापाट्याने वाढत जाणार आहे. कारण येथे आन्तरराष्ट्रीय विमानतळ येऊ घातला आहे. तसेच अजूनही मध्यमवर्गीय पनवेलच्या परिसरात एखादे घर घेऊ शकतो. त्यामुळे पनवेल हाऊसफुल्ल होण्यासाठी अजून बराच काळ लागेल. त्यादृष्टीने या महानगरपालिकेचे नियोजन भविष्यात करावे लागेल. याची सर्वच जबाबदारी अधिकार्‍यांपासून ते लोकप्रतिनिधींची आहे. दूरदृष्टी असणारे नेते या भागास लाभल्यास ही राज्यातील उत्तम महानगरपालिका होऊ शकते.
-----------------------------------------------------------------------------

0 Response to "मुंबईच्या कुशीतले नवे महानगर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel